Friday, May 17, 2024
Homeमहामुंबईमतदारांची नावे तपासण्यासाठी ट्रू-व्होटर ॲप

मतदारांची नावे तपासण्यासाठी ट्रू-व्होटर ॲप

हरकती दाखल करण्याचीही सुविधा

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील विविध १४ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्यातील मतदारांची नावे तपासण्याची आणि हरकती दाखल करण्याची सुविधा ट्रू- व्होटर मोबाइल ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सोमवारी येथे दिली.

मदान यांनी सांगितले की, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात आल्या आहेत. त्यावर १ जुलै २०२२ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील.

प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित महानगरपालिकेत किंवा त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यात आपले नाव तपासता येईल. ती सुविधा आता ट्रू-व्होटर मोबाइल ॲपमध्येही उपलब्ध करून देण्यात आली आहे. विधानसभा मतदारसंघाची यादी प्रभागनिहाय विभाजित करताना त्यात नवीन नावांचा समावेश करणे किंवा नावे वगळण्याचा राज्य निवडणूक आयोगाला अधिकार नाही. एखाद्या मतदारास चुकीचा प्रभाग वाटप झाल्यास किंवा विधानसभेच्या मतदार यादीत नाव असूनही महानगरपालिकेच्या मतदार यादीत नाव नसल्यास, हरकत दाखल करता येते. या हरकतींचा लवकर निपटारा होण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने एक नमुना अर्ज तयार केला आहे. त्याद्वारे आपण हरकत घेऊ शकतो आणि ट्रू-व्होटर मोबाइल ॲपद्वारेही सोप्या पद्धतीने हरकत दाखल करता यते, असेही मदान यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -