Monday, May 20, 2024
Homeमहत्वाची बातमी...तर मराठा समाज तुमच्या पाठीशी उभा राहिला असता

…तर मराठा समाज तुमच्या पाठीशी उभा राहिला असता

श्री शरदचंद्रजी पवार साहेब,

सस्नेह नमस्कार…

सन्माननीय, देशाचे नेते, महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व, महाराष्ट्रात चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषविलेले ज्येष्ठ नेते पवार साहेब तुमच्यावर टिपणी लिहिणं किंवा तुमच्यावर एखादा लेख लिहिणं एवढे आम्ही नक्कीच मोठे नाही आहोत. तुमच्याबद्दल नितांत आदर नक्कीच आहे. कारण तुम्ही मराठा समाजाचे नेते आहात. (पण तुमच्या या मुत्सद्दी, चतुर, राजकारणी स्वभावाचा फायदा मराठा समाजाला झाला की नाही हा एक संशोधनाचा विषय आहे) आपण समाजासाठी खूप काही करू शकला असता, तेवढी आपली पात्रता आणि परिपक्वता नक्कीच होती. वादळ शमवण्याची ताकद तुमच्यात होती. ५५ वर्षे राजकारणात तुम्ही घालवली. तुमचे योगदान हे फार मोठे आहे हे नाकारता येणार नाही. तुम्ही एवढे मुत्सद्दी आहात की कोणाला फोडायचं, कुठे जोडायचं आणि सरकार बनवायचं, ही तुमची मुत्सद्देगिरी नक्कीच संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. आता तुमच्या घरावर झालेला हमला हा आम्हाला मान्यच नाही. पण पवार साहेब एक खंत आहे की, ५५ ते ६० वर्षांत तुम्ही मराठा समाजासाठी खूप काही करू शकत असूनसुद्धा तुम्ही ते केले नाही ही शोकांतिका आहे. आज तुमच्यासारखा नेता मराठा समाजाला आरक्षण नक्कीच मिळवून देऊ शकला असता, एवढी ताकद तर तुमच्यात नक्कीच होती. ९६ कुळी मराठा म्हणून आपण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्म घेतला. तुम्ही नक्कीच चमत्कार केला असता. संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज ३०% आहे. अनेक लोक आपल्या समाजासाठी झगडतात; परंतु आपण मराठा समाजासाठी झगडल्याचे दिसत नाही. कदाचित मराठा समाजाला तुम्ही आरक्षण दिले असते, तर तुमची एकहाती सत्ता येण्यास कुठलेही दुमत झाले नसते आणि पूर्ण काळ म्हणजेच ५ वर्ष मुख्यमंत्रीपदाचा उपभोग घेणारे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही प्रसिद्ध झाला असतात. मराठा समाज पूर्णपणे तुमच्या पाठीशी उभा राहिला असता. जयललिता, ममता आणि केजरीवाल यांनी एकहाती सत्ता भोगली. तुमच्याही पदरात ती नक्कीच पडली असती आणि समाजाला एक मोठा नेता पाठीशी उभा राहिला, याचा आनंद नक्कीच झाला असता. आरक्षणामुळे कितीतरी मराठा तरुण शिक्षण घेऊनही बॅकफूटवर गेले. पवारसाहेब किमान मराठा समाजासाठी नोकरीची वयोमर्यादा २८ वरून ३५ केली असती तरीही मराठा समाज तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला असता. ५५ वर्षे तुम्ही देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सूर्यासारखे तळपत होतात. आपले एक मंत्री नवाब मलिक तुरुंगात गेले तेव्हा तुम्ही एक उद्गार काढले होते “हिसाब चुकता हो जायेगा!” नवाब मलिक आत गेल्याचा दिवसाचा, मिनिटाचा, तासाचा हिशोब घेतला जाईल. असेच वाक्य जेव्हा मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे निघाले, तेव्हा तुमच्या तोंडून एक वाक्य निघालं असतं की, “होय मोर्चे निघाले त्या मराठा समाजाचा मी नेता आहे आणि माझा त्याला संपूर्ण पाठिंबा आहे.” पण हे मराठा समाजाच्या नशिबी नव्हतं. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काही मर्यादित काळासाठी काही समाजाला आरक्षण दिले होते, हे सर्वांना आणि तुम्हाला पण नक्कीच माहिती असेल. साहेब त्यामुळे मराठा समाजाचे फार मोठे नुकसान झालेले आहे. साहेब एक म्हण आहे म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावला. एका गुणी, हुशार, कर्तुत्ववान मराठा नेत्याकडून खूपच अपेक्षा होती साहेब! नक्की त्याचं कारण मराठा समाज योग्य नेता नसल्यामुळे यातना सोसतो आहे. खरंच अगदी मनापासून प्रामाणिक हेतूने एक साधा मराठा म्हणून आपणास पत्र लिहावं असं वाटलं म्हणून लिहितो आहे. साहेब चूक भूल द्यावी-घ्यावी…

– विश्वास सावंत

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. हि व्यथा प्रत्येक मराठी माणसाची आहे. साहेबांबद्दल आदर आहे कारण त्यांच्या एवढा हुषार माणूस राजकारणात शोधून सापडणार नाही. पण मराठी माणूस असूनही मराठ्यांबाबत त्यांच्या मनात कधीच कळवळा निर्माण होत नाही याची प्रत्येकवेळेस प्रचीती येते. खरच मराठ्यांना कोणी वाली उरला नाही अस वाटत.

Comments are closed.

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -