Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरजांभळाच्या फळांचा हंगाम लांबला; शेतकरी हवालदिल

जांभळाच्या फळांचा हंगाम लांबला; शेतकरी हवालदिल

हंगाम संपण्यास दोन आठवडे शिल्लक, खर्च निघणे कठिण

संदीप जाधव

बोईसर : पालघर तालुक्यातील बहाडोली गावातील प्रसिद्ध जांभूळ फळांचा हंगाम लांबल्याने जांभूळ उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरवर्षी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून जांभळाच्या झाडांवर फळे तयार होऊन काढली जातात. परंतु यंदा पावसाळा सुरू होण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी शिल्लक असताना बहाडोली गावातील १० ते २० टक्के झाडांवरील जांभळाच्या फळांची काढणी होत आहे. गेल्या वर्षी मान्सून लांबल्याने जांभळाच्या झाडांना उशिरा मोहोर आल्यामुळे यंदाचा फळ काढणीचा हंगाम लांबला. पावसाळा सुरू होईपर्यंत शेतकऱ्यांना फक्त २० टक्के जांभूळ काढता येणार असल्याने जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.

बहाडोली गावच्या ११० हेक्टर क्षेत्रापैकी ६० हेक्टर क्षेत्रात सहा हजार जांभळाच्या झाडांची लागवड आहे. एका झाडापासून ५०० ते ८०० किलो जांभळाच्या फळांचे उत्पादन मिळते. सुरुवातीला हजार ते बाराशे रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्याने जांभळाच्या एका झाडामागे शेतकऱ्यांना ५० हजारांपासून ८० हजारांच्या घरात उत्पन्न मिळते. त्यामुळे बहाडोली-खामलोली भागातील पारंपरिक भातशेती करणारे अनेक शेतकरी जांभूळ शेतीकडे वळले.

एप्रिलमध्ये बाजारात दाखल होणारी जांभळे मे महिन्याचा तिसरा आठवडा पूर्ण होऊनही बाजारात उपलब्ध झालेली नाहीत. मोहोर उशिरा आल्याने फळे तयार होण्यास उशीर झाला. त्यामुळे पावसाळा सुरू होइपर्यंत एकूण उत्पादनाच्या २० टक्के जांभळे शेतकऱ्यांच्या हाती लागणार आहेत. चांगले उत्पन्न मिळत असल्याने जांभळाच्या झाडांची निगा राखण्यासाठी मोठा खर्च बहाडोलीचे शेतकरी करतात. परंतु यंदा हंगाम लांबल्याने शेतकऱ्यांचा खर्च निघणे कठीण होणार असल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत मान्सून लांबला होता. वैतरणा खाडीकिनारच्या गाळाच्या मातीची पाणीसाठवण क्षमता अधिक असल्याने यंदाच्या हंगामात जांभळाच्या झाडांना मोहोर उशिरा बहरला. मोहोर उशिरा आल्याने फळे तयार होण्यासाठी उशीर झाला. मे च्या तिसऱ्या आठवड्यात फळे काढणीसाठी तयार होण्याचे प्रमाण कमी आहे. मान्सूनच्या आगमनाला दोन आठवड्यांचा अवधी शिल्लक आहे. अशात फळे तयार व्हायला एक दोन आठवडे लागणार असल्याने पावसाळ्यात तयार होणाऱ्या जांभूळ फळांचे मोठे नुकसान होणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी तरुण वैती यांनी दिली आहे.

जांभळाच्या झाडाला मोहोराच्या काळापासून फळ तयार होईपर्यंत तीन ते चार वेळा कीटकनाशके आणि औषध फवारणी करावी लागते. तयार जांभूळ झाडांच्या फांद्यांमधून अलगदपणे काढण्यासाठी झाडाच्या चारही बाजुंनी बांबूंची ‘परांची’ बांधणे आणि फळ काढणीसाठी मनुष्यबळा मागे मोठा खर्च येत असतो. कोकण कृषी विद्यापीठाने वीस वर्षांपूर्वी केलेल्या जांभूळ पिकाच्या पाहणीनंतर बहाडोली गाव जांभुळगाव म्हणून नावारूपाला आले आहे. कोकण कृषी विद्यापीठाने जांभळाचा कोकण बहाडोली वाण विकसित केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -