Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणसमृद्धी महामार्ग चार वर्षांत पूर्ण होतो, मग ५८२ किलोमीटरचा मुंबई-गोवा महामार्ग नऊ...

समृद्धी महामार्ग चार वर्षांत पूर्ण होतो, मग ५८२ किलोमीटरचा मुंबई-गोवा महामार्ग नऊ वर्षे झाली तरी अद्याप पूर्ण का झाला नाही?

कोकणातील आमदारांनी विधानसभेत राज्य सरकारला धरले धारेवर!

मुंबई : ७८० किलोमीटरचा समृद्धी महामार्ग चार वर्षांत पूर्ण होतो, मग ५८२ किलोमीटरचा मुंबई-गोवा महामार्ग नऊ वर्षे झाली तरी अद्याप पूर्ण का झाला नाही, अनेक सरकारे बदलली तरी रस्ता का रखडलाय, असे प्रश्न उपस्थित करत कोकणातील आमदारांनी विधानसभेत राज्य सरकारला धारेवर धरले. त्यावर येत्या मे महिन्यापर्यंत सिंगल लाइन तर नऊ महिन्यांत संपूर्ण रस्ता पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकार करेल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आदिती तटकरे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडल्याने तसेच रस्त्याची दुरवस्था झाल्याने सप्टेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत ९५ अपघात झाले.

या महामार्गावरील कासू ते इंदापूर हा रस्ता सर्वात खराब आहे. गेल्या तीन महिन्यांत दोन मोठी आंदोलने झाली, मात्र १५ दिवसांत काम सुरू करतो असे पोकळ आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. आता या महामार्गासाठी राज्याने केंद्र शासनाला विनंती करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमावी आणि त्यात कोकणातील लोकप्रतिनिधींचा समावेश करावा, अशी मागणी तटकरे यांनी केली.

यावर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी माहिती देताना सांगितले की, मुंबई-गोवा महामार्गामध्ये भू-संपादन, विविध खात्यांच्या परवानग्या यामध्ये बराच कालावधी लागला. गोव्यापासून राजापूरपर्यंत काम पूर्ण झाले आहे.

कणकवलीजवळ १०० मीटरपर्यंतचे भू-संपादन वगळता सिंधुदुर्गात भू-संपादन पूर्ण झाले आहे. रत्नागिरीतील परशुराम घाटामध्ये भौगोलिक परिस्थिती साथ देत नाही. तिथे कटींगचे काम करताना माती कोसळते. त्यामुळे घाटरस्ता पूर्णपणे बंद करून काम करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे ते कासू, कासू ते इंदापूर आणि इंदापूर ते झाराप या तीन टप्प्यातल्या रस्त्यांची कामे कधी पूर्ण होतील याची तारीख सांगा, अशी मागणी यावेळी भाजपा आमदार अमित साटम यांनी केली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनीही त्याला दुजोरा दिला. समृद्धी महामार्ग जर कालबद्ध पद्धतीने पूर्ण केला जातो, मग मुंबई-गोवा महामार्ग का होत नाही. २०२३ मध्ये हा महामार्ग कसा तयार करणार याचे उत्तर द्या, अशी मागणी त्यांनी केली. कासू गावात मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे सहा-सात नाही तर ६० घरे आहेत. या ६० घरांचे तुम्ही काय करणार, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

तर आमदार वैभव नाईक यांनी इंदापूर ते झाराप हा रस्ता पूर्ण झाला नाही तरी टोल आकारला जातोय, असे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -