Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणBaby Whale Ganpatipule : गणपतीपुळ्याजवळ सापडलेल्या बेबी व्हेलचा दुर्दैवी अंत

Baby Whale Ganpatipule : गणपतीपुळ्याजवळ सापडलेल्या बेबी व्हेलचा दुर्दैवी अंत

प्रशासनाचे अथक परिश्रम ठरले अपयशी

रत्नागिरी : रत्नागिरीतील (Ratnagiri) गणपतीपुळ्याच्या (Ganpatipule)समुद्रकिनार्‍याजवळ १३ नोव्हेंबरला एक व्हेल माशाचं पिल्लू (Baby Whale) आढळून आलं होतं. त्याचा जीव वाचवण्यासाठी त्याला पुन्हा समुद्रात खोलवर सोडणं गरजेचं होतं. तटरक्षक दलाच्या जवानांसह, पर्यटक, स्थानिक नागरिक, तज्ज्ञ, एमटीडीसी आणि वनविभागाचे अधिकारी असे सर्वच जण त्याला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. तब्बल ४० तासांनंतर १५ नोव्हेंबरला रात्री त्याला समुद्रामध्ये चार ते पाच किलोमीटर खोलवर सोडण्यात यश आले होते, त्यामुळे सर्वांनीच जल्लोष केला होता. मात्र, हे पिलू आज सकाळी पुन्हा गणपतीपुळ्याच्या समुद्रकिनार्‍याजवळ आढळून आलं आणि यावेळेस पिलाने आपला जीव सोडला होता.

व्हेल माशाच्या पिल्लाला दोन दिवसांत जवळपास पाच वेळा वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, तो पुन्हा पुन्हा समुद्रकिनार्‍याजवळ येत होता. तब्बल वीस फूट लांब आणि पाच टन वजनाच्या अवाढव्य वेबी व्हेलला पुन्हा समुद्रात लोटण्यासाठी धडपड सुरु होती. या प्रयत्नांना परवा रात्री ११ च्या सुमारास यशही आलं होतं. तरीही हा बेबी व्हेल पुन्हा माघारी येत नाही ना, किंवा दुसर्‍या समुद्रकिनार्‍यावर आढळत नाही ना, याकडे लक्ष ठेवलं जात होतं. पण काय झालं, कुणालाच कळलं नाही आणि बेबी व्हेलने पुन्हा एकदा किनाऱ्यावर येऊन अखेर मृत्यूसमोर हात टेकत आपला जीव सोडला.

व्हेल मासा किनाऱ्याजवळ का तग धरु शकत नाही?

व्हेल मासा आपल्या खाद्याचा म्हणजेच छोट्या माशांचा पाठलाग करत किनाऱ्याकडे येऊ शकतात. अशावेळी ओहोटी सुरु झाली तर ते किनाऱ्यावरील वाळूत अडकून पडू शकतात. त्याचं शरीर महाकाय असल्याने ते पाण्यात पेललं जाऊ शकतं मात्र पाण्याबाहेर त्यांच्या वजनामुळेच त्यांची इंद्रिये दबली जातात. त्यांची त्वचा सुकू लागते आणि त्वचेखालील चरबीच्या थरामुळे शरीरात खूप उष्णता निर्माण होते. अतिउष्णतेमुळे डिहायड्रेशन होऊन ते मृत पावतात.

बेबी व्हेललाही अशीच समस्या निर्माण झाली होती. पण त्याची त्वचा सतत पाणी टाकून ओली ठेवल्याने हा धोका कमी करता आला. तसेच, पशुवैद्यकीय डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक उपचारांचाही बेबी व्हेलला उपयोग झाला. त्यामुळेच तो एवढे दिवस किनाऱ्यावर तग धरू शकला. अखेर त्याची ही झुंज अपयशी ठरली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -