Saturday, May 18, 2024
Homeसाप्ताहिककोलाजVande Mataram : वंदे मातरम...

Vande Mataram : वंदे मातरम…

  • ओंजळ : पल्लवी अष्टेकर

आम्ही सर्वसामान्य नागरिक मिलिटरी लोकांच्या सुरक्षिततेच्या कोंदणात बसून ‘भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी…’ इतकेच गाऊ शकतो, कारण देशाच्या सीमेवर जीवाची बाजी करून सैनिक या मातृभूमीसाठी, देशातील नागरिकांसाठी प्राणपणाने रात्रंदिवस लढत असतात.

वर्ष १९८७ ते १९९० चा काळ. श्रीलंकेतील सिन्हाली व स्थानिक तमिळमधील तणावग्रस्त परिस्थितीचे एका सिव्हिल वाॅरमध्ये परिवर्तन होत होते. त्यामुळे त्यांच्यात शांतता प्रस्थापित करण्याच्या हेतूने भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी ‘इंडियन पीस किपिंग फोर्स’ (IPKF)ची स्थापना केली. या संघटनेचा उद्देश प्रामुख्याने श्रीलंकेतील ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तामिल ईलम’ (एल.टी.टी.ई.) आणि श्रीलंकन लष्कर यांच्यात चालू असलेल्या चकमकींना आळा घालणे; परंतु हे प्रकरण चिघळत चालले होते. हळूहळू एल.टी.टी.ई. व श्रीलंकन लष्कर यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. ह्या युद्धात नकळत इंडियन पीस कीपिंग फोर्स ओढली गेली व एल.टी.टी.ई.चा थेट सामना करावा लागला. भारताने आपल्या लष्कराला पूर्ण ताकद वापरायची परवानगी दिली. भारतीय लष्कराने एल.टी.टी.ई.ला थोपवून ठेवले व परिस्थिती नियंत्रणात आणली. पण भारताने या युद्धाची एक मोठी किंमत मोजली. मुख्य म्हणजे यात इंडियन पीस किपिंग फोर्सचे अंदाजे ११६५ जवान मृत्युमुखी पडले, तीन हजार जखमी झाले.

या इंडियन पीस किपिंग फोर्समध्ये सहभाग होता कर्नल उदय पिसोळकर यांचा. कर्नल उदय सांगतात की, “त्यांच्या टीमचे मुख्य काम म्हणजे युद्धजन्य क्षेत्रात युद्धाला लागणाऱ्या गोष्टी पोहोचवणे. प्रत्यक्ष लढणाऱ्या सैनिकांना राशन व दारूगोळा वेळेवर पोहोचते करणे हे साहसाचे व जोखमीचे काम होते. जाफनातून त्रिंकोमाली येथे ॲम्युनिशन ट्रक्स जात असताना एल.टी.टी.ई. जमिनीत सुरुंग लावायचे व हे ट्रक रिमोट कंट्रोलने उडवायचे. यात एकदा त्यांच्या डोळ्यांसमोर काही अंतरावर पुढे असलेली गाडी एल.टी.टी.ई.ने उडविली व त्यात कर्नल उदय यांचे दोन सहकारी मृत्युमुखी पडले. आपण ज्यांच्याशी थोड्या वेळापूर्वी बोललो ते आपले सहकारी आता या जगात नाहीत”, ही आठवण सांगताना कर्नल उदय हळहळले. कर्नल उदय एक भारदस्त, पण प्रेमळ व्यक्तिमत्त्व.

“भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी…” आम्ही सर्वसामान्य नागरिक मिलिटरी लोकांच्या सुरक्षिततेच्या कोंदणात बसून इतकेच गाऊ शकतो, कारण सीमेवर जीवाची बाजी करून सैनिक या मातृभूमीसाठी, देशातील नागरिकांसाठी प्राणपणाने रात्रंदिवस लढत असतात. लहानपणापासून कर्नल उदय यांना देशसेवेचे आकर्षण. याला प्रमुख कारण म्हणजे त्यांचे वडील सीतारामपंत पिसोळकर हे स्वातंत्र्यसैनिक होते व जिल्हा व सत्र न्यायाधीश होते. कर्नल उदय यांच्या वडिलांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात हैदराबाद येथे तुरुंगवास भोगला होता. कर्नल उदय हे एनसीसी (नॅशनल कॅडेट काॅर्प्स)मध्ये होते. एनसीसीमधील चपळ, सुसूत्र हालचाली, बँड, स्वातंत्र्यगीते, त्या काळातील स्वातंत्र्यविषयक गाजलेले चित्रपट यातून कर्नल उदय आपोआपच मातृभूमीकडे ओढले गेले. “आमच्या शाळेतील एनसीसीचे प्रशिक्षण देणारे ऑफिसर खूपच चांगले व शिस्तबद्ध होते. त्यांनी आम्हाला देशप्रेम, शारीरिक शिक्षण यासाठी वेळोवेळी प्रोत्साहित केले” असे कर्नल उदय सांगतात. त्यांनी १९७९ मध्ये जिऑलाॅजी या विषयातून फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.एस्सी. केले व १९८१ मध्ये जिऑलाॅजीमधून एम.एस्सी. करत असताना, त्यांची इंडियन मिलिटरी अॅकॅडमी (IMA) मध्ये निवड झाली व त्यानंतर दीड वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर त्यांची नेमणूक आर्मी सर्व्हिस कोरमध्ये (१९८२) या वर्षात झाली. त्यांनी सप्लाय चेन मॅनेजमेंट, पेट्रोलिअम टेक्नाॅलाॅजी व फूड टेक्नाॅलाॅजी यात प्रावीण्य मिळवले. आपल्या गंमतशीर शैलीत कर्नल उदय सांगतात की, “माझ्या लग्नासाठी देखील रजा मिळणे मला कठीण झाले होते; परंतु रजा मिळून लग्न पार पडले व मुक्तासारखी समजावून घेणारी सहचारिणी मिळाली. आम्हा लोकांचे पोस्टिंग देशाच्या सीमा, दुर्मीळ भागात होत असल्याने अनेकदा तिथे आपल्या कुटुंबीयांना नेता येत नाही. पूर्वीच्या काळी आजच्यासारखी मोबाइल सुविधाही नव्हती. त्यामुळे काही वेळा ३० किमी जायला लागायचे व पोस्ट ऑफिसातून मुक्ताला मला लँडलाइनवरून फोन करावा लागे. पण आम्हा दोघांसाठीही तो आनंदाचा क्षण असायचा. मधल्या वर्षात पत्नी मुक्ता यांनी आपली मुले तन्वी व वरुण यांना मोठे करत सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यामुळेच मला मिलिटरी आयुष्यात समाधानकारक कामगिरी करता आली”. त्यांचा मुलगा मेजर वरुण पिसोळकर हा घराण्याची ही परंपरा पुढे नेत आहे व तो ‘कोर ऑफ इंजिनीअर’ या तुकडीत कार्यरत आहे. त्यानेही आपले आयुष्य देशसेवेसाठी वाहून घेतले आहे.

आणखी एक आपल्या आठवणीतील प्रसंग कर्नल उदय सांगतात, १९८४-८५ दरम्यान मी लेहमध्ये तैनात असताना मी, सियाचीन बेसकॅम्प येथे एअरफोर्स रिफ्युलर बाऊझर (हेलिकाॅप्टरच्या इंधन भरण्यासाठी वापरले जाणारे ट्रक) यशस्वीरीत्या वितरीत केले. जगातील सर्वात उंच युद्धभूमी, जिथे कमाल उंची २० हजार फुटांपेक्षा जास्त आहे. तेथील तापमान अतिशय कमी होते. हे काम खूप आव्हानात्मक होते, कारण मर्यादित ऑफ-रोड क्षमता असलेले इतके मोठे वाहन पहिल्यांदाच इतक्या कठीण प्रदेशात चालवले जात होते आणि खारदुंगला पासच्या पुढे योग्य रस्ता नव्हता. आम्ही अतिशय खडबडीत आणि दुर्गम प्रदेशातून प्रवास केला आणि सियाचीन बेस कॅम्पपासून जात असताना बर्फ वितळल्यामुळे अचानक आलेल्या पुरात आमचा बाऊझर एका नाल्यात अडकला. आम्ही जवळपास दोन-तीन दिवस अन्नाशिवाय राहिलो व आमच्या टीमला डोंगरातील शेळी पकडून जगावे लागले. आर्मीत ३२ वर्षांची प्रदीर्घ सेवा केलेल्या, देशसेवेसाठी आयुष्य वाहिलेल्या कर्नल उदय पिसोळकर यांचे कार्य ७०० शब्दांत मांडणे अशक्य आहे. त्यांनी जम्मू, काश्मीर, श्रीनगर या प्रदेशांत अनेक ॲन्टीइनसर्जन्सी ऑपरेशन्समध्ये सहभाग घेतला.

सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले कर्नल उदय हे तट्टू ग्राऊंड, श्रीनगर येथील ‘मुस्कान’ या अनाथालयात ऑफिसर इन्चार्ज म्हणून कार्यरत होते. दहशतवादात बळी गेलेल्या पालकांच्या मुलांसाठी चांगले निवासस्थान, अन्न-वस्त्र, शिक्षण, औषधे व त्यांची घरासारखी काळजी घेणे हा ‘मुस्कान’चा हेतू. मार्च २००५ पासून ‘मुस्कान’ ही संस्था कार्यरत होती. कर्नल उदय आपको सलाम!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -