Friday, May 17, 2024
Homeसाप्ताहिककोलाजशिमगोत्सवातून पर्यटनवृद्धी व्हावी!

शिमगोत्सवातून पर्यटनवृद्धी व्हावी!

  • कोकणी बाणा: सतीश पाटणकर

कोकणात साजऱ्या करण्यात येणाऱ्या विविध सणांमध्ये ग्रामदेवतेच्या शिमगोत्सवाला जेवढं महत्त्व आहे तेवढे खचितच अन्य सणांना असेल. या सणात येथे प्रचंड संख्येने येणाऱ्या भक्तांमुळे स्थानिक व्यावसायिकांच्या दृष्टीने ती एक पर्वणी ठरते; परंतु स्थानिक स्वरूपाच्या कोकणातील अशा उत्सवांचा पर्यटनाच्या वृद्धीसाठी फारसा प्रयत्न केला गेलेला नाही. शेजारच्या गोवा राज्यातील कार्निव्हलसाठी जगभरातून पर्यटक येत असतात. त्यासाठी तेथील राज्य सरकार जय्यत तयारी करीत असते. कोकणात तसे काही होत नाही.

फाल्गुन महिना सुरू झाला की, साऱ्यांनाच होळीचे वेध लागायला सुरुवात होते. वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल देणारा हा सण देशभरात वेगवेगळ्या स्वरूपामध्ये साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये कोकण आणि गोवा भागामध्ये होळीचा सण हा शिमगा म्हणून साजरा केला जातो. कोकणवासीयांसाठी गणेशोत्सवानंतर शिमगोत्सवाची विशेष उत्सुकता असते. फाल्गुन पंचमीपासून पौर्णिमेपर्यंत होळीच्या सणाची विशेष लगबग असते. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मालवणसह गोव्यात होलिका दहनापासून ग्रामदेवतांची पालखी नाचवणं, दशावतराची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आलेली असते. आता ते कोकणातीलच नव्हे, तर महाराष्ट्रभरच्या थोरा-मोठ्यांना माहीत झाले आहे. त्यामुळे तेथे प्रचंड संख्येने येणाऱ्या भक्तांमुळे स्थानिक व्यावसायिकांच्या दृष्टीने ती एक पर्वणी ठरली आहे; परंतु स्थानिक स्वरूपाच्या कोकणातील अशा उत्सवांचा पर्यटनाच्या वृद्धीसाठी फारसा प्रयत्न केला गेलेला नाही. शेजारच्या गोवा राज्यातील कार्निव्हलसाठी जगभरातून पर्यटक येत असतात. त्यासाठी तेथील राज्य सरकार जय्यत तयारी करीत असते. कोकणात तसे काही होत नाही. फाल्गुन शुद्ध पंचमीला (फाक पंचमी) सुरू होणारा शिमगोत्सव त्यापुढील दहा दिवस हुताशनी पौर्णिमेपर्यंत (होळीपर्यंत) साजरा केला जातो.

कोकणात गौरी-गणपतीप्रमाणेच महाशिवरात्र आणि होळी-शिमगा हे मोठ्या धुमधडाक्यात साजरे केले जाणारे सण आहेत. होळी हा कोकणातील पारंपरिक आणि लोकप्रिय असा सण तर आहेच, पण तो आकर्षक सजावटी व गुलालाची उधळण करीत मोठ्या जल्लोषात सर्व जाती-धर्माच्या ग्रामस्थांना एकत्र करून साजरा केला जाणाराही सण आहे. विशेष म्हणजे कोकणातील प्रत्येक गावामध्ये साजरा होणाऱ्या शिमगोत्सवाच्या परंपरा वेगवेगळ्या स्वरूपाच्या आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या शिमगोत्सवाच्या निमित्ताने नैसर्गिक विविधतेने नटलेल्या कोकणात सांस्कृतिक विविधताही पाहावयास मिळते. या शिमगोत्सवाला पर्यटनाची जोड देण्याचा विषय गेली काही वर्षे चर्चेत आहे. नाचत-नाचत माडहोळी आणणे, नमनाचे खेळे, रोंबाट, संकासूर, आंब्याची पाने व विविध प्रकारच्या फुलांनी सजविलेली होळी, ढोल-ताशाच्या गजरात आरोळ्या ठोकत ग्रामदेवतेच्या पालख्या मानकऱ्यांच्या घरी नेणे या साऱ्या नावीन्यपूर्ण चालीरितींचा पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी चांगला उपयोग करून घेता येऊ शकतो. गोव्यातील कार्निव्हल तसेच कर्नाटक सरकारच्या कदंब आणि करावली उत्सवांप्रमाणेच कोकणातील शिमगोत्सव ही जगभरातील पर्यटकांचे आकर्षण ठरू शकतो.

शिमगोत्सव म्हणजे ग्रामदेवतेचा गजर. फाक पंचमीपासून आबालवृद्धांमध्ये एक अनामिक जोश निर्माण होतो. ग्रामदेवतेचा जयजयकार करताना शिमगोत्सवात प्रत्येक गावच्या प्रथा जरी वेगळ्या असल्या तरी सर्वांचा उद्देश आपल्या ग्रामदेवतेपुढे नतमस्तक होणे एवढाच असतो. शिमगा आणि मानपान यांचे खूप जुने आणि भावनिक नाते आहे. नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या सुरळीत पार पडल्या की, हा उत्सव उत्तरोत्तर रंगत जातो. कोकणच्या ग्रामीण भागात शिमगोत्सवाच्या आधी लग्नविधींचे मुहूर्त घेण्याची प्रथा असल्याने फाक पंचमीपासून गावागावातून उत्साहाचे वातावरण असते. नव्याने लग्न झालेले जोडपे होळीच्या भोवती प्रदक्षिणा घालून होमात श्रीफळ अर्पण करतात. असे श्रीफळ अर्पण केल्याशिवाय जणू लग्नविधी पूर्णत्वास जात नाही, एवढी नितांत श्रद्धा यामागे असते. गावाची वेस बदलली की, शिमगोत्सव साजरा करण्याची प्रथा बदलते. रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध भागांतील शिमगोत्सवाच्या आगळ्यावेगळ्या प्रथा अक्षरशः अचंबित करणाऱ्या आहेत. भक्तगणांनी अज्ञात स्थळी जमिनीखाली पुरून ठेवलेल्या खुणा पालखी शोधून दाखवते. हा सोहळा म्हणजे नितांत श्रद्धेवर आरूढ झालेल्या भक्तिमय वातावरणाचा एक अनोखा संगम असतो. जमिनीत पुरून ठेवलेल्या खुणेजवळ पालखी आली की ती एवढी जड होते की, खुणेजवळ पालखीचा खूर आपटतो. त्या ठिकाणी खणल्यावर लपविलेली खूण सापडली की, उपस्थित हजारो भक्तगणांकडून ग्रामदेवतेच्या नावाचा जयजयकार केला जातो. एक प्रकारे भक्ताने देवाच्या परवानगीनेच त्याची परीक्षा बघण्याचा हा सोहळा असतो. खूण शोधण्याच्या प्रथेमुळे भक्तगणांचा ग्रामदेवतेवरील तसेच या उत्सव परंपरेवरील विश्वास अधिक दृढ होत असतो. चिपळूण, लांजा आणि रत्नागिरी तालुक्यात पालख्यांकडून खुणा शोधण्याचे सोहळे संपन्न होतात.

चिपळूण तालुक्यातील सावर्डे परिसरात साजरा होणारा होल्टे होम हा एक असाच चकित करणारा शिमगोत्सवातील प्रकार आहे. होम पेटविण्याच्या दरम्यान एकमेकांवर पेटती लाकडं फेकून मारली जातात. विशेष म्हणजे या प्रकारात कोणाला काही इजा होत नाही. या आगळ्या प्रथांदरम्यान आपल्या भक्ताची काळजी घेण्याची जबाबदारी जणू ग्रामदेवतेवर असते आणि ती प्रत्येक वर्षी सुरळीत पार पाडली जाते. संगमेश्वर तालुक्यातील कडवई घोसाळकर कोंड येथे होळीचा माड उभा करताना त्याला हात न लावण्याची प्रथा आहे. जमिनीवर आडवा असणारा हा माड शेकडो भक्तगण काठीच्या सहाय्याने उचलतात आणि मोठ्या कल्पकतेने काठ्यांचा आधार देतच उभा करतात. ढोल-ताशांचा आणि ग्रामदेवतेच्या नावाचा गजर भक्तगणांमध्ये अनामिक शक्ती निर्माण करत असतो.

ढोल हे शिमगोत्सवातील प्रमुख वाद्य. ढोलावर थाप पडली की, त्या नादाने भक्तांचे पाय आपोआप थिरकायला लागतात. ढोलांचा आवाज आला की, भक्तगण घरातून नकळत बाहेर पडतोच. गावच्या ग्रामदेवता मंदिराजवळ गावची सहाण असते. याच ठिकाणी रूप लागलेल्या ग्रामदेवतेच्या मूर्ती पालखीत विराजमान झालेल्या असतात. कोकणात दोन प्रकारचे शिमगोत्सव साजरे होतात. त्रयोदशीच्या शिमग्यांना तेरसे, तर पौर्णिमेच्या शिमग्यांना भद्रेचे शिमगे असे
म्हटले जाते.

बहुसंख्य गावातून सहाणेजवळ उभा करायचा माड म्हणून आंब्याचे मध्यम आकाराचे झाड निवडले जाते, तर काही गावांतून सुरमाड किंवा पोफळ उभी करण्याची परंपरा आहे. संगमेश्वर तालुक्यातील आंबेडखुर्द गावात पौर्णिमेच्या रात्री स्वच्छ पिठूर चांदण्यात साजरा होणारा शिमगोत्सव सोहळा दृष्ट लागण्यासारखा असतो. हा संपूर्ण सोहळा अन्य कोणत्याही प्रकाशाविना केवळ चांदण्याच्या स्वच्छ प्रकाशात संपन्न होतो. या शिमगोत्सवाची महती एवढी आहे की, येथे कोणत्याही प्रकारची नशा करून आलेलं चालत नाही. संगमेश्वर नजीकच्या करंबेळे गावात संपन्न होणारा शिमगोत्सव म्हणजे शिवने आणि करंबेळे येथील दोन पालख्यांची गळा भेट असते. नजीकच्या वांद्री गावात पालख्यांची भेट नदी पात्राच्या मध्यभागी होते. हा आगळावेगळा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक गर्दी करतात.

फाक पंचमीला गावातील दहा-पंधरा मुलांचा समूह होळीच्या ठिकाणाजवळ एकत्र येतो. रोजच्यासाठी चिव्याची होळी आणली जाते. ही होळी सायंकाळी उभी केली की, उर्वरित सोपस्कार रात्रीच्या अंधारात पार पाडले जातात. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घरातील एक याप्रमाणे सर्व मंडळी होळीजवळ जमून सर्व नियोजन करतात. होळी आणि चोरी यांचंही एक अतूट नातं आहे. या कालावधीत कवळ, लाकडं, कलिंगड, पावट्याच्या शेंगा, नारळ यांसारख्या गोष्टी चोरून आणून रात्रीच या सर्व वस्तूंचा फडशा पाडण्याची एक प्राचीन पद्धत आहे. समूहातील अन्य मंडळी आवश्यक चिजवस्तू घेऊन येईपर्यंत उर्वरित मंडळी होळीजवळ आट्यापाट्यांचा प्राचीन खेळ खेळत असतात. खाण्याच्या वस्तूंची चोरी यामागील उद्देश गुन्हेगारी स्वरूपाचा नसल्याने अशा चोऱ्यांकडे सर्रास दुर्लक्षच केले जाते.

नोकरी व्यवसायानिमित्त दूरवर असणारा कोकणातील माणूस शिमगोत्सावासाठी आवर्जून घरी येतो. ग्रामदेवतेपुढे नतमस्तक होणे, पालखी आपल्या घरामध्ये घेऊन देवीची ओटी भरणे आणि सालाबादच्या रखवालीचा नारळ अर्पण करणे हा एकमेव भक्तिमय उद्देश यामागे असतो. शिमगोत्सवात नमनखेळे, गोमू, संकासूर अशा विविध नृत्य प्रकारांचीही रेलचेल असते. पालखी आधी किंवा नंतर खेळे, संकासुर घरोघरी जाऊन पोस्त घेतात. फाक पंचमीपासून कोकणात ढोल वाजू लागल्याने शिमगोत्सवाचा ज्वर चढू लागला असून चाकरमान्यांच्या मांदियाळीला सुरुवात झाली आहे. पुढील २० दिवस केवळ ग्रामदेवतेच्या जयजयकाराचाच आवाज कोकणच्या कडेकपारीत घुमतो.

रत्नागिरीतील संगमेश्वर परिसरात शिमगोत्सवाच्या निमित्ताने साजरा होणारा शिंपणे उत्सव संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात नावीन्यपूर्ण आहे. शिमग्यातील होम प्रज्वलित करून देवीच्या पालख्या घरोघरी जाऊन राजांगणी बसल्या की, साऱ्या संगमेश्वरला शिंपण्याचे वेध लागतात. रंगपंचमीनंतर आकर्षक सजविलेल्या बैलगाड्यांतून होणारी केवळ शौर्याच्या लाल रंगाची उधळण हे या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. इतर रंगांना तेथे मज्जाव असतो. या लाल रंगात वय, जात-पात, सामाजिक स्थान विसरलेले आबालवृद्ध पुरुष एकत्र येऊन अक्षरश: मनसोक्त डुंबत असतात. आदल्या दिवशी रात्रीपासून सुरू झालेला हा सोहळा दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत उत्साहात साजरा केला जातो. तेथील देवी जाखमाता आणि देवीनिनावी यांच्या मंदिरांमध्ये भक्तांसाठी रात्री मटण-भाकरीचा प्रसाद वाटला जातो. प्रतिवर्षी पंधरा ते वीस हजारांपेक्षा जास्त भाकऱ्या प्रसाद म्हणून वाटल्या जातात. या प्रसादाचे वाटप केल्यानंतर उत्सव संपतो.

(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -