Monday, May 20, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखद्रष्टे मोदी...

द्रष्टे मोदी…

पंतप्रधान मोदी हे एक द्रष्टे नेते आहेत आणि त्यांचा विकासाचा दृष्टिकोन सर्वांना विकासाकडे घेऊन जाणारा आहे, हे आता वारंवार देशाच्या समोर आले आहे. आयुष्य एकदाच मिळते आणि म्हणून आयुष्यात नेहमी मोठी उद्दिष्टे समोर ठेवा, असे एक प्रसिद्ध वचन आहे. त्या वचनाला अगदी तंतोतंत जुळणारे असे मोदी यांचे वर्तन आहे. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात भारताने किती मोठी झेप घेतली आहे, हे समजण्यासाठी तसाच दृष्टिकोन हवा आणि तशीच दूरदृष्टी हवी. काल सूरत येथील विशालकाय डायमंड बोर्सच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मोदी यांनी माझ्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या टर्ममध्ये भारताला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवणार असल्याचे त्यांनी सांगितले आणि ही मोदी की गॅरंटी असल्याचेही स्पष्ट केले.

मोदी यांच्याकडे आपल्या साध्य करावयाच्या ध्येयाबद्दल ठाम विश्वास आहे. हाच विश्वास त्यांना नवनवीन यशाच्या शिखराकडे नेत आहे. मोदी यांचा हा विश्वास पाहून काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांच्या पोटात गोळा येत असतो. पण विरोधासाठी विरोध म्हणून रचलेली त्यांची प्रत्येक चाल वायाच जाते. उलट जितके विरोधी पक्ष मोदी यांच्यावर टीका करतात आणि त्यांना वाट्टेल त्या शिव्या देतात, त्यातून दरवेळेस मोदी नव्या झळाळीने समोर येतात. काल सूरत येथील डायमंड बोर्सच्या उद्घाटनप्रसंगी मोदी यानी काढलेल्या उद्गारांना हीच पार्श्वभूमी आहे. या डायमंड बोर्समधून आठ लाख रोजगार निर्माण होणार आहेत.

भारत ही आधुनिक हिरे, सोने आणि दागदागिने या क्षेत्रात विकसित बाजारपेठ म्हणून समोर आणण्याचा हेतू या डायमंड बोर्स उभारण्यामागे आहे. आर्थिक बाजारपेठेत सध्या सोन्याला प्रचंड भाव आहे आणि लोकांसाठी तो एक गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. जमीन आणि शेती या क्षेत्रातील गुंतवणूक आता मागे पडत चालली आहे. त्याची जागा सोन्यातील गुंतवणुकीने घेतली आहे. या परिस्थितीत सोन्याच्या बाजारपेठेत डायमंड बोर्स उभारून मोदी यांच्या नव्या भारताने आपण काळाबरोबर पावले टाकत असल्याचे संकेत दिले आहेत. सूरत हे हिऱ्यांचे शहर म्हणून ओळखले जाते आणि तेथील हिरे व्यापार हा जगभर प्रसिद्ध आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली आहे.

सूरत हिरे व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. हा हिरे व्यापार तब्बल ३५.५४ एकर जमिनीवर स्थापित केला असून त्यासाठी ३४०० कोटी रुपये खर्च आला आहे. हिरे व्यापारात गुजरातने जी झेप घेतली, त्यामुळे विरोधी पक्षांच्या पोटात दुखणे अपरिहार्य आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्याने गुजरातला मोदी यांनी आपला हिरे व्यापार पळवला, अशी टीका केली आहे. त्यामागे केवळ मोदी यांच्या यशाने झालेला जळफळाट यापेक्षा दुसरे काहीही नाही. मुंबईत एकेकाळी हिरे व्यापार जोरात होता, हे सत्य आहे. पण राज्यात काही काळापूर्वी उद्योगस्नेही वातावरण नव्हते. कंपन्या मग त्या कोणत्याही असोत, की व्यापारी असोत, त्यांना धमकावून त्यांच्याकड़ून खंडण्या उकळल्या जात होत्या. परमिट राजचा कडेलोट झाला होता. त्यामुळे वैतागून या व्यापाऱ्यांनी अखेर आपला व्यवसाय गुजरातला नेण्याचा निर्णय घेतला. त्यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पण मोदी यांनी गुजरातला जो हिरे व्यापार पळवला अशी अकारण टीका करत आहेत, त्यांना राज्यातील जनतेनेच नाकारले आहे. त्यातून त्यांची ही मळमळ बाहेर पडली आहे. आदित्य ठाकरे यांनी हिरे व्यापार गुजरातला नेला जात असल्याबद्दल टीका केली आहे. पण महाविकास आघाडीच्या काळात कोणते प्रकल्प गुजरातला गेले आणि त्याबद्दल सरकार हातावर हात धरून स्वस्थ राहिले, याचाही विचार त्यांनी केला पाहिजे.

हिरे व्यापार गुजरातला नेला असल्याबद्दल ज्या राजकीय पक्षांना आज दुःख होत आहे, त्यांनी महाराष्ट्रात नवी गुंतवणूक आणून येथील बेरोजगारी दूर करण्याबाबत काय प्रयत्न केले, याचे आत्मपरीक्षण करणे जास्त आवश्यक आहे. आता मोदी यांच्या काळात देशात प्रचंड परकीय गुंतवणूक येत आहे. इलन मस्क यांचा टेस्ला कारखाना उभारला जात आहे. त्यावर विरोधक चूप आहेत. गुजरातेतील हिरे व्यापाराच्या अालिशान संकुलात व्यापाऱ्यांना देशातून हिरे, रत्ने आणि दागिन्यांची निर्यात करणे, अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, हिऱ्यांना पैलू पाडणे वगैरे व्यवसायाची भरभराट केली जाणार आहे. यातून भारतात प्रचंड प्रमाणात गुंतवणूक येणार आहे. गुंतवणूक आली की बेरोजगारी दूर होते. हा सिद्धांतच आहे. याचीच पोटदुखी काही विरोधी पक्षांना आहे. त्यातून अशी टीका केली जात आहे. अगोदरच भारताची निर्यात थंडावली आहे. त्यामुळे हिऱ्यांची आणि दागिन्यांची निर्यात वाढली, तर भारताची वित्तीय तूट कमी होते.

गुजरातला हिरे व्यापार गेला असला तरीही अनेक कंपन्या गुंतवणुकीसाठी भारतात येणार असल्याने येथील तरुणांनाही रोजगार मिळणारच आहे. निर्यात वाढून त्यामुळेही रोजगार निर्मिती होणार आहे. मोदी यांच्या या यशाकडे कुणीही विरोधी पक्ष पाहत नाही. कारण त्यांना केवळ राजकारणासाठी राजकारण करायचे आहे. जनतेने त्यांचे हे नतद्रष्ट राजकारण कधीचेच लाथाडले आहे. त्यांना सातत्याने अपयश येत राहाते आणि तरीही हे विरोधी पक्ष डाव्यांच्या नादाला लागून तिसरेच तर्कट लढवून मोदी यांना शिव्या-शाप देत असतात. त्यातून त्यांची संकुचित मनोवृतीच दिसून येते. भारत आता तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार आहे, असे मोदी यांनी सांगितले आहे. कारण त्याला मोदी यांची गॅरंटी आहे. यावर आता विरोधक कोल्हेकुई करतील. पण त्या टीकेला काही अर्थ नाही. कारण लोकांना सत्य काय आणि परिणाम काय ते स्पष्ट दिसतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -