Friday, May 17, 2024
Homeमहत्वाची बातमीBest Bus Passes : सर्वसामान्यांना झटका! बेस्ट बसेसच्या पास दरात आजपासून वाढ

Best Bus Passes : सर्वसामान्यांना झटका! बेस्ट बसेसच्या पास दरात आजपासून वाढ

तिकीट दरात देखील झाली वाढ?

मुंबई : मुंबईकरांसाठी अत्यंत सोयीचा आणि स्वस्त प्रवास म्हणजे बेस्ट बसेस (Best Buses). पण बेस्ट प्रशासनाने मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईकरांना झटका देणारा एक निर्णय घेतला आहे. आजपासून बेस्ट पासेसच्या (Best bus Passes) दरात वाढ होणार आहे. त्यामुळे रोज बेस्टने प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे. तर, दुसरीकडे तिकीटांच्या (Bus tickets) दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असं बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

बेस्ट प्रशासनाने दैनंदिन आणि मासिक पास दरामध्ये वाढ केली आहे. त्यानुसार दैनिक पासमध्ये १० रुपये तर मासिक पास दरात दीडशे रुपयांची वाढ झाली असून आजपासून वाढीव दर लागू होणार आहेत. सुधारित पास वातानुकूलित तसेच विना-वातानुकूलित बससेवांवर (AC and Non-AC Buses) लागू असणार आहेत. सर्वसाधारण तिकीट दरात मात्र कोणतीही वाढ करण्यात आली नाही.

सुधारित बस पास योजनेनुसार हे बस पास ६, १३, १९ तसेच २५ रुपयांपर्यंतच्या विद्यमान वातानुकूलित व विना-वातानुकूलित प्रवासभाड्याच्या अनुषंगाने साप्ताहिक आणि मासिक स्वरूपात उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच अमर्याद बस प्रवासाचा दैनंदिन दर ५० वरून ६० रुपये व मासिक पास ७५० वरून ९०० रुपये करण्यात आला आहे.

२४ बस पास योजना केल्या कमी

बेस्टची विद्यमान बस पास योजना एप्रिल २०२३ पासून सुरू होती. पूर्वीच्या योजनेत एकूण ४२ प्रकारचे बस पास उपलब्ध होते. ती संख्या आता १८ वर आली असून २४ बस पास योजना कमी करण्यात आल्या आहेत. सर्व बस पास ‘बेस्ट चलो अॅप’ तसेच विविध ‘स्मार्ट कार्ड’च्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या मासिक बस पासमधील ५० रुपयांची सवलत कायम ठेवण्यात आली आहे; परंतु साप्ताहिक पासमध्ये कोणतीही सवलत नाही.

बेस्ट सध्या तोट्यात

बेस्ट सध्या तोट्यात आहे. बेस्ट प्रशासनाला पालिकेकडून आर्थिक सहाय्य घेत कर्मचाऱ्यांचा पगार देण्याची वेळ आली आहे. यामुळे उत्पन्न वाढवण्यासाठी बेस्ट प्रशासनाकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. बेस्टच्या किमान तिकीटाचा दर पाच रुपये केल्यानंतर उत्पन्न वाढवण्यात मदत होईल, अशी बेस्ट प्रशासनाची अपेक्षा होती. मात्र, बेस्टची दैनंदिन प्रवासी संख्या ३५ लाखांवरून २५ लाखांवर पोहोचली, त्यामुळे हे उद्दिष्ट सफल झालं नाही. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने दैनंदिन आणि मासिक पासच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला.

लाखो मुंबईकरांना फटका

बेस्ट बस ही मुंबईकरांची सेकंड लाईफलाईन आहे. मुंबईत सध्या बेस्टची पास सुविधा घेणारे सुमारे १० लाख ४० हजार ९६५ प्रवासी आहेत. तर दैनंदिन प्रवासी संख्या २५ ते ३० लाख आहे. यामुळे लाखो मुंबईकरांना फटका बसला आहे. बेस्टचे उत्पन्न आणि महसूल वाढवण्यासाठी आणि प्रवाशांसाठीच्या पास पद्धतीमध्ये सुसूत्रता आणण्याची दरात बदल करण्यात आल्याचं बेस्ट प्रशासनाने सांगितलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -