Sunday, May 19, 2024
Homeसाप्ताहिककोलाज‘सा’चा साधक हरपला...

‘सा’चा साधक हरपला…

राशिदभाईंचे अकाली निरोप घेऊन आपल्यातून निघून जाणे अत्यंत दुखद असून त्यांच्या निधनामुळे शास्त्रीय संगीतक्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. मी त्यांना १९७७ मध्ये प्रथम ऐकले. मुंबईतील ‘रंगभवन’मध्ये ‘एसआरए ॲकॅडमी’ने पहिले घराणा संमेलन आयोजित केले होते. तेव्हा रामपूर-सहसवान घराण्याचे सर्वात तरुण गायक म्हणून राशिदभाई गायले होते. त्यावेळी त्यांचे वय अवघे नऊ वा दहा वर्षांचे असेल. पण एवढ्या लहान वयातही त्यांच्या गाण्याला उपस्थितांची भरभरून दाद मिळाली होती. नंतरचा त्यांचा प्रवास आणि त्यातील प्रत्येक टप्पा लक्षवेधी होता. इतका सुंदर प्रवास अवचित थांबल्याचे विशेष दु:ख आहे.

कलाकारांच्या अनेक जाती असतात. काही संगीतशास्त्रज्ञ असतात, काही कलाकार असतात, तर काही संगीताशी संबंधित अन्य क्षेत्रांमध्ये कार्यरत असतात. पण असे सगळेच श्रोत्यांच्या पसंतीस उतरतात असे नाही. काहींमध्ये उत्तम गुणवत्ता असूनही प्रेक्षकांकडून हवी तशी मान्यता वा पसंती आणि प्रसिद्धी मिळत नाही. ही आत्ताचीच नव्हे, तर पूर्वीपासून पाहायला मिळणारी बाब आहे. म्हणूनच ‘दैव किती अविचारी’ या भजनातील दुसऱ्या अंतऱ्यातील ‘मूर्ख भोगितो राजवैभव आणि पंडित फिरत भिकारी’ ही ओळ अनेकांची व्यथा व्यक्त करते. संगीतक्षेत्रात ती वेगळ्या अर्थाने लागू होते कारण इथे मूर्ख कोणी नसते. पण सगळ्यांनाच रसिकमान्यता मिळत नाही. इथे हेदेखील लक्षात घ्यायला हवे की, आपल्याकडे गायक आणि गवई हे दोन शब्द आहेत. गायक गळ्याने गातो, तर गवई पोटातून गातो. राशिदभाई हे या दुसऱ्या गटातील होते. ‘सा’ लागला की प्रत्येक श्रोत्याला ते आपल्यासाठी गातात असे वाटायचे. म्हणूनच ते सर्वोत्तम गायकही होते आणि लोकप्रियही होते. दस्तुरखुद्द भारतरत्न भीमसेन जोशी यांनी ‘माझ्यानंतर हाच आहे…’ असे म्हणून राशिदभाईंचा सन्मानपूर्वक उल्लेख केला होता. तेव्हा बऱ्याच लोकांना वाईट वाटले होते. महाराष्ट्रात असूनही ते असे का बोलले, हा काहींचा प्रश्न होता. पण त्यामागील कारण कोणाला कळले नाही. कदाचित पुढे कधी तरी त्यांना पंडितजींच्या बोलण्याचा अर्थ उमगला असेल.

कोणताही कलाकार आपापल्या क्षमतेप्रमाणे साधना करतो. पण भीमसेनजी वा राशिद खान यांच्यासारखे गायक त्या पलीकडे पोहोचलेले असतात. राशिदभाईंनी शास्त्र आणि कला याचे सुंदर मिश्रण जमवले. त्यांच्या गाण्यात ‘सा’ची साधना दिसते. राशिदभाईंचे गुरुजी निसार हुसैन खान यांनी त्यांच्याकडून ही साधना करून घेतली. हेच गुरूचे खरे महत्त्व असते. शिष्याची ताकद ओळखून प्रत्येकाकडून हवे ते करून घेणे गरजेचे असते. अगदी अशाच प्रकारे सवाई गंधर्वांनी पंडितजींकडून साधना करून घेतली होती. म्हणजेच हे या दोघांमधील साधर्म्य होते. ते जाणत असल्यामुळेच पंडितजींनी राशिदभाईंबद्दल ‘हा टिकणार…’ असे उद्गार काढले होते. एखाद्याची यापेक्षा अधिक चांगली ओळख कोणती असू शकते?
राशिदभाईंवर रामपूर-सहसवान घराण्याचे संस्कार होते. त्यांच्या सुरांची किमया अप्रतिम होती. गाण्यात कमालीची सहजता होती. तिथे क्लिष्टतेला अजिबात वाव नव्हता. असे भावनेने भरलेले त्यांचे गाणे लोकांपर्यंत सहज पोहोचले. त्यांचे ‘याद पिया की आये…’ ऐकताना प्रत्येकाला आपापल्या प्रिय व्यक्तीचे स्मरण व्हायचे ते याच भावनात्मकता आणि सहजतेमुळे. याला ‘कहन’ हा अतिशय सुरेख शब्द आहे. गाण्यामध्ये कहन पाहिजे, असे म्हणतात तेव्हा गाण्याद्वारे संवाद अपेक्षित असतो.

