Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीनिवडणूक विषयक कामकाजास सर्वोच्च प्राधान्य -जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर

निवडणूक विषयक कामकाजास सर्वोच्च प्राधान्य -जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नेमून दिलेल्या अधिकारी – कर्मचाऱ्यांनी त्यांची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी. निवडणूक विषयक कामकाजास सर्वच नियुक्त अधिकारी कर्मचारी यांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे. विहित वेळेत कामे पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिले.

मुंबई शहर उपनगर जिल्हा कार्यालयात आज जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. क्षीरसागर यांनी मुंबई शहर उपनगर जिल्हा अंतर्गत चारही लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह निवडणूक कामाशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी अपर जिल्हाधिकारी गोहाड, उपजिल्हाधिकारी दादाराव दातकर व वंदना सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी शशिकांत काकडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तेजस समेळ, आदींची उपस्थिती होती. इतर अधिकारी हे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

येत्या काही दिवसात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर होईल. या निवडणुकीत आचारसंहिता काळात सर्व नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्या पातळीवर पथकाच्या स्थापना करावयाच्या आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक मनुष्यबळ आणि सर्व साधनसामुग्री संबंधित यंत्रणांना पुरविण्यात येईल असेही जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.

चारही लोकसभा मतदारसंघात १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवा मतदारांची नोंदणी करण्यावर भर देण्यात यावा. त्याचबरोबर मतदान जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून मतदार संघातील प्रत्येक भागातील नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देण्यात यावे. मतदारसंघाचा विस्तार मोठा असल्याने कामकाजात अधिक गतिमानता आणणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचना आणि निर्देशाप्रमाणे सर्व कार्यवाही होणे अपेक्षित आहे. मतदार याद्यांचे अद्यावतीकरण, मतदान केंद्र संख्या, तेथील व्यवस्था, आदर्श मतदान केंद्र उभारणी या सर्व बाबींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी क्षीरसागर यांनी केल्या.

भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचना आणि निर्देश यांच्याबाबत वेळोवेळी राजकीय पक्षांना अवगत करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी चारही निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -