Sunday, May 19, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यसगळं जग बिझी आहे... आपणच रिकामे आहोत का?

सगळं जग बिझी आहे… आपणच रिकामे आहोत का?

  • फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे

हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडत असेल. आपणच रिकामे आहोत, सगळे कामात व्यस्त आहेत, आपल्याला भेटायला, बोलायला, वेळ द्यायला कोणाकडे वेळच नाही हा प्रत्येकाचा अनुभव आहे. आजमितीला सगळ्यात मौल्यवान आणि महाग काही असेल, तर तो लोकांचा वेळ आहे. सगळं काही मिळतं, पण कोणाला आपल्यासाठी वेळ मिळत नाही ही सर्वसामान्य तक्रार सगळ्यांची असते.

घरातले असोत, नात्यातील असोत, बाहेरील असोत, वैयक्तिक रिलेशन असोत, मैत्री असो की व्यावसायिक संबंध असोत, प्रत्येकजण प्रचंड बिझी आहे, प्रत्यक्ष भेटून वेळ देणे तर सोडाच लोकांना फोन घ्यायला जमत नाही. फोन घेतला तरी कामापुरते बोलून तो बंद केला जातो. अनेकदा समोरून बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच बंद केला जातो. लोकांना मेसेज करायला वेळ नाही, केलेच तर कॉमन मेसेज केले जातात जे एकाच वेळी सगळ्यांना पाठवले जातात. स्वतः काही खास लिहून पाठवणारे, आपली विचारपूस करणारे खूप कमी आढळतात. आपण कोणाला मेसेज केला, तर तो कधी वाचला जाईल आणि त्यावर उत्तर कधी कस आणि काय मिळेल याची शाश्वती नाही, आपला मेसेज वाचला जाईल की, नाही हे पण माहिती नाही. आपले मिसकॉल पाहून पण समोरून फोन आला नाही, तर अजून आपल्याच मानस्तापात भर पडते.

लोक दररोजच्या दिनचर्येतच नाही तर फोनमध्ये पण खूप व्यस्त आहेत, फोनमध्ये सुद्धा खूप गर्दी, खूप वेटिंग आहे. आपलं नाव, आपला कॉल, आपला मेसेज या गर्दीत कोणत्या क्रमांकाला असेल ते माहिती नाही, समोरच्याला तो महत्त्वाचा वाटेल, कितपत महत्त्वाचा वाटेल हेही समजत नाही. फक्त कामाचेच आणि हवे तेच फोन मेसेज बघणे आणि इतरांना, त्यांनी पाठवलेल्या तपशिलाला सपशेल टाळणे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

आजकाल लोक खरंच इतकी बिझी झालीत? की खूप बिझी आहोत असे दाखवत आहेत? सतत बिझी दाखवल्यामुळे आपल्याला खूप महत्त्व मिळत, आपण खूप यशस्वी आहोत, प्रगती पथावर आहोत, कष्ट करतो आहोत, ध्येयाने झापटलेले आहोत, आपल्याला किती काम आहेत यातून आपली प्रतिमा उंचावते, असे अनेकांना वाटत असते. अनेक प्रकारच्या कामात बिझी असल्याचे लोक दाखवतात. वेळच मिळत नाही हो, वेळच नसतो माझ्याकडे, इकडे होतो, तिकडे होतो, येणंच होत नाही तुमच्याकडे, जाणंच होत नाही कोणाकडे, व्याप खूप वाढला आहे, कुठेच लक्ष द्यायला वेळ नाही अशी कारणे अगदी सहज सांगितली जातात.

आपण मात्र स्वतःला रिकामे समजतो, कारण उगाच बिझी दाखवणं, कोणाला वेळ द्यायला टाळाटाळ करणं, खूप भाव खाणं, स्वतःच्या कामाचं अवडंबर करणं सगळ्यांनाच जमत नाही. सगळ्यांसाठी वेळ काढणारी, इतरांना प्राधान्य देणारे लोक, कुठेही धावून जाणारे, कोणाच्याही आमंत्रणाचा मान ठेवणारे, रोज आठवणीने मेसेज, फोन करणारे लोक, विचारपूस करणारे लोक आजकाल रिकामटेकडी समजली जातात, बेकार समजली जातात. इतरांना मात्र कामांचे खूप टेन्शन असते, कामांचा ताण असतो, कोणाकडे जायला, कोणाला आपल्याकडे बोलवायाला वेळच नसतो, असला तरी त्यात औपचारिकता असते. ज्याच्याकडे हा वेळ असतो, जो असा वेळ काढतो त्याला वेडे समजले जाते, टाइमपास समजले जाते, अशा व्यक्तीला अटेंड करणेही बिझी लोकांना नको असते, त्यांच्या दृष्टीने ते स्वतःचा बहुमोल वेळ व्यर्थ घालवणे असते. सगळ्यात बिकट प्रसंग तर कोणत्याही कार्यक्रमाला गेल्यावर अनुभवायला येतो. कोणत्याही कार्यक्रमाला, मीटिंगला, समारंभाला जो एकदम वेळेत पोहचेल तो पूर्ण मूर्ख ठरतो. वेळेआधी पोहोचणारा तर एकदम बावळट ठरवला जातो. आजकाल कुठेही उशिरा पोहचणे, वेळ न पाळणे, त्या ठिकाणी पोहोचल्यावर पण फक्त फोनवर बिझी असल्याचे प्रदर्शन करणे, त्या ठिकाणी पण कोणाला वेळ देणे, संवाद साधणे, गप्पा मारणे, शांतचित्ताने तेथील वातावरणाचा उपभोग घेणे लोकांना निरर्थक वाटते. अत्यंत व्यस्त दिनचर्या असल्यामुळे मी उशिरा आलोय, खूप धावपळ करत आलोय, लगेच दुसरीकडे, दुसऱ्या कामाला जायला निघायचं आहे, हे दाखवणे प्रत्येकाला अंगवळणी पडलं आहे.

स्वतःला सातत्याने व्यस्त दाखवणारे लोक पाहून आपल्याला आपल्याबद्दल कमीपणा वाटू लागतो, आपल्यात कमतरता आहे, असे जाणवू लागते, आपण काहीच करत नाही, आपल्याला काहीच उद्योग नाही, आपण बिनकामी आहोत, आपली कोणाला गरज नाही, आपल्याकडे कोणाचे लक्ष नाही हा न्यूनगंड तयार होऊ लागतो. आपणच आपल्याला दोष देऊ लागतो. सध्या तर अजून कहर झाला आहे समाजमाध्यमामुळे!!! प्रत्येकजण स्वतःचे उपक्रम, हिंडणं-फिरणं, हॉटेलिंग, मीटिंग, व्यावसायिक प्रोजेक्ट्स, अॅक्टिव्हिटी, खरेदी, सेलिब्रेशन याच्या सातत्याने पोस्ट करत असतो, आपण किती एनर्जीने भरलेलो आहोत आणि एकावेळी किती आघाड्यांवर क्रियाशिल आहोत, हे दाखवणंही आज ट्रेंड झाला आहे. यामध्ये जी व्यक्ती समाजमाध्यमांच्या स्पर्धेत कुठेही नसते किंवा मागे असते ती अजून विचार करते आणि स्वतःला त्रास करून घेते. आपण असे काहीच करत नाही का जे जगाला दाखवता यावे? आपल्याकडे असे काहीच नाही का जे सगळीकडे शेअर व्हावे, व्हायरल व्हावे? आपल्या आयुष्यात लोकांनी दखल घ्यावी असे आपण काहीच केल नाही का? अशा विचाराने माणसाला स्वतःबद्दल कमीपणा वाटू लागतो. जेव्हा कोणीही आपल्याकडे दुर्लक्ष करते, आपल्याला अपेक्षित वेळ किंवा प्रतिसाद देत नाही, आपली उपेक्षा केली जाते, समोरचा स्वतःच महत्त्व वाढवून घेतो तेव्हा आपल्याला वाईट वाटणे, एकटं वाटणं आपण निरुपयोगी आहोत ही भावना निर्माण होणं साहजिकच आहे.

meenonline@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -