Thursday, May 2, 2024
Homeताज्या घडामोडीदुसरी लाट १०० टक्के संपलेली नाही...

दुसरी लाट १०० टक्के संपलेली नाही…

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण

नाशिक (वृत्तसंस्था) : ‘कोरोनाची तिसरी लाट येण्यासारखी परिस्थिती राज्यात सध्या तरी नाही आणि कोरोनाचा कुठलाही नवा व्हेरियंट आढळून आलेला नाही, ही जमेची बाजू आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी दुसरी लाट अद्याप १०० टक्के संपलेली नाही’, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राज्यातील कोरोना संसर्गाची स्थिती, लसीकरणाची आकडेवारी व संभाव्य परिस्थितीचीही टोपे यांनी यावेळी माहिती दिली. ‘राज्यात तिसरी लाट येण्याची शक्यता नसली तरी लसीकरण महत्त्वाचे आहे. लसीकरण झाल्यास भीती राहणार नाही. राज्यात आतापर्यंत ७० टक्के नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर, ३५ टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. दोन्ही प्रकारच्या लोकांचे मिळून ९ कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आणखी २.५ कोटी लसीकरण झाले तर राज्यात १०० टक्के लसीकरण होईल’, असा दावा टोपे यानी यावेळी केला. लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ‘मिशन कवचकुंडल’ हा कार्यक्रम दिवाळीपर्यंत राबवला जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘महाविद्यालयीन तरुणांचे लसीकरण हे एक मोठे आव्हान आहे. लसीकरणासाठी लोकांनी स्वत: पुढे यावे’, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मुंबईत ८५ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. दोन – चार महिन्यांत संसर्गाचा दर बराच कमी झाला आहे. दीड कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईत मागील काही दिवसांत कोरोनाचा एकही मृत्यू नाही ही मोठी गोष्ट आहे,’ असे टोपे म्हणाले. ‘जीविताचा धोका लक्षात घेऊनच राज्य सरकार पावले उचलत आहे. अर्थकारण थांबू नये म्हणून परिस्थितीचा अंदाज घेऊन व्यवसाय सुरू करायला परवानगी दिली आहे’, असेही त्यांनी स्पष्ट केला.

अधिकाऱ्यांना मुदतवाढ नाही!

‘आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना यापुढे मुदतवाढ मिळणार नाही. कोविडच्या पार्श्वभूमीवर एक वर्षाचे एक्स्टेन्शन देण्यात आले होते. आता ते मिळणार नाही. निवृत्तीचे वय ६० वर्षेच राहील. तरुण वर्गाला पुढे आणायचे आहे, त्यांना संधी द्यायची आहे,’ असे टोपे यांनी सांगितले.

दिवाळीनंतर रुग्ण वाढीची शक्यता…

राज्यात दिवाळीनंतर कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. डॉक्टरांचा टास्क फोर्स आणि या विषयातील तज्ज्ञ या सर्वांनी ही शक्यता वर्तवली असल्याची माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली. केंद्राची परवानगी मिळताच लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. ज्या ठिकाणी लसीकरण झाले आहे त्या ठिकाणी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युंची संख्या घटली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -