Saturday, May 4, 2024
Homeदेशकोविड अजून पूर्णपणे संपलेला नाही : डॉ.मनसुख मांडवीया

कोविड अजून पूर्णपणे संपलेला नाही : डॉ.मनसुख मांडवीया

नवी दिल्ली (हिं.स) : “कोविड आजार अजून पूर्णपणे संपलेला नाही. काही राज्यांमध्ये कोविड बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे अहवाल मिळत आहेत. अशा वेळी सावध राहणे आवश्यक आहे तसेच संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क वापरणे आणि शारीरिक अंतर राखणे यासारख्या कोविड बाबतच्या योग्य वर्तणुकीचे पालन करणे आवश्यक आहे,” या मुद्द्यावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीया यांनी भर दिला.

हर घर दस्तक २.० या लसीकरण उपक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्यमंत्री तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत ते बोलत होते. देशातील काही जिल्हे तसेच राज्यांमध्ये वाढता कोविड संसर्ग आणि कोविड संसर्ग तपासणीच्या चाचण्यांच्या प्रमाणात झालेली घट हे मुद्दे अधोरेखित करत मांडवीया म्हणाले की, वाढीव तसेच योग्य वेळी केलेल्या तपासणीमुळे कोविड बाधित रुग्ण लवकर ओळखता येतील आणि त्यामुळे समाजात होणारा या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी ते उपयुक्त ठरेल.

विषाणू मध्ये होणारे नवे उत्परिवर्तन अथवा प्रजाती शोधण्यासाठी जनुकीय क्रमनिर्धारणावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश सरकारांना केले. चाचणी, मागोवा, उपचार, लसीकरण आणि कोविडच्या बाबतीत योग्य ठरणाऱ्या वर्तणुकीचे पालन या पंचसूत्री धोरणाची अंमलबजावणी यापुढेही सुरूच ठेवावी आणि राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश सरकारांनी त्यावर नियमितपणे लक्ष ठेवावे असे त्यांनी सांगितले.या आजाराच्या दृष्टीने अधिक असुरक्षित वयोगटातील लोकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्याच्या महत्त्वावर जोर देत त्यांनी राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांना, हर घर दस्तक २.० या एक महिना कालावधीसाठी १ जून पासून सुरू करण्यात आलेल्या विशेष अभियानाच्या स्थिती आणि प्रगतीचा वैयक्तिकरित्या आढावा घेण्यास सांगितले.

ते म्हणाले, “आपण कोविड प्रतिबंधक लसीच्या पहिल्या तसेच दुसऱ्या मात्रेसाठी पात्र ठरणाऱ्या १२ ते १७ या वयोगटातील सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी आपले प्रयत्न अधिक वेगवान केले पाहिजेत, जेणेकरून हे लाभार्थी लसीच्या संरक्षक कवचासह शाळेत उपस्थित राहू शकतील.” राज्य सरकारांनी शाळाआधारित (सरकारी/खासगी/ मदरसे, डे केयर सारख्या अनौपचारिक शाळा) मोहिमांच्या माध्यमातून १२ ते १७ या वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्र्यांनी राज्यांना दिले. याबरोबरच त्यांनी, शाळेत न जाणाऱ्या मुलांच्या लक्षित लसीकरणासाठी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रयत्न करण्यास सांगितले.

६० वर्षांहून अधिक वय असलेल्या गटातील नागरिक असुरक्षित वर्गात मोडतात आणि वर्धक मात्रा देऊन त्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. “आपल्या आरोग्य सुविधा क्षेत्रातील कर्मचारी घराघरांत जाऊन या असुरक्षित गटातील नागरिकांना खबरदारीची मात्रा दिली जाईल याची खात्री करून घेत आहेत.” ते म्हणाले. राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांना वय वर्षे १८ ते ५९ या गटातील नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये दिल्या जात असलेल्या वर्धक मात्रेच्या कामाचा आढावा घेण्यास देखील सांगण्यात आले आहे.

“देशभरात कोविड प्रतिबंधक लसीच्या पुरेशा मात्रा उपलब्ध आहेत. हर घर दस्तक अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात अधिकाधिक लाभार्थ्यांचे लसीकरण होईल याची सुनिश्चिती आपण करून घेतली पाहिजे,” या मुद्यावर त्यांनी अधिक भर दिला.कोविड-१९ प्रतिबंधक लसीच्या मात्रा कोणत्याही परिस्थितीत वाया जाणार नाहीत याची सुनिश्चिती करून घेण्याचे कडक निर्देश राज्यांना देण्यात आले आहेत.केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी देखील या बैठकीत बोलताना, राज्य सरकारांनी हर घर दस्तक २.० अभियानाच्या माध्यमातून नागरिकांचे अधिक वेगाने लसीकरण करावे या मुद्यावर भर दिला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -