Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरतवा येथे खाद्यतेल पळविण्यासाठी झुंबड

तवा येथे खाद्यतेल पळविण्यासाठी झुंबड

  • तेलाचा टँकर उलटला
  • महामार्गांवर अपघाताचे सत्र सुरूच

कासा (वार्ताहर) : बई-अहमदाबाद महामार्गांवर शनिवारी सकाळी ६.३० वाजता गुजरातहून मुंबईकडे जाणारा भरधाव टँकर तवा येथील हॉटेल हिमाचल पंजाबसमोर पलटी झाला. यात टँकरचालक गंभीर जखमी झाला असून त्याला कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

भरधाव खाद्यतेल वाहतूक करणाऱ्या टँकरचालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर मुंबई वाहिनीवर तिसऱ्या लेनवर पलटी झाला. यावेळी टँकरमधून खाद्यतेलाची मोठी गळती सुरू झाली. टँकरमधील तेल हे खाद्यतेल आहे समजताच आजूबाजूच्या अनेक नागरिकांची खाद्यतेल पळविण्यासाठी मोठी झुंबड उडाली. नागरिकांनी कोणी प्लास्टिक ड्रम, हंडे, बाटल्या जे साहित्य हाती लागेल त्यात सांडलेले खाद्यतेल भरून घरी नेऊ लागले. महामार्गाच्या तिसऱ्या लेनच्या बाजूस अपघात झाला. मात्र बाजूस सेवा रस्ता आहे त्यामुळे जास्त प्रमाणात वाहतूक कोंडी झाली नाही. घटनेची माहिती कळताच महामार्ग पोलीस व कासा पोलिसांनी परिस्थिती हाताळली आणि वाहतूक कोंडी सोडविली.

टँकर पलटी झाल्याचे कळताच तेलाची गळती सुरू झाली, ते घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. हा प्रसंग पाहून पुन्हा १९९२ साली मेंढवण येथील अपघाताची आठवण झाली. त्यावेळी झालेल्या अपघातग्रस्त टँकरमध्ये ज्वलंनशील असणारे तेल पळविण्यासाठी अशीच मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी टँकरला आग लागून स्फोट होऊन १०० च्या वर नागरिक जळून खाक झाले होते. अनेक जखमी झाले होते. यामुळे महामार्गावर तशी घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -