Sunday, May 19, 2024
Homeदेशभारतीय लष्करातील जवानांचा गणवेश बदलणार

भारतीय लष्करातील जवानांचा गणवेश बदलणार

डिझाइन केलेले कापड खुल्या बाजारात मिळणार नाही

नवी दिल्ली : भारतीय लष्करातील जवानांचा गणवेश बदलणार आहे. येत्या १५ जानेवारी रोजी, ‘आर्मी डे परेड’ दरम्यान, सैनिकांसाठी नवीन लढाऊ गणवेशाचा पहिला देखावा प्रदर्शित केला जाईल. ‘मेक इन इंडिया’च्या अनुषंगाने सैनिकांच्या गणवेशाची निर्मिती भारतीय लष्कर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी) यांनी संयुक्तपणे केली आहे. डिजिटल नमुन्यांवर आधारित डिझाइन हे सैनिक तैनात असलेल्या विविध भूप्रदेशांना लक्षात घेऊन तयार केले गेले आहे. सैनिकांना या गणवेशात आरामदायी वाटेल, याची काळजी घेण्यात आली आहे. सैनिकांच्या गणवेशासाठी नवीन डिझाइन केलेले कापड खुल्या बाजारात उपलब्ध होणार नाही आणि ते अधिकारी आणि सैनिकांना त्यांच्या युनिटमधील तुकड्यांमध्ये दिले जातील. दरम्यान, तब्बल १३ लाख भारतीय सैनिकांना कापड पुरवण्याची गरज पूर्ण करण्यासाठी खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील दोन्ही कंपन्यांना खुली निविदा जारी करण्याची सरकराची योजना आहे. या कंपन्या या नवीन बॅटल ड्रेस युनिफॉर्म्स पुरवठा करतील.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ‘सुरक्षेच्या कारणास्तव, युनिफॉर्मसाठी नवीन डिझाइन केलेले कापड खुल्या बाजारात उपलब्ध होणार नाही. म्हणजेच एकदा कंपन्यांनी निविदेला प्रतिसाद दिल्यानंतर, वेगवेगळ्या आकाराच्या गणवेशांसाठी त्यांना ऑर्डर दिल्या जातील. नंतर ते गणवेश भारतीय सैन्याच्या विविध युनिट्स आणि फॉर्मेशन्सना पाठवले जातील आणि ते तिथे खरेदी करता येतील’. संरक्षण मंत्रालय विविध हवामान परिस्थिती आणि भूप्रदेश लक्षात घेऊन भारतीय सैन्याचा गणवेश बदलण्याची योजना आखत आहे. अति उष्ण आणि शून्य तापमान आणि वापरले जाणारे टेरीकोट कापड वेगवेगळ्या परिस्थितीत सैनिकांसाठी आरामदायक नाही. म्हणून, आता नवीन निवडण्यात आलेले कापड सैनिकांसाठी आरामदायी असेल लक्षात घेऊन अधिक मजबूत आणि हलके असण्याची शक्यता आहे. दरम्यान, कपड्यांचा रंग आधीचाच असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गणवेश किती वेळा बदलला?

आतापर्यंत तीन वेळा सैन्याचा गणवेश बदलण्यात आला आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्याच वेळी भारतीय आणि पाकिस्तानी सैन्याचा गणवेश वेगवेगळा असावा, यासाठी बदल करण्यात आले होते. नंतर १९८० मध्ये आणखी एक बदल करण्यात आला आणि त्याला बॅटल ड्रेस असे नाव देण्यात आले. शेवटचा बदल २००५मध्ये, सरकारने ‘सीआरपीएफ’ आणि ‘बीएसएफ’च्या युनिफॉर्मसाठी आर्मी डीपी बॅटल ड्रेस वेगळे करण्यासाठी गणवेश बदलण्याचा निर्णय घेतला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -