Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणरत्नागिरी-सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटाची वाट बिकटच!

रत्नागिरी-सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटाची वाट बिकटच!

शासनाच्या निधीची ‘प्रतीक्षा’च

खेड : सह्याद्रीच्या कुशीत सुमारे ४ हजार फूट उंचीवर वसलेल्या अन् तितक्याच नागमोडी वळणाचा असलेल्या सह्याद्रीच्या कडेकपारीतून थेट पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात जाणाऱ्या रघुवीर घाटाची अवस्था बिकटच असून घाटाचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी शासनाच्या निधीची ‘प्रतीक्षा’च आहे. मात्र याचवेळी गेल्या पावसाळ्यात कोसळलेल्या नैसर्गिक दरडी घाटात आजही कायम आहेत.

दरडीचा घाट म्हणून गेल्या काही वर्षांत या घाटाने आपली ओळख निर्माण केली आहे, ती याच कारणामुळे. मानवी मेंदूने सह्याद्रीच्या पर्वत रांगा मागे हटवत त्यातून निर्मित केलेला रस्ता ही एक अशक्यप्राय बाबच असल्याचे बोलले जात आहे. कोरीव सह्याद्रीचे कातळ फोडून त्यातून २ जिल्ह्यांच्या सीमा एकत्र जोडण्याचा प्रशासनाने केलेला भरीव प्रयत्न उल्लेखनीयच आहे. परंतु या घाटाच्या निर्मितीनंतर घाटामध्ये पावसाळी कालावधीत निर्माण होणारी नैसर्गिक आपत्ती ही या घाटाचे मुख्य दुखणे आहे.

खेड तालुक्यापासून सुमारे २२ किमी अंतरावर असलेल्या रघुवीर घाटाला पावसाळ्यामध्ये पर्यटकांची चांगलीच पसंती लाभते. सुमारे ३ महिने पावसाची विविध रूपे या घाटात पर्यटकांची मने मोहून टाकणारीच असतात. त्यामुळे या घाटात पर्यटकांची जणू काही मांदीयाळीच पाहावयास मिळते. रघुवीर घाट १० किमी अंतराचा असून या मार्गावर ७ ठिकाणे धोक्याची तसेच दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने हा घाट सध्या तरी पावसाळा कालावधीत डेंजर झोनमध्येच आहे. या ठिकाणी पावसाचे प्रमाणदेखील मोठ्या प्रमाणात असल्याने नैसर्गिक आपत्तीचा सामना दरवर्षी या घाटाला करावा लागतो.

खोपी-शिरगावच्या डोंगर माथ्यावरील हा घाट पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा आहे. त्यामुळे भौगोलिक दुवा असलेल्या या घाटातील अनेक समस्या आजही ‘जैसे थे’च आहे. रस्ते उखडलेल्या अवस्थेत असून रेलिंगची देखील मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. घाटाला नवनिर्मितीकरिता शासनाने सढळ हाताने निधी देऊन त्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे होते. परंतु तसा कोणताही प्रस्ताव शासन दरबारी गेलाच नसल्याने हा घाट सेवासुविधांअभावी कोसो दूरच आहे. वळणा-वळणाचा रस्ता, दृष्टी पथात येणारा निसर्ग यामुळेच या घाटाच्या वैशिष्ट्यांनी हा घाट पर्यटनाच्या पटलावर आला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -