Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरमोखाड्यात पाणीबाणी

मोखाड्यात पाणीबाणी

> टँकरद्वारे दरडोई प्रतिव्यक्ती केवळ २० लिटर पाणी... > या पाण्यात तहान भागवायची की स्वच्छता ठेवायची? नागरिकांचा सवाल

मोखाडा : पालघर जिल्ह्यात सर्वात अधिक पाऊस पडत असणाऱ्या मोखाडा तालुक्यात पाणी साठवणूक नियोजन अभावामुळे पाणीबाणी संकट दरवर्षी डोके वर काढत असते. नागरिकांनाच काय तर जनावरांनादेखील पाणीटंचाई सोसावी लागत आहे. त्यातच गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिमाणशी २० लिटर पाणी उपलब्ध होत असून शासन, प्रशासन आणि पाणीपुरवठा विभागाला दरवर्षी टंचाईग्रस्त गाव-पाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे. यामुळे स्वच्छता ठेवण्यासाठी व स्वच्छ राहण्यासाठी किमान ४० लिटर प्रतिमाणसी टँकरद्वारे पाणी मिळावे, अशी मागणी टंचाईग्रस्त भागातील नागरिकांकडून केली जात आहे.

राज्यातील टंचाईग्रस्त ग्रामीण भागात शासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा ही उपाययोजना सुरू केली असून, ३ मार्च १९९९ च्या शासन निर्णयानुसार टंचाईग्रस्त भागात प्रतिव्यक्ती २० लिटर पाणी, तर गाय, म्हैस, बैल प्रतिजनावर ३५ लिटर व शेळी, मेंढी प्रतिजनावर ३ लिटर पाणीपुरवठा टँकरद्वारे केला जात आहे. त्यातही मिळणाऱ्या पाण्यातून काही पाणी स्वयंपाक व स्वच्छतेसाठी शिल्लक ठेवावे लागत आहे, त्यामुळे जास्तीत जास्त पाणी मिळावे म्हणून नागरिक विहिरींवर टँकर आल्यानंतर गर्दी करतात. या तुटपुंज्या मिळणाऱ्या पाण्यात आपली तहान भागवायची की स्वच्छता ठेवायची?, असा प्रश्न टंचाईग्रस्त भागातील नागरिकांसमोर निर्माण झाला आहे, तर शासनाने नव्याने जलजीवन मिशन ही योजना अंमलात आणली असून, त्यामध्ये प्रतिमाणसी ५५ लिटर पाणी देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे, त्यामुळे शासनाच्या पाणीपुरवठा धोरणातच विरोधाभास असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

केंद्र आणि राज्य सरकारने शहरासह ग्रामीण भागात प्रत्येक घरात शौचालय बांधणे बंधनकारक करून स्वच्छता अभियान राबविले असून, घरात शौचालय बांधलेले नसेल, तर सरकारी योजनांचा लाभ नाही, सरकारी घरकुलात शौचालय बांधलेले नसेल, तर लाभार्थ्यांला घराचा हप्ता (अनुदान) दिले जात नाही. मात्र टंचाईग्रस्त भागात टँकरद्वारे होत असलेल्या पाणीपुरवठ्यातून प्रतिमाणसी केवळ २० लिटर इतका तुटपुंजा पाणीपुरवठा केला जातो, त्यामुळे घरोघरी स्वच्छतेच्या सर्व सुविधा असतांनाही हा पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने स्वच्छता कशी ठेवायची? असा प्रश्न टंचाईग्रस्त भागातील नागरिकांपुढे आहे.

शासनाने जलजीवन मिशन ही महत्त्वाकांक्षी योजना अंमलात आणली असून या योजनेंतर्गत प्रत्येक घरात नळपाणी पुरवठ्याद्वारे प्रतिमाणशी ५५ लीटर पाणी हा निकष निश्चित केला आहे. मात्र टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे केवळ २० लीटर इतकेच प्रमाण आहे, त्यामुळे तुटपुंज्या मिळणाऱ्या पाण्यात स्वच्छता ठेवण्यासाठी टंचाईग्रस्त गाव-पाड्यांतील नागरिक टँकर येताच जादा पाणी मिळावे म्हणून घरातील सर्व भांडीकुंडी विहिरीवर आणून ती पाण्याने भरण्यासाठी जीवघेणी स्पर्धा करावी लागत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -