Monday, May 20, 2024
Homeसाप्ताहिककोलाज|| विश्वरक्षक वृक्षवनम् ||

|| विश्वरक्षक वृक्षवनम् ||

वेदानुसार वृक्ष हे पंचतत्त्व संतुलन करणारे आणि सर्वांना प्रदूषणमुक्त ठेवणारे, या सजीवसृष्टीला शक्ती देणारे, ऑक्सिजनपासून औषधी देणारे असल्यामुळे वृक्षांचा “विषदूषणी” असा उल्लेख केलेला आहे. मानवाला ग्रंथ आयुर्वेदातून ज्ञान मिळत असले तरीही तो निसर्गाचे संवर्धन करण्यास कमी पडत आहे. किंबहुना त्याच्या विध्वंसक वृत्तीमुळे तो सर्वच सजीव सृष्टीचे नुकसान करत आहे.

निसर्गवेद – डॉ. महालक्ष्मी वानखेडकर

या विश्वात भारत हा एक परिपूर्ण सुसंस्कार आणि संस्कृतीचा देश आहे. तो नैसर्गिकरीत्या कसा हे मी कायमच तुमच्यासमोर मांडत असते. या पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी संतुलित वातावरणाची आवश्यकता आहे. यासाठी कोणकोणते महत्त्वाचे घटक आहेत? ते कशा पद्धतीने कार्यरत आहेत आणि प्रत्येक घटकांचा एकमेकांसाठी पूरक कसा उपयोग आहे? हे सर्व आपल्या ग्रंथांमध्ये मुळातच लिहिलेले आहे.

भारतामध्ये आपल्या संस्कृतीत ऋषीमुनी आणि अरण्य यांचे खूप जवळचे नाते आहे. आपल्या ऋषीमुनींनी, संतांनी या अरण्यात बसून जनमंगल कार्यासाठी जे काही मंत्र, वेद, उपनिषद यांच्या रचना केल्या त्यातील रचनांना “आरण्यक” असे म्हणतात. वेदानुसार वृक्ष हे पंचतत्त्व संतुलन करणारे आणि सर्वांना प्रदूषण मुक्त ठेवणारे, या सजीवसृष्टीला शक्ती देणारे, ऑक्सिजनपासून औषधी देणारे असल्यामुळे वृक्षांचा “विषदूषणी” असा उल्लेख केलेला आहे. ऋग्वेदामध्ये असे म्हटले आहे की, असे कुठलेही काम करू नका की जेणेकरून वायुरूपी अमृत याची तुम्हाला कमतरता होईल. कारण जर हा प्राणवायू कमी झाला, तर तुमचा अंत निश्चित आहे. वायू हा तुमच्यासाठी पितृवत असून पोषक आणि सुखकर्ता आहे, तर अथर्व वेदात म्हटले आहे की, जर वायूची कमतरता झाली, तर तुमच्या शरीरात आजार आणि वासना यांचा प्रभाव वाढेल.

या रचना इथे अरण्यात बसून का बरं केल्या असाव्यात याचा विचार कधी केलाय का? आपण पण या शहरी भागातून जेव्हा कोणत्याही जंगलात फिरायला जातो, तेव्हा तिथे किती मानसिक शांती मिळते. का बरं ही मानसिक शांती मिळते? तर याचे कारण तेथील असणारी विविध रंगांची फुले, त्यांचा दरवळणारा सुगंध, अरण्यात असलेल्या विविध औषधी वनस्पती ज्या आपल्याला माहीतही नसतात पण ज्या तुमच्या आरोग्यावर कळत-नकळत परिणाम करत असतात, जंगलातील पक्ष्यांचा किलबिलाटाचा आवाज तुम्हाला खूप सुखकर वाटतोच, पण तुम्हाला एक मानसिक आनंद देतो, परिणामी तुमच्या शरीरातील होणारे बदल तुम्हाला सकारात्मकता देतात आणि म्हणूनच आपल्यालाही जंगलात जायला आवडते. घरात झाडे लावायला आवडतात. त्यांचे संगोपन करायला आवडते. पक्षी पाळायला आवडतात. म्हणजेच आपल्याला मानसिक आणि शारीरिक सकारात्मकतेच्या शक्तीची आवश्यकता आहे जी मुळातच या प्राकृतिक घटकातून आपल्याला मिळत असते.

आपल्या ग्रंथांमध्ये “वृक्षार्युवेद” नावाचा जो ग्रंथ लिहिला आहे, त्यात या वृक्ष वनस्पतींचा महिमा वर्णन केलेला आहे. वृक्षार्युवेद हा एक प्राचीन संस्कृत ग्रंथ आहे, जो “सुरपाल” यांनी लिहिला आहे. ते राजा भीम पालचे राज दरबारी असून कवी आणि वैद्य होते. यात वृक्ष-वनस्पती यांच्या वृद्धीसाठी आणि साहजिकच पर्यावरण संतुलनासाठी असणारे ज्ञान आहे. त्यातही या वृक्ष वनस्पतींचा महिमा वर्णन केलेला आहे. “गुल्म वृक्षारिवेद” हा महर्षी पराशर लिखित वनस्पती शास्त्रासंबंधित प्राचीन ग्रंथ आहे. वृक्षाचा स्वास्थ्य पूर्ण विकास, आयुर्वेदिक औषधी असणारा “धन्वंतरी” हा सुद्धा खूप मोठा ग्रंथ आहे. गीतेमध्ये तर कृष्णाने म्हटले आहे की,
‘अहम् क्रतुरहं यज्ञ: स्वाधाहमहमौषधम्’
म्हणजेच मीच यज्ञ आहे आणि मीच वृक्ष आहे आणि वृक्षांमधील औषधही मीच आहे.
प्रत्येक वृक्ष हे औषधरूपीच आहे. प्रत्येक वृक्ष देवाचे स्वरूप आहे. जसे कृष्ण अश्वत्थ अश्वरूपी म्हणजेच पिंपळ. भगवान विष्णूचे रुद्ररूपी म्हणजे वट. ब्रह्मस्वरूप हे पलाश.

महाभारत रामायणात सुद्धा वृक्षांची आपल्याशी असणारी जवळीक याचे अत्यंत सुंदर वर्णन केले आहे. अशा झाडांची नावे दिली गेलेली आहेत की, ज्याच्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील आणि तुम्हाला नरक यातना होणार नाहीत. जर तुम्ही झाडे लावलीत, तर पूर येणार नाही, प्रदूषण होणार नाही, जमिनीची धूप होईल आणि पंचतत्त्व संतुलन होऊन तुमचे आयुष्य सुखमय होईल असेच वर्णन पृथ्वीसुक्तातही आहे.

गेल्या लेखात मी तुम्हाला सांगितले होते की, कुठल्या देवाला कुठले फूल, फळ आवडते. बौद्ध, जैन धर्मातही वनप्रवास आणि वृक्षोत्सवाचे अत्यंत सुंदर वर्णन आहे. आपल्या वास्तुकलेत मंदिरांमध्ये उत्कृष्ट वृक्ष, पाने, फुले व वेली यांचे शिल्पकलेत चित्रण दिसते. तसंच सर्व जगात कोणत्या ना कोणत्या रूपाने वनस्पती-वृक्षांना परमेश्वर मानतात. आपल्या घरातीलच एक सदस्य म्हणून त्याची सेवा करतात.

मातृभूमी: पुत्रोहम पृथ्वी… मागील लेखात याचा उल्लेख आहे. जोपर्यंत आपण या वृक्ष वनस्पतीशी भावनिक जवळीक करणार नाही, त्याला कुटुंबातील एक सदस्य समजणार नाही, “वसुधैव कुटुंबकम्”प्रमाणे त्याचे संरक्षण, संवर्धन करणार नाही, तोपर्यंत आपली वृक्षतोड थांबवू शकणार नाही, तोपर्यंत पर्यावरणाचे संतुलन होणार नाही आणि या सजीव सृष्टीचेही. खरं तर या विश्वातील अगदी सूक्ष्मातील सूक्ष्म कणांबद्दल लिहायचे म्हटले तरीही त्याचे गहण संशोधनात्मक लिखाण आपण लिहू शकत नाही. जरी ते किती लिहिण्याचा प्रयत्न केला तरी कमीच पडेल.

“याज्ञवल्क्य स्मृती”मध्ये वृक्षतोड हा गुन्हा मांडण्यात आला असून त्याला कडक शिक्षेचा कायदा देण्यात आला आहे. भारताचे विज्ञान हे जगात श्रेष्ठ आहे. या जगाने त्याचे अनुकरण करायला पाहिजे. भारताने दुसऱ्या कुठल्याही देशाचे अनुकरण करण्याची गरज नाहीये. आजच्या ग्लोबल वॉर्मिंगच्या या परिस्थितीत कुठे तरी आपल्या सनातनी धर्माप्रमाणे, या रूढी परंपरांप्रमाणे वागून आपल्याला भूमीचे संरक्षण करावेच लागेल, तेव्हाच आपली पृथ्वी ही भूमाता सशक्त होऊ शकेल.

जंगलात पालकाची भूमिका करणारा एक वृक्ष हा असतोच. जो त्याच्या आसपास असणाऱ्या सर्व वृक्ष वनस्पतींचे जमेल तेवढे संरक्षण करतो. जमिनीखाली असलेले मुळांमार्फत गेलेले संपर्काचे जाळे (नेटवर्क) हे सर्व एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी असतात. प्रत्येक झाड, पान, फूल हे एकमेकांना संरक्षित करण्याचा प्रयत्न करीत असतात. या न बोलणाऱ्या पण त्यांचं कर्म योग्य पद्धतीने करणाऱ्या सर्वांना स्वतःच्या पानरूपी पंखांखाली घेऊन आसरा देणाऱ्या वृक्षाची वृक्षतोड करायाची का?

या अशा प्रकारे निसर्गाच्या जवळ जाऊन त्याचे संतुलन करण्यासाठी आणि सर्व सजीव सृष्टीच्या कल्याणासाठी ब्रह्मांडापासून या पृथ्वीपर्यंत जे काही ग्रंथ लिहिले गेले आहेत, ते या जगामध्ये फक्त आपल्या भारतातच
आहेत. म्हणूनच मी कायम आपल्या सनातन धर्माला श्रेष्ठ म्हणत असते.

प्रत्येक वनस्पती ही सजीव सृष्टीतील प्रत्येक घटकाच्या शरीर शास्त्राशी निगडित आहे. हे ज्ञान प्रत्येक पशुपक्ष्याला मुळातच असते. कसे? ही एक अद्भुत आणि गुढ गोष्ट आहे. पण मानवाला हे आयुर्वेदातून, ग्रंथांमधून ज्ञान मिळत असले तरीही तो या वृक्ष वनस्पतींचे या निसर्गाचे संवर्धन करण्यास कमी पडत आहे. किंबहुना त्याच्या विध्वंसक वृत्तीमुळे तो या सर्वच सजीव सृष्टीचे नुकसान करत आहे. या सर्व गोष्टीची त्याला जाणीव न होण्याचे कारण एकच आहे त्याच्यातील तमो गुण. त्या तमोगुणांमुळे त्याची जर स्वतःच्या मित्र-नातेसंबंधांशी जवळीक होत नाही, तर निसर्गाशी तरी जवळीक कशी होईल? त्यासाठी आपल्याला आपले संस्कार आणि संस्कृती वृद्धिंगत करून या निसर्गाला देवता मानून या विश्वरक्षक वृक्ष वनांचे संवर्धन आणि संरक्षण करणे, त्यांच्याशी जवळीक करणे आवश्यक आहे.

dr.mahalaxmiwankhedkar@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -