Friday, May 17, 2024
Homeसाप्ताहिककोलाजरवळनाथाची कहाणी

रवळनाथाची कहाणी

सतीश पाटणकर

पेडणे (गोवा), चंदगड (कोल्हापूर), ओटवणे (सावंतवाडी) येथील रवळनाथांच्या मूर्तीत कमालीचे साम्य आहे. या तिन्ही स्थळांवरील देव आपापसांत संवाद साधत असतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे. ही तिन्ही देवालये भौगोलिकदृष्ट्या पाहता दोन राज्यांत तीन जिल्ह्यांत आहेत. तिन्ही देवालयामधील अंतर सुमारे १५० किमी आहे. असेही म्हणतात, तिन्ही मंदिरांना नकाशावर जोडण्याचा प्रयत्न केला, तर समांतर त्रिकोण तयार होतो.  तीन देवांपैकी एकावेळी दोन देव भक्तांच्या न्यायनिवाड्याचे काम करतात. यावेळी एक देव विश्रांती घेत असतो. असे हे आलटून पालटून चालते.

श्री देव रवळनाथ ही दक्षिण कोकणची वैशिष्ट्यपूर्ण देवता आहे. अत्यंत जागृत स्थान म्हणून ख्याती असलेल्या रवळनाथाची दक्षिण कोकणात मोठ्या प्रमाणात मंदिरे आहेत. जसजसे उत्तरेकडे जावे तसतसे या मंदिरांची संख्या कमी होत जाते. जिल्ह्यातील आठ तालुक्यांत सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले परिसरात रवळनाथाची २११ मंदिरे आहेत. गोवा राज्यातही रवळनाथ देवालयांचा प्रभाव आहे. यक्षदेवता व वीरयक्ष हेच दक्षिण कोकणात प्रामुख्याने ग्राम व नगर संरक्षक देव मानले जातात, ते गावाचे संरक्षण करतात ही लोकांची श्रद्धा आहे. यक्षोपासनेची चिवट परंपरा पिढ्यान्-पिढ्या सातत्यपूर्ण चालू आहे. म्हणूनच भैरव (गस्ती करणारा) हा लोकप्रिय क्षेत्रपाल देव प्रसिद्ध आहे. त्याच्या कौल, नवस, गाऱ्हाणे, बळी या उपासनेतून गाव बांधिलकी असणे, अरिष्टापासून संरक्षण, कोपापासून कृपा, सुखसमृद्धी ही अपेक्षा नसते. त्याचा भर सौम्य रूपापेक्षा उग्र रूपावर अधिक असतो. त्याची उपासना आणि भक्तीसुद्धा भीतीतून अधिक होते. निसर्गाचे गूढ, पंचमहाभूतांचे वाटणारे भय आणि त्यांची अवकृपा होऊ नये म्हणून करण्याच्या उपासना… या प्रक्रियेमधून झटकन् पावणाऱ्या ग्रामदेवता, यक्षदेवता या दक्षिण कोकणात प्रसिद्ध पावल्या.

शाक्तांनी त्यांच्या पंथात मूळ यक्षदेवास कोणताही बदल न करता सामील करून घेतले. द. ग. गोडसे म्हणतात, यक्षपूजेपासून शिवोपासना आणि शिवोपासनेतून त्यांच्या अनुचर देवता – भैरव, मल्हारी, खंडोबा, जोतिबा, रवळनाथ – यांच्या पूजा शिवकालात रूढ होत्या. यक्षपूजा ही तर आर्यपूर्वकालीन आहे. शिवदैवत हे आर्येतरांचा पशुपती व आर्यांचा रुद्र यांचे एकत्रित केलेले स्वरूप आहे. शिवाचे पशुपती हे स्वरूप पाच हजार वर्षांपूर्वी सिंधुनदीच्या खोऱ्यात दिसून येते. रुद्र व शीव यांची उपासना ही मूळ आर्यांची नव्हे. त्यांनी ती लोकसंस्कृतीतून स्वीकारली. आर्यांचे देव ब्रह्मा, विष्णू, महेश, रुद्र, इंद्र, वरुण यांची मंदिरे त्या ठिकाणी दिसत नाहीत. मंदिरे आहेत ती यक्षदेवांच्या परिणत झालेल्या रूपांच्या देवांची! आदिम.

कोकणातील रवळनाथ हे शिवाचेच एक रूप. रवळनाथ हा शिव आहे, कारण त्याचे पुजारी गुरव किंवा राऊळ असतात. भारतात शिवाचे पुजारी गुरव, जंगम आणि राऊळच आहेत. ते रूप स्वभावाने उग्र व वृत्तीने लढाऊ, म्हणजे तो मूळ यक्षदेवाच्या प्रकृतीचाच. शाक्तांनी तो शाक्त पंथात आणल्यावर त्यास मूर्तिरूप मिळाले. त्याला चार किंवा अधिक हात मिळाले. त्याच्या शिवस्वरूपामुळे त्याच्या हातात त्रिशूळ, डमरू ही आयुधे दिली गेली. तोच दक्षिण कोकणचा संरक्षक क्षेत्रपाळ रवळनाथ बनला! रवळनाथाची मूर्ती दक्षिण कोकणातील हरएक गावात असते. ती वैशिष्ट्यपूर्ण देवता आहे. मूर्ती उभी असून तिचा डावा पाय किंचित वाकवून, पुढे केलेला असतो. रवळनाथ चतुर्भुज असतो. पुढील उजव्या हातात तलवार, डाव्या हातात अमृतपात्र असतात. मागील उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात डमरू असतात. मूर्तीची दृष्टीसमोर आणि सरळ असते. डोक्यावर मुकूट, कमरेखाली धोतर नेसलेले असते. गळ्यात यज्ञोपवित असते, इतर माळाही असतात. त्यात नरमुंडमालाही असते. ओठावर वळवलेल्या मिश्या असतात. त्या भागात देवतांच्या मूर्तींना रूप्यांचे नेत्र चिकटवले गेलेले असतात. मूर्तीच्या दोन्ही बाजूंस पारिचारिकांच्या चवऱ्या ढाळत असलेल्या दोन मूर्ती कोरलेल्या आढळतात. पारिचारिकांच्या चार मूर्ती काही ठिकाणी असतात. घोडा मूर्तीच्या उजव्या बाजूस अनेक ठिकाणी कोरलेला असतो. श्री रवळनाथ ही ब्रह्मचारी देवता आहे. दुसऱ्या समजुतीप्रमाणे त्याला बायको आहे, तिचे नाव पावणाई. ती कोठे द्विभुज तर कोठे चतुर्भुज आढळते. तिच्या चतुर्भुज रूपाची आयुधे रवळनाथाच्या आयुधांप्रमाणे असतात. पावणाई देवतेच्या जीवनरहस्याचा पट उलगडण्याचा अनेक जिज्ञासूंनी प्रयत्न केला आहे. तिची उपासना कोकणातील जनमानसांत सर्व स्तरांवर प्रचलित आहे.

कोकणातील रवळनाथाची बहुतेक देवळे दक्षिणाभिमुख आहेत. कोकणचा क्षेत्रपाळ भैरव. तोही दक्षिणाभिमुखी आहे. तो घाटमाथ्यावर जोतिबा आणि दक्षिण कोकणात, गोमंतकात रवळनाथ या नावाने ओळखला जातो. षष्ठीयुक्त सप्तमी तिथीला रवळनाथाचा अवतार म्हणून जन्म घेतला. रवळनाथ हा कोणत्या देवाचा अंश असावा यावरून विद्वानांमध्ये भिन्न भिन्न कल्पना आहेत. शणैगोय बाब यांनी त्यांच्या ऐन वेळार या कोकणी पुस्तकात म्हटले आहे की, रवळनाथ हा वैदिकपूर्व काळातील देव आहे. रवळनाथ यातील रवळ हा शब्द राहुल याचे रूपांतर आहे.

ख्रिस्त शकाच्या तिसऱ्या शतकात बुद्धधर्मी महायान संस्थापक नागार्जुन याच्या गुरूचे नाव राहुलभद्र असे होते. याही ब्राह्मणाने बौद्धधर्माची दीक्षा घेतली होती. गौतम बुद्धाच्या मुलाचे नाव राहुल होते. त्यावरून बुद्धपूर्व वैदिक काळात हे नाव प्रचारात असणे शक्य आहे. त्याच काळात लोक राहुलनाथ हे नाव व त्याची भक्ती घेऊन कोकणात आले असावे. त्या नावाची देवळे इतर कोठेही नाहीत. रवळनाथ या नावाला कोकणच्या ट्रेड मार्कचे रूप आले आहे!

पं. महादेव शास्त्री जोशी यांच्या मते, रवळनाथ हा शुद्ध देव असून रू रू हे त्याचे मूळ नाव आहे. अष्टभैरवात ‘रू रू’चे रवळ आणि रवळूचे पुढे नाथ जोडून रवळनाथ असे नाव होऊ शकते. सर्पांचे विष उतरवणे हे रवळनाथाचे वैशिष्ट्य. त्यामुळे देशावरील बहिररोवर व दक्षिण कोकणातील रवळनाथ हे दोघे भैरव संघातील असल्याचे निश्चित होते. दक्षिणेस कारवारपासून उत्तरेस देवगडपर्यंत रवळनाथाची देवळे तुरळक, तरीपण गावोगावी केदारलिंग देवतास्वरूप आढळतात. रवळनाथ व त्याचे भव्य रूप आजरे, चंदगड मार्गे कोकणात आले असावे, त्यामुळे रवळनाथाची मंदिरे चंदगड-आजरा येथेही आहेत. त्यामुळे कोकणात रवळनाथ देवतेला आणणारे वसाहतकार आर्य नसून द्रविडच असावे, असा अंदाज पु. रा. बेहेरे यांनी व्यक्त केला आहे. बेहरे पुढे म्हणतात, रवळनाथ ही देवता ज्या वसाहतकाराने कोकणात आणली त्यांची जमात त्याच्या पराक्रमाने व गुणाने त्या भागात अग्रगण्य झाली असावी. त्यामुळे तरंग सार्वत्रिक आहे आणि तेच मुख्य तरंग आहे. संचाराची किंवा अवसराची जी देवस्की असते, त्यात रवळनाथाचा पूर्वस हा प्रमुखपणे मेळा करतो म्हणजे अवसराबरोबर सल्लामसलत करून अखेरचा निर्णय देतो. म्हणून त्याला मेळेकरी असेही म्हणतात. थोडक्यात पंतप्रधानांची भूमिका!

रवळनाथाचा तरंग प्रत्येक ठिकाणी असतोच. शक्यतो तो गुरव घेत असतो. तरंग काष्ठ आहे. तो नागफणीशी संबंधित आहे. नागकाल हे लिंगरूप आहे. तरंग हे त्याचे प्रतीक सामर्थ्याने भरलेले आहे. लिंग – लंगल – लगुल यापासून तलंग व तरंग. तलंग तरंगाची ही व्याप्ती रा. चिं. ढेरे यांनी स्वरागमाने स्पष्ट केली आहे. भालचंद्र आकलेकर यांनी दक्षिण कोकणातील एकशेएकोणचाळीस रवळनाथांचा अभ्यास केला. त्यातील एकोणतीस रवळनाथ हे केदार वाटतात. उरलेल्या एकोणसाठ रवळनाथाचे ध्यान विठ्ठलासारखे वाटते. कोकणी लोक रवळनाथाला विठ्ठलस्वरूप मानत असावेत. रवळनाथ हे सूर्याचे रूप असावे, असे काहीजणांचे मत आहे. त्यामुळे रवळनाथ हे विठ्ठलाचे मूळ स्वरूप असण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणात नवीन वस्त्या आल्या. त्यांनी प्रत्येक वस्तीत एकेक रवळनाथ त्यांच्याबरोबर स्थापन केला. पेडणे (गोवा), चंदगड (बेळगाव) व ओटवणे येथील तीन रवळनाथ प्रमुख मानले जातात. सावंतवाडीतील त्रेपन्न मंदिरे, वेंगुर्ल्यातील सव्वीस मंदिरे, कुडाळातील एकतीस मंदिरे, कणकवलीतील सोळा, देवगडमधील अकरा, मालवणमधील सदतीस मंदिरे… त्याशिवाय, राजापूर सहा, चिपळूण सात, दापोली चार, खेड दोन, गुहागर चार, रत्नागिरी दोन, संगमेश्वर दोन, लांजा तीन आणि गोव्यामध्ये एकोणपन्नास मंदिरे आहेत. प्रत्येकाचा इतिहास, कथा मनाला भारावून टाकतात. अशी दक्षिण कोकणात दोनशे अकरा देवळे उल्लेखनीय आहेत. प्रत्येक गावातील अशा या रवळनाथाचे/केदाराचे केदारवनात सुंदर ध्यान आहे; परंतु कोकणी मन त्याला कुडाळी, मालवणी बोलीतून हाक मारते, नारूर गावाहून कुडाळ गावी आलेल्या रवळनाथला कुडाळेश्वर गाऱ्हाणेच घालणार – बा देवा म्हाराज्या कुडाळेश्वरा भैरवा – होय म्हाराज्या लक्षूमी पाचपूर्वी जुगपती देवा तू म्हाराजा – होय म्हाराज्या येताळ पावनाथ इटला देवीची चाळो – होय म्हाराज्या; तसेच वालावलीच्या रवळनाथाला हाक मारताना, बा देवा म्हाराज्या समर्था आज तू देव रवळनाथ, तर म्हाराज्या आज तुका सांगणा करतो आसोव पूर्वसंबंधान, देसधाम, रोगराय तू आज येशयेक बांध. त्याला ते पूर्वेच्या गुंड्याच्या गणित पुरा करण्यास सांगतात. बारा पाचाचा गणित एक करायला सांगतात. देसधाम दूर करून, सेवाचाकरी करून घ्यायला सांगतात.

जिल्ह्याच्या सीमावर्ती गावात रवळनाथाची जागृत स्थाने पाहायला मिळतात. गोवा राज्यात रवळनाथाची एकूण ५० मंदिरे आहेत, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात रवळनाथ देवालयांची संख्या ३१० हून अधिक आहे. ओटवणेचे श्रद्धास्थान, तर सर्वत्र प्रसिद्ध आहे. रवळनाथाची सत्ता सागरावर चालते. म्हणून मच्छीमारीसाठी अथवा सागरी प्रवासासाठी निघालेले बांधव बंदरी रवळनाथासमोर नतमस्तक झाल्यानंतर पुढे रवाना होतात. खानोली गावातील रवळनाथास भक्त ‘मोडका देव’ म्हणून साद घालतात. मालवणी मुलखाचा मार्मिकपणा येथे प्रकर्षाने जाणवतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -