कोकणचा आंबा आपणच नासवतोय…!

Share

माझे कोकण – संतोष वायंगणकर

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग असेल किंवा पुणे-बंगलूरु महामार्ग या महामार्गांवर जागो-जागी आंबे विक्रीचे स्टॉल आहेत. कधी-कधी या महामार्गांवरून फिरताना कोकणच्या लोकांनाही आश्चर्य वाटावे अशी स्थिती होते. जेव्हा कोकणातील हापूस आंबा देवगड, विजयदुर्ग, वेंगुर्ले, मालवण या आंबा होणाऱ्या भागामध्ये विक्रीला नसतो, तेव्हा महामार्गावर एवढा आंबा विक्रीला कसा काय आणि कुठून येतो. मग लक्षात येते की, आंबा कर्नाटकचा, बॉक्स देवगड हापूसचे, आतमध्ये पॅकिंगसाठी वापरला जाणारा कागद कोकणातील वृत्तपत्रांच्या रद्दीचा. फार नियोजनबद्ध पद्धतीने ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. खुल्या बाजारपेठांमध्ये कोणीही, कुठेही विकावे त्यामुळे कर्नाटकचा हापूस, देवगड हापूस म्हणून विकला जातो. त्यावर आंबा बागायतदार काहीही करण्याच्या मानसिकतेत नाहीत; परंतु यामुळे काय होतयं की देवगड हापूसऐवजी कर्नाटकचा आंबा ग्राहकांकडे जातोयं. यामुळे कर्नाटक हापूसची जी काही टेस्ट असेल ती ग्राहकांपर्यंत जाते.

कोकणातील आंबा बागायतदार आजही रुमालाच्या खालून होणाऱ्या मार्केटमधील व्यवहारावरच अवलंबून आहेत. कोरोनानंतर एक गोष्ट घडली की, आंबा विक्रीचे मार्केट बदलेले. कोरोना काळात नागपूर, बारामती, कोल्हापूर, पुणे, नागपूरकडचे व्यावसायिक थेट आंबा बागायतदारांच्या बागायतींमध्ये येऊन आंबा खरेदी करू लागले. यामुळे बागायतदारांना चांगला दर मिळाला; मात्र ही विक्री व्यवस्था पुढे तशीच चालू राहण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे होते. यासाठी बागायतदारांनीही आंबा विक्री करताना गुणवत्तेची तडजोड करता कामा नये; परंतु तसे काही होत नाही. बऱ्याच वेळा पेटी भरताना वरचा थर चांगल्या आंब्यांचा आणि तळाला कोवळा आंबा भरला जातो. यामुळे ही होणारी फसवणूक शेवटी आंबा व्यवसायावर अविश्वासच निर्माण करणारी आहे. क्षणिक पैशांच्या लोभापायी ही जी काही फसवणूक केली जाते, त्यामुळे आंबा विक्री व्यवस्थेत कोकणातील आंबा बागायतदार बदनाम होतोय याची जाणीव आणि भान सतत राखले गेले पाहिजे.

सहज आठवले म्हणून सांगतो, जवळपास तीस वर्षांपूर्वीची मुंबईच्या क्रॉफर्ट मार्केटमधील ही घटना आहे. मी एप्रिल महिन्यात असाच कशातरी कामानिमित्ताने मुंबईत गेलेलो, सहज फिरत-फिरत क्रॉफर्ट मार्केटमध्ये जाणे झाले. आमचे मित्र मंगलगाणी दंगलगाणी, मराठी बाणा या कार्यक्रमाचे निर्माता गायक आणि पिढीजात या आंबा व्यवसायात असणारे अशोक हांडे यांची भेट झाली. त्यावेळी आंबा दलाल आणि आंबा बागायतदार शेतकरी त्यांचे प्रश्न या अानुषंगाने मी अशोक हांडे यांच्याशी बोलत होतो. अशोक हांडे मला तेव्हा म्हणाले की, दहा मिनिटं थांब, तुला प्रत्यक्ष काय स्थिती आहे ते दाखवतो. मग ठरव आंबा दलाल आणि आंबा बागायतदारांनी काय करायला पाहिजे ते.

देवगड भागातून सकाळीच आलेल्या बागायतदारांच्या अशोक यांनी चार पेट्या उघडल्या, यातल्या एका पेटीत फक्त वरचा थराला मोठे पिकण्यासाठी योग्य आंबे होते. तळाचे दोन्ही थर हे कोवळे बारीक आंबे होते. मला अशोक हांडे म्हणाले, अरे आता याला कितीची पट्टी काढायची, मी हे पाहत होतो. पुढच्या पाचच मिनिटांत देवगड, वाडातरच्या अ. मो. जोशी या नावाने आलेली आंबा पेटी उघडली गेली. जो आंबा वरच्या थराला होता, त्याच गुणवत्तेचा आंबा शेवटच्या थराला होता. ती पेटी देवगडातील सुप्रसिद्ध आंबा बागायतदार सुधीर जोशी यांची होती. मला अशोक हांडे म्हणाले, आंब्यामधला हा फरक राहातो. पंचवीस-तीस वर्षांपूर्वीची ही घटना क्रॉफर्ट मार्केटमधला हा अनुभव एवढ्याचसाठी सांगितला. तेव्हा कल्टारची सुरुवात होती. कोकण कृषी विद्यापीठाचे डॉ. गुंजाठे आंबा बागायतदारांनी कल्टार वापरण्यासाठी सांगत होते.

कल्टारने नेमके काय बिघडवले आणि कल्टारने आंबा बागायतदार शेतकऱ्यांना किती पैसे मिळवून दिले हे बागायतदार शेतकरीच सांगू शकतील. कल्टारला विरोध करणारेही तेव्हा कै. सत्यवान जामसंडेकर यांच्यासारखे बागायतदार शेतकरी होते. शेती बागायती या अलीकडच्या काही वर्षांत निसर्गावर अवलंबून राहिली आहे. या निसर्गाच्या लहरीपणामुळे फटका बागायतदार शेतकरी आणि मच्छीमारांनाही बसत आहे. यामुळे एकिकडे निसर्गाची बेभरवशी म्हणता येईल अशी स्थिती असताना बागायतदार शेतकऱ्यांनी फार काळजीपूर्वक आंब्याचे मार्केट जपले पाहिजे. परंतु दुर्दैवाने असे घडत नाही. ते जपण्यासाठी कोणतेही प्रयत्न संघटीतरीत्या होत नाहीत. त्यावर चर्चाही करण्याची कोणाचीही मानसिकता नाही. एकदा कोकणच्या हापूसची बदनामी झाली तर आंबा विक्री मार्केटमध्ये कोकणातील आंबा घेण्यासाठी ग्राहक आंबा घेणार नाही.

आज गुजरात, कर्नाटकमधून बाराही महिने आंबा येतोय. यामध्ये आपण कुठेच बसत नाही. त्यामुळे आपण आपल्या कोकणच्या हापूस आंब्याची मिजास न दाखवता ग्राहकाला जपला पाहिजे. क्षणिक फायद्यासाठी आंबा विक्री मार्केट खराब केले जाता कामा नये. राजापूर भागातही आंबा विक्री थेट कंपन्यांना केली जात होती. कंपनीने खरेदीची तयारी दाखवली. दरही चांगला दिला गेला; परंतु बागायतदार शेतकऱ्यांनी कोवळे आंबे पाठवले. शेवटी कंपनीने खरेदी व्यवस्था बंद केली. चार पैसे अधिकचे मिळणारी ही व्यवस्थाच कोलमडून टाकण्याचा करंटेपणा काही आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी केला.

शेवटी जाता-जाता एवढंच म्हणेन कोकणच्या हापूस आंब्याचे असलेले एक स्थान जाता कामा नये. ते स्थान अव्वलस्थानीच राहावं असे वाटत असेल तर कोकणातील सर्वच आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी आंब्याची गुणवत्ता कायम राखली पाहिजे. अन्यत: कर्नाटकचा आंबा फळांचा राजा म्हणून मार्केटमध्ये अव्वलस्थानी दिसला, तर नवल वाटायला नको.

Tags: kokanmango

Recent Posts

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, दिनांक २२ मे २०२४.

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध चतुर्दशी सायंकाळी ०६.४७ नंतर पौर्णिमा शके १९४६. चंद्र नक्षत्र स्वाती…

34 mins ago

मतदानाचा टक्का घसरला; कोण जबाबदार?

मुंबईत जे घडतं, त्याची चर्चा देशभर होते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यांतून लोक…

4 hours ago

नेहमी खोटे बोलणारे लोक! काय आहे मानस शास्त्रीय कारण?

फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे काही लोकांना सतत खोटं बोलण्याची सवय असते. छोट्या-छोट्या गोष्टींवरून अनेकदा सातत्याने…

5 hours ago

घोषणा आणि वल्गना…

इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झालेत. मुंबईसह महाराष्ट्रात सर्व…

6 hours ago

IPL 2024: अय्यरच्या जोडीचा धमाका, कोलकाता आयपीएलच्या फायनलमध्ये

मुंबई: कोलकाता नाईट रायडर्सची अय्यर जोडीने कमाल केली. कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबादला हरवत दिमाखात आयपीएलच्या…

7 hours ago

Reel बनवण्याच्या नादात तरूणाने १०० फूट उंचावरून पाण्यात मारली उडी, झाला मृत्यू

मुंबई: झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यातून हैराणजनक बातमी समोर आली आहे. येथे रील बनवण्याच्या नादात तरुणाने १००…

8 hours ago