कलाकार आणि प्रेक्षक यांच्यात एक नाते निर्माण झाले पाहिजे. तरच गाणे लोकांच्या मनात उतरते. अन्यथा, एखाद्याने शास्त्राला धरून ५० राग गायले पण त्याचा ‘असर’ झाला नाही तर काहीच उपयोग नसतो. त्यात उरते ती केवळ यांत्रिकता. थोडक्यात, यांत्रिकता रियाजात असली तरी सादरीकरणात असू नये हे सूत्र राशिदभाईंनी पाळले, कारण सादरीकरण ही पूर्णपणे वेगळी गोष्ट असल्याचे ते जाणत होते. मी कोणासाठी तरी गात आहे, माझे गाणे ऐकायला हे लोक आले आहेत, त्यामुळे त्यांना संतुष्ट करण्याची आणि पूर्ण क्षमतेने गाणे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, असे ते मानत होते. शेवटी प्रत्येक कलाकार घरात तांत्रिक पद्धतीने गातच असतो. पण तुम्ही प्रेक्षकांसमोर गाता तेव्हा जमलेल्या प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. असे असतानाही सगळ्यांना गाणे आवडण्यासाठी कलाकाराची तेवढी तपश्चऱ्या असावी लागते. राशिदभाईंच्या गाण्यात ती दिसायची, जाणवायची.

सादरीकरण करताना कलाकाराला सगळ्या गोष्टींचे भान ठेवावे लागते. आवाज हा त्यातील पहिला भाग असतो. कोणताही राग घेतला तरी त्यातील प्रत्येक सुराचे कहन त्याला रसिकांपर्यंत पोहोचवायचे असते. मग शब्द पोहोचवायचे असतात. आवर्तन बारा, सात वा सोळा मात्रांचे असे कोणतेही असले तरी प्रत्येक आवर्तनाची विशिष्ट लय असते. प्रत्येकाची ही लय वेगळी असते. गाणे आधी लयप्रधान हवे, आलापप्रधान नंतर… संगीताच्या अभिव्यक्तितला हा सगळा भाग राशिदभाईंनी जपला होता. त्यांनी आपल्या गायकीतून श्रोत्यांपर्यंत संदेश पोहोचवण्याचे, त्यांना आनंद देण्याचे काम अगदी मनोभावे केले. हा संदेश सुरातून, तालातून, लयीतून, शब्दांतून आणि तानेतून पोहोचवण्यात ते कुठेच कमी पडले नाहीत. म्हणूनच त्यांचे गाणे लोकांना आवडले. गाण्यात काय वा आयुष्यात काय, लयीला खूप महत्त्व आहे. लय जपली नाही तर प्रलय येतो. याची जाण होती म्हणूनच राशिदभाईंचे गाणे मनाला भिडणारे ठरले.

आपल्याकडे ‘अष्टांगप्रधान गायकी’ ही संज्ञा वापरली जाते. असे अष्टांगप्रधान गाणारे गायक खूप कमी आहेत. साधारणत: गायकाला गाण्यातील चार वा पाच अंग येतात. सगळी कोणालाच येत नाहीत. मात्र राशिदभाईंसारखे कलाकार रियाज करतानाच हा विचार करतात वा त्यांचे गुरू त्यांच्याकडून हे करून घेतात. त्यामुळेच त्यांची गायकी कायमच उजवी ठरली. महत्त्वाचे म्हणजे राशिदभाईंनी रियाजाबरोबरच रंगमंचावरील सरस्वतीचीही आराधना केली. कारण कितीही तयारी केली तरी ऐन वेळी रंगमंचावरील सरस्वती काय करेल हे मोठ्यातला मोठा कलाकारही सांगू शकत नाही. म्हणूनच इथे सिद्ध होणे जमले. त्यामध्ये या पिढीतील राशिदभाईंचे नाव अग्रणी होते.

आज हे नाव आपल्यात नाही. त्यांची सुरांवरील पकड, तिन्ही सप्तकांमध्ये लीलया फिरणारा आवाज आणि अप्रतिम पेशकश पुन्हा अनुभवायला मिळणार नाही. त्यांच्या कोणा शिष्यांनी हे गुण घेतले असेल तर उत्तमच, पण शेवटी प्रत्येकाची बलस्थाने भिन्न असतात. प्रत्येकाची ताकद आणि कुवत वेगळी असते. त्यामुळेच उत्तम गाणे ऐकायला मिळणार नाही असे मी म्हणणार नाही. पण राशिदभाईंची सर त्याला येईल का, याविषयी संशय वाटतो. ते सिनेसंगीत, ठुमरी, टप्पा आदी गानप्रकार उत्तम गायचे. असा सर्वांगसुंदर विचार आणि सादरीकरण प्रत्येकाला जमतेच असे नाही. सादरीकरणातून रियाजाबरोबरच त्यांच्यातील संयमही जागोजागी जाणवायचा. शेवटी अभिजात संगीतामध्ये संयमच सर्वात महत्त्वाचा आहे. तीन मिनिटांत उत्तम गाणे हा महत्त्वाचा भाग असला तरी रागाचा असर निर्माण करणारे गवय्ये आता किती राहिले आहेत, हा प्रश्न उरतो, कारण राशिदभाई हे त्यातील एक नाव आता कमी झाले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -