Monday, May 20, 2024
Homeदेश'टीएमसी म्हणजे अत्याचार, भ्रष्टाचार आणि घराणेशाही; विश्वासघाताचे दुसरे नाव म्हणजे टीएमसी, गरिबांची...

‘टीएमसी म्हणजे अत्याचार, भ्रष्टाचार आणि घराणेशाही; विश्वासघाताचे दुसरे नाव म्हणजे टीएमसी, गरिबांची लूट केली’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल

कृष्णनगर : लोकसभा निवडणुकीपूर्वी बंगाल दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. कृष्णनगरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, “टीएमसी हे अत्याचाराचे दुसरे नाव आहे. टीएमसी म्हणजे विश्वासघात, भ्रष्टाचार आणि घराणेशाही. टीएमसीने गरिबांची लूट केली आहे. ममता बॅनर्जींच्या टीएमसीला लोकांना गरीब ठेवायचे आहे. त्यामुळे पश्चिम बंगालचा विकास होणे आवश्यक आहे. मोदींनी पश्चिम बंगालला पहिले एम्स दिले आहे.”

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, “ही भूमी भगवान कृष्णाच्या भक्तीचे सर्वोच्च प्रचारक चैतन्य महाप्रभू यांची जन्मभूमी आहे. चैतन्य महाप्रभूंच्या चरणी नतमस्तक होतो. हे माझे सौभाग्य आहे की काही दिवसांपूर्वीच मला समुद्राच्या खोल पाण्यात जाऊन भगवान श्रीकृष्णाच्या प्राचीन भूमीला, भगवान श्रीकृष्णाने स्थापन केलेल्या द्वारका नगरीला नमन करण्याचे भाग्य लाभले.”

“एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण इथे जमलेले पाहून ‘एनडीए सरकार, ४०० पार’ हे सांगण्याचा आत्मविश्वास मला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये हा माझा दुसरा दिवस आहे. गेल्या २ दिवसात मला बंगालसाठी विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्याची संधी मिळाली. यामुळे गुंतवणूक येईल, रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि शेजारच्या भागावर परिणाम होईल. मात्र, तृणमूल सरकारने बंगालच्या जनतेचा अपेक्षाभंग केला आहे, हे मान्य करावे लागेल. लोकांची ते सतत फसवणूक करत आहेत.”

“बंगालमध्ये ज्या प्रकारे टीएमसी सरकार चालवत आहे, त्यामुळे बंगालची निराशा झाली आहे. पश्चिम बंगालच्या जनतेने मोठ्या अपेक्षेने टीएमसीला एवढा मोठा जनादेश वारंवार दिला आहे, पण टीएमसी हे अत्याचार आणि विश्वासघाताचे दुसरे नाव झाले आहे. तृणमूल काँग्रेससाठी बंगालचा विकास नसून भ्रष्टाचार आणि घराणेशाहीला प्राधान्य आहे” असे मोदींनी म्हटले. सभेला संबोधित करण्यापूर्वी त्यांनी एका सरकारी कार्यक्रमादरम्यान पश्चिम बंगालमध्ये १५,००० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -