Sunday, June 16, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखपंतप्रधान मोदींना विश्वास, एनडीए ४०० पार करणार

पंतप्रधान मोदींना विश्वास, एनडीए ४०० पार करणार

लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झाले. चौथ्या टप्प्यापासूनच वेगवेगळ्या संस्था, संघटना, यूट्यूबवर भाजपाची घसरण होणार असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. सोशल मीडियावर भाजपाला बहुमत मिळणार नाही व मोदी पंतप्रधान होणार नाहीत अशी आकडेवारी दिली जात आहे. राहुल गांधी, शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्या भावना अशा आकडेवारीतून प्रकट होत आहेत. समाजाला फसविण्याचा एक मोठा प्रयोग चालू आहे. मोदींच्या कारभाराला लोक कंटाळले आहेत, असे कारण देऊन भाजपाला या निवडणुकीत मतदान कमी होत आहे व भाजपा बहुमताचा आकडा ओलांडणार नाही, असे विश्लेषण केले जात आहे.

निवडणूक प्रचारात इंडिया आघाडीचे नेते भाजपाच्या विरोधात भाषणे ठोकतात. मोदींविषयी इंडियातील नेत्यांना पराकोटीचा द्वेष वाटतो आहे हे त्यांच्या भाषणातून व मुलाखतीतून रोज जाणवते. पण सर्व्हे करणारे व स्वयंघोषित विश्लेषक म्हणविणारे ४ जूनला इंडियाचे सरकार येणार हे कशाच्या आधारावर सांगत आहेत? लोकांची दिशाभूल करायची व निकालानंतर इंडिया आघाडीच्या पराभवाचे खापर हे ईव्हीएम मशीनवर फोडायचे हे फार मोठे षडयंत्र आधीपासूनच रचले आहे. त्यातलाच एक भाग म्हणून भाजपाचे दिग्गज उमेदवार पडणार असा गोलमाल प्रचार सोशल मीडियावरून वेगाने चालू आहे.

मतदानाचा पाचवा टप्पा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक मुलाखत देशातील सर्वात मोठ्या मीडिया समूहाच्या दैनिकांत प्रसिद्ध झाली आहे. ही मुलाखत त्यांच्या विरोधकांनी वाचली, तर मतदानानंतर तरी मोदी द्वेष कमी करतील अशी अपेक्षा आहे. मोदींच्या सभा गेले दोन-तीन महिने सर्व देशभर चालू आहेत. त्यांच्या सभांना लोटणारी लक्षावधी लोकांची गर्दी आणि मोदींचा व्यासपीठावर प्रवेश झाल्यावर लोकांकडून उत्स्फूर्तपणे मोदी- मोदी असा होणारा जयघोष ऐकला तर मोदी हे देशाचे पुन्हा पंतप्रधान होणार, मोदी हेच पंतप्रधानपदाची हॅटट्रीक पूर्ण करणार, मोदींच्या नेतृत्वाखालीच केंद्रात पुन्हा भाजपाप्रणीत एनडीएचे सरकार येणार हे मोदींच्या कट्टर शत्रूला मान्य करावे लागेल. पण त्यासाठी त्यांनी डोळ्यांवर ओढलेली झापडे दूर केली पाहिजेत.

लोकसभेत भाजपाचे ३७० खासदार आणि एनडीएचे ४०० हून अधिक खासदार निवडून येणार हा मोदी-शहा यांनी संकल्प जाहीर केला आहे. निवडणूक प्रचारात विरोधी नेत्यांनी मोदी- शहांवर पातळी सोडून टीका केली, पण भाजपाच्या या दोन दिग्गज नेत्यांनी आपला संयम कधीच सोडला नाही. मतदानाच्या चौथ्या टप्प्यानंतरच भाजपाने बहुमत गाठले आहे, असे मोदी- शहा आत्मविश्वासाने सांगत आहेत. पाचव्या टप्प्यानंतर आता आमची वाटचाल ४०० कडे चालू आहे, अशीही या दोन्ही नेत्यांनी पुष्टी जोडली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतील नेत्यांचे पित्त खवळले आहे. सन २०१४ व २०१९ या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे सर्व विक्रम २०२४ च्या निकालाने मोडले जातील व भाजपा विजय मिळविताना नवीन विक्रम निर्माण करील, असे मोदींनी म्हटले आहे. अब की बार ४०० पार हा संकल्प निकालानंतर ४ जून रोजी सत्यात उतरलेला दिसेल असे मोदी सांगत आहेत.

यंदाच्या निवडणुकीत जम्मू-काश्मीरमध्ये अपेक्षेपेक्षा चांगले मतदान झाले व प्रथमच मतदानासाठी काश्मीरमध्ये मतदान केंद्रावर रांगा लागलेल्या दिसल्या, याचे श्रेय मोदी सरकारला दिले पाहिजे. आमचा मतदानावर विश्वास नाही, भारतीय लोकशाहीला आम्ही मानत नाही, असे विष काश्मिरी जनतेच्या मनात वर्षानुवर्षे फुटीरतावाद्यांनी भिनवले होते. पण गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने काश्मीरसाठी व काश्मिरी जनतेसाठी जे काम केले, कल्याणकारी योजना राबविल्या, त्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला, त्याचा परिणाम तेथील मतदारांचा भारत सरकारवर विश्वास वाढला. विशेषत, पंडित नेहरूंच्या काळापासून काश्मीरला विशेषाधिकार देणारे ३७० कलम लागू होते, पण हे कलम रद्द करण्याचे धाडस मोदी सरकारने दाखवले.

मोदी सरकार सत्तेवर नसते, तर या जन्मात ३७० कलम कधीच हटवले गेले नसते. ३७० कलम हटविल्यामुळे काश्मिरी जनतेत असलेली वेगळेपणाची भावना संपुष्टात आली आहे. भारतीय नागरिक म्हणून ते मुख्य प्रवाहात आले आहेत. काश्मीरमध्ये भ्रष्टाचार प्रचंड आहे, सर्व प्रशासन व व्यवस्था भ्रष्टाचाराने बरबटली आहे. वर्षानुवर्षे ठरावीक घराण्यांनी सत्ताकेंद्रे काबिज केली होती. मोदी सरकारने कठोर उपाय योजले, कल्याणकारी योजना थेट जनतेच्या दारात पोहोचवल्या व जनतेत विश्वास निर्माण केला, त्याचाच परिणाम या निवडणुकीत तेथे उत्साहाने भरीव मतदान झाले. मोदी सरकार पुन्हा केंद्रात आल्यानंतर पाकिस्तानव्याप्त काश्मीरही भारतात आणला जाईल, असे भाजपाच्या नेत्यांनी म्हटले आहे. पाकव्याप्त काश्मिरी जनतेलाही तेथील जुलमी प्रशासनाच्या गुलामगिरीतून मुक्त व्हायचे आहे. मोदी पंतप्रधान असतील तरच हे होऊ शकते, इंडिया आघाडीच्या नेत्यांची तशी कुवत नाही आणि तसा ते विचारही करू शकत नाहीत.

महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान पूर्ण झाले आहे. महाराष्ट्रात भाजपाला पूर्वीसारखे यश मिळणार नाही, अशी भाकिते वर्तवली जात आहेत. पण स्वत: मोदी मात्र महाराष्ट्रात भाजपाला चांगले यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करीत आहेत. शरद पवार- उद्धव ठाकरेंच्या घराणेशाहीला लोक कंटाळले आहेत. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील असली शिवसेना व अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाबरोबर आहे. कारण त्यांना देशाचा व राज्याचा विकास साधायचा आहे, असे मोदींनी म्हटले आहे. पराभवाची चाहूल लागल्यामुळे शरद पवार आतापासूनच निकालानंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होतील, अशी भाषा करीत आहेत याचीही आठवण मोदींनी करून दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -