Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीShinde- Fadnavis Government : ही दोस्ती तुटायची नाय !

Shinde- Fadnavis Government : ही दोस्ती तुटायची नाय !

जाहिरातीवरील ढोबळ चर्चांना शिंदे-फडणवीस यांचे प्रत्युत्तर

मुंबई : राज्यात प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर १३ जूनला मंगळवारी मुख्यमंत्र्यांबाबत छापून आलेल्या जाहिरातीमुळे विरोधी पक्षांना चघळायला एक विषय मिळाला होता. यानंतर काल सर्वांचे फोटो असलेली जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. मात्र तरीही विरोधी पक्षांमध्ये भाजप-शिवसेना (BJP-Shivsena) युतीत फूट पडल्याच्या चर्चा रंगत होत्या. यावर आज पालघर येथे झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी भाष्य करत युतीत सर्व काही सुरळीत असल्याचे सांगितले.

आमचे सरकार आणि महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये फरक आहे. शासन आपल्या दारी उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. देवेंद्रजी पाच वर्षे मुख्यमंत्री असताना सुरु केलेल्या योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केल्या. आता आपलं सरकार आल्यानंतर योजना पुन्हा सुरू केल्या आहेत. आताचे शासन बदलले आहे. सरकारी कार्यालयात आता खेटे मारायला लागत नाहीत. आपल्या योजना थेट लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असा आमचा उपक्रम आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

डबल इंजिन सरकार येण्यापूर्वी सर्व कामांना ब्रेक लागले होते, आता सरकारने ४०० चांगले निर्णय घेतले. आमची युती सत्तेसाठी झाली नसून एका वैचारिक भूमिकेतून ही युती झाली आहे. मिठाचा खडा आम्ही बाजूला केला. फडणवीस आणि माझी दोस्ती २५ वर्षांपासून आहे. जिवाभावाची आमची मैत्री आहे. फेविकॉल लावलेली आमची जोडी आहे, हे बॉन्डिंग तुटणार नाही, असा दावा त्यांनी केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा लोकप्रिय उपमुख्यमंत्री असा उल्लेख केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही युतीत सर्व काही आलबेल असल्याचे स्पष्ट करताना म्हटले की, आम्ही दोघेही गेल्या २५ वर्षांपासून एकत्र काम करतोय पण गेल्या वर्षभरात आमचे नाते घट्ट झाले आहे. आम्ही नेहमी एकत्र राहणार. जाहिरातीमुळे आमच्यात दुरावा येणार नाही. आमच्या एकत्र प्रवासाची चिंता नको. कोणत्याही जाहिरातींमुळे वाद होईल इतकं आमचं सरकार तकलादू नाही. मागचं सरकार आपल्याला घरी बसलेलं पाहायला मिळालं, मात्र आत्ताचं सरकार आपल्या दारी आहे, असा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना लगावला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -