Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेशरद पवारांविरोधात दोन आक्षेपार्ह पोस्ट, अभिनेत्री केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल, तरुण...

शरद पवारांविरोधात दोन आक्षेपार्ह पोस्ट, अभिनेत्री केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल, तरुण ताब्यात

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिच्या विरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे निखील भामरे या ट्विटर युजर विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने तिच्या फेसबुक अकाउंटवरून पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. अॅड. नितीन भावे नावाच्या व्यक्तीने लिहिलेली फेसबुक पोस्ट केतकीने शेअर केली आहे.

यात म्हटले आहे की,

तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll

या पोस्टनंतर ती ट्रोल होत असून तिच्यावर मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूंकडून टीका-टिपण्णी केली होत आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष स्वप्निल नेटके यांनी केलेल्या तक्रारीवरून केतकी विरोधात कळव्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात कलम ५००, ५०५(२), ५०१ आणि १५३ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेटके यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, केतकी चितळेने ही पोस्ट केल्यामुळे पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. केतकीने ही पोस्ट करून दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेषाची भावना, तेढ निर्माण करण्याचे कृत्य केले आहे. शरद पवार यांना उद्देशून बदनामीकारक, मानहानीकारक पोस्ट केतकीने केली असल्याची तक्रार नेटके यांनी कळवा पोलीस ठाण्यात केली आहे.

या संदर्भात राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले की, केतकी प्रसिद्धीसाठी जन्मदात्यांच्या नावाच्या जागी पवार साहेबांचे नाव वापरून प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.

याआधी ११ मे रोजी निखील भामरे या तरुणाच्या ट्वीटर अकाऊंटवरून पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला आहे. “वेळ आली आहे बारामतीच्या “गांधी”साठी… बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची” असे यात म्हटले आहे. या ट्वीटनुसार शरद पवार यांना मारण्याचा आणि समाजात अशांतता निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार धमकी तसेच चिथावणी दिल्याप्रकरणी हा गुन्हा नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यात कलम १५३, १०७, ५०६ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या निखील भामरे या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे या प्रकरणी दिंडोरी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. निखिलच्या मोबाईलमध्ये आणखी काही आक्षेपार्ह मजकूर आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

फेसबुक पोस्टनंतर केतकी चितळे ट्रोल

इतक्या खालच्या पातळीला जाऊन टीका करणे म्हणजे तिच्यात किती ठासून विकृती भरली आहे, याचा अंदाज येतोय, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. केतकीला जास्त महत्त्व देऊ नका. तिला अभिनय क्षेत्रात काम नसल्याने अशा वादग्रस्त पोस्ट करुन तिला चर्चेत यायचे असते, असे दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले आहे. आपले वय किती, आपण बोलतो किती, आपल्या योग्यतेनुसार आपण बोलावे, आपली लायकी आहे का पवारसाहेबांवर बोलण्याची, असे म्हणत एका नेटकऱ्याने केतकीला सुनावले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -