Monday, May 13, 2024
Homeताज्या घडामोडीवाडा एसटी आगाराचे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष

वाडा एसटी आगाराचे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष

वसंत भोईर

वाडा : दळणवळणाची साधने असली तर ग्रामीण भागाचा विकास होण्यास वेळ लागत नाही. याच कारणास्तव वाडा या आदिवासी, ग्रामीण तालुक्याच्या मुख्यालयी २५ वर्षांपूर्वी (१९९६) वाडा बस आगार सुरू करण्यात आले. तालुक्यातील ग्रामीण भागात बससेवा सुरू करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या बस आगाराचा सध्या उलटा प्रवास सुरू झाला आहे. उत्पन्नाचे कारण पुढे करून ग्रामीण भागात जाणाऱ्या ७० टक्के बसफेऱ्या बंद करून त्या भिवंडी, कल्याण, ठाणे, पुण्याकडे सुरू करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागाकडे एसटी बस आगाराने केलेल्या या दुर्लक्षाबाबत प्रवासी व ग्रामीण नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

ग्रामीण भागातील जनतेला बस सेवेची सेवा मिळावी यासाठी सन १९९६ मध्ये तत्कालीन शिवसेना-भाजपा युती सरकारमधील तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत वाडा बस आगाराचे उद्घाटन करण्यात आले. तालुक्यातील रस्त्यांची सुविधा असलेल्या बहुतांशी गावात बसेवा सुरू झाली. प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याने काही गावांमध्ये दररोज सात ते आठ बसफेऱ्या जाऊ लागल्या. तब्बल १६ ते १७ वर्षे येथील ग्रामीण भागातील प्रवाशांना एसटी बसची चांगली सुविधा मिळाली. विशेषतः ग्रामीण भागातून तालुका मुख्यालयी असलेल्या माध्यमिक शाळा व महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटीची सुविधा फारच फायदेशीर ठरली.

दरम्यान, सध्या वाडा आगाराने हळूहळू ग्रामीण भागातील बसफेऱ्या कमी करून भिवंडी, ठाणे, कल्याण, पुणे, नगरकडे जाणाऱ्या फेऱ्यांकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यामुळे ग्रामीण भागात खासगी, बेकायदेशीर प्रवासी वाहतूक वाढीस लागली. मार्च २०२० पासून कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून येथील एसटी बस आगाराने ग्रामीण भागातील बससेवा पूर्णत: बंद केली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने येथील एसटी बस आगाराने शहरी भागातील बससेवा पूर्ववत सुरू केली, मात्र ग्रामीण भागातील ७० टक्के बसफेऱ्या आजही बंदच ठेवल्या आहेत.

ग्रामीण भागातून उत्पन्न (भारनियमन) मिळत नाही, म्हणून येथील ७० टक्के बसफेऱ्या बंद केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याचवेळी या तालुक्यातील ग्रामीण भागातील बस सेवा बंद झाल्याने मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या एसटी महामंडळाच्या ब्रीद वाक्यालाच वाडा आगाराने हरताळ फासल्याने येथील प्रवाशांना नाईलाजाने खासगी प्रवासी वाहतुकीकडे वळावे
लागले आहे.

खासगी प्रवासी वाहतुकीला उधाण

ग्रामीण भागातील ७० टक्के बसफेऱ्या बंद केल्याने तालुक्यातील वाडा-कुडूस, कुडूस-अंबाडी, कुडूस-खानिवली-कंचाड, वाडा-परळी, वाडा-सोनाळे, शिरीषपाडा-अघई या ठिकाणी आठशेहून अधिक जीप, मिनिडोअरमधून बेकायदेशीर प्रवासी वाहतूक सुरू आहे. एसटीच्या बसफेऱ्या बंद केल्याने तालुक्यातील दोन हजारांहून अधिक विद्यार्थी खासगी वाहनांनी प्रवास करताना दिसत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -