Saturday, May 4, 2024
Homeमहत्वाची बातमीउद्धव ठाकरेंचे बिंग फुटले!

उद्धव ठाकरेंचे बिंग फुटले!

रिफायनरीसाठी मुख्यमंत्रीपदी असताना उद्धव ठाकरेंनी पत्र दिले आणि आता करताहेत विरोध

मंत्री उदय सामंत यांनी पत्रासह उघड केला दुटप्पीपणा

नाशिक : महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारसू रिफायनरीसाठी पत्र दिले होते. आज अचानक महाविकास आघाडीतील नेते विरोध करु लागले आहेत, हा दुटप्पीपणा आहे. स्थानिकांचा नाही, काही लोकांचा विरोध आहे. एकीकडे पत्र द्यायचे आणि दुसरीकडे विरोध करायचा, हा दुटप्पीपणा असल्याचा घणाघात मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. रिफायनरीसाठी नाणारऐवजी बारसूची जागा उद्धव ठाकरे यांनीच सुचवल्याचे पत्र देखील सामंत यांनी यावेळी दाखवले.

आज मंत्री उदय सामंत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधात कालपासून आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

उदय सामंत म्हणाले की, नानार रद्द करण्यात आम्ही देखील होतो. बारसूमध्ये रिफायनरी व्हावी, हे पत्र उद्धव ठाकरे यांनी दिले होते. साडे नऊचा इव्हेंट करणारे म्हणतात की रिफायनरी होणार नाही. एकीकडे पत्र द्यायचे आणि दुसरीकडे विरोध करायचा हा दुटप्पीपणा आहे. आंदोलन करुनच मी देखील इथपर्यंत पोहोचलो आहे. स्थानिकांचा नाही, मात्र काही लोकांचा विरोध आहे. काल देखील याबाबत बैठक झाली. ज्याला मला भेटायचे आहे, त्यांना मी भेटेन. उद्योगमंत्र्यांना जाळून टाकू असे जे म्हणत आहेत, त्यांना तुम्ही काय म्हणाल? असा सवालही सामंत यांनी उपस्थित केला आहे. जसे संघर्षवाले आहेत, तसेच समर्थक देखील आहेत. चुकत असेल तर आम्हाला सूचित करा, विरोधकांना कळले की आंदोलन होत नाही, म्हणून हे सुरु आहे. प्रसारमाध्यमांनी देखील काही ठिकाणी आम्हाला सहकार्य करणे महत्वाचे असल्याचे आवाहन यावेळी उदय सामंत यांनी केले आहे.

रिफायनरीसाठी बारसू हे ठिकाण उद्धव ठाकरेंनीच सुचवले होते. ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनीच रिफायनरीच्या समर्थनार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. १२ जानेवारी २०२२ रोजीचे हे पत्र आहे. बारसूमध्ये १३ हजार एकर जमीन राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्याची तयारीही पत्रातून उद्धव ठाकरेंनी दर्शवली होती. तसेच, यातील बहुतांश जमीन ओसाड असल्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्नच येणार नाही, असेही या पत्रात नमूद करण्यात आले होते. राज्य सरकारच्या या पत्रानंतरच केंद्र सरकारने बारसूमध्ये रिफायनरी उभारण्यास परवानगी दिली होती. सध्या हे पत्र सोशल माध्यमांवर देखिल व्हायरल होत आहे. त्यामुळे आता बारसू विरोधात बोलणाऱ्या ठाकरे गटाची मोठी कोंडी झाली आहे.

ते म्हणाले की, बारसू रिफायनरी हा क्रांतिकारी प्रकल्प असून यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे. काही लोकांचे मनसुबे धुळीस मिळाल्यामुळे जालियनवाला बाग होईल, असे म्हटले जात आहे.” ते पुढे म्हणाले की, “सद्यस्थितीत बारसू रिफायनरीबाबत सगळे गैरसमज पसरवले जात आहेत. सकाळपासून सगळी परिस्थिती बघत असून प्रसार माध्यमांबाबत आम्हाला आदर आहे. फक्त एका व्यक्तीबाबत हा प्रश्न आला आहे, ते उलट सुलट प्रश्न विचारत असल्याने झाले असावे, असे सामंत म्हणाले.

मुख्यमंत्री नाराज नाहीत

दरम्यान, सद्यस्थितीत महाराष्ट्रातील राजकारण मुख्यमंत्री पदावरुन ढवळून निघाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या सुट्टीवर आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावर मंत्री उदय सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री नाराज असे कोण म्हणतो? गावच्या जत्रेत जात असतील आणि नाराजीची चर्चा असेल तर जे चर्चा करत आहेत. त्यांचा जत्रेतच नागरी सत्कार करावा लागेल, असेही उदय सामंत यांनी इशारा देत म्हटले आहे. तसेच याच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पुढील निवडणूक लढवली जाणार, हे मुख्यमंत्री दीड वर्ष कायम राहणार असल्याचे ते म्हणाले.

बारसुसंदर्भात मातोश्रीवर खलबत

हे पत्र सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्याने आपले बिंग फुटल्याचे निदर्शनास आल्यानंतर बारसुसंदर्भात मातोश्रीवर खलबत झाल्याची माहिती समोरी आली आहे. रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनप्रकरणी विनायक राऊत आणि संजय राऊत मातोश्रीवर दाखल झाले आहेत. बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या संदर्भात महाविकास आघाडीची अद्याप भूमिका जाहीर नसली तरी कोकण भाग असल्याने शिवसेना ठाकरे गटाने त्यामध्ये उडी घेतली असून याबाबत उद्धव ठाकरे आता काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -