Share

कथा – प्रा. देवबा पाटील

कालच्यासारखी यशश्री परीची वाट बघत आपले “आकाशाचे गूढ” हे पुस्तक वाचत असतानाच परी आली व तिने आपल्या कोमल करांनी यशश्रीचे मागून डोळे झाकून घेतलेे व म्हणाली, ओळख बरे मी कोण आहे तर
“माझी आवडती परीताई.” यशश्रीने उत्तर दिले.
“छान ओळखले गं माझ्या लाडक्या बालीने.”परी म्हणाली.
“परीताई, वेधशाळा म्हणजे कशाची शाळा असते?” यशश्रीने प्रश्न केला.

परी म्हणाली, “वेधशाळा म्हणजे केवळ हवामानाचा अभ्यास करून हवामानाचा अंदाज सांगणारी प्रयोगशाळा असा जनसामान्यांचा समज असतो. पण वेधशाळेत हवामानाच्या अभ्यासासोबतच आकाशातील ग्रह व ता­ऱ्यांचाही अभ्यास करत असतात. त्यामध्ये दुर्बिणी उभारलेल्या असतात.”
“वेधशाळा या उंचावरच का उभारलेल्या असतात?” यशश्रीने विचारले.
“वेधशाळा या सहसा उंच ठिकाणीच उभारतात कारण उंचावरील हवा विरळ असते. शिवाय उंचावरील हवेत धुळीचे कण अत्यंत कमी असतात, जवळजवळ नसतातच. खगोल शास्त्रज्ञांना आकाश निरीक्षण करताना मध्येच हवेतील पाण्याची वाफ किंवा ढग आडवे येत नाहीत कारण उंचावर वाफ व ढग यांचे प्रमाण फारच कमी असते.”
परीने सांगितले.

“परीताई, शास्त्रज्ञ ही दुर्बिण कशाची बनवतात? आमच्या भारत देशातही मद्रासजवळ कावलूर येथे आमच्या आशिया खंडातील सर्वात मोठी दुर्बिण आहे.” यशश्रीने विचारले.

“तुलाही बरीचशी सामान्य ज्ञानाची माहिती आहे गं. सांग बरे दुर्बिण म्हणजे काय ते?” परीने प्रश्न विचारला.
“दुर्बिण म्हणजे दूरच्या वस्तू बघण्याचे उपकरण. दुर्बिणीत एक नलिका असते.” यशश्रीने उत्तर दिले.

ते ऐकून परी खूश झाली व म्हणाली “ दुर्बिणीत एक नलिका असते. त्या नळीच्या डोळ्याजवळच्या एका टोकाला एक भिंग असते त्याला नेत्रभिंग म्हणतात. तर दुसऱ्या टोकाला प्रकाश किरणांचे परावर्तन करणारे आरसे वापरलेले असतात. आरशाचे टोक बघावयाच्या दूरच्या वस्तूकडे करतात म्हणून त्याला वस्तुका म्हणतात. त्या आरशातून ग्रहगोलांकडून येणा­ऱ्या प्रकाशाच्या एकत्रित केलेल्या किरणांची प्रतिमा डोळ्याजवळच्या भिंगाने प्रमाणबद्ध रीतीने मोठी होऊन त्यातून बघितली जाते. म्हणजे दुर्बिणीतून दूर अंतरावर असलेल्या वस्तू आपणास आपल्या जवळ व मोठ्या दिसतात.”
“पण मग दुर्बिणीतून तारे कसे काय दिसतात?” यशश्रीने प्रश्न केला.

परी पुढे म्हणाली,” दुर्बिणीतून रात्रीला तारे तर दिसतातच पण दिवसाही ते दिसतात. त्याचे कारण म्हणजे तारे हे पृथ्वीपासून खूप दूरवर असल्याने ते प्रकाशबिंदूसमान दिसतात. दुर्बिणीच्या भिंगांत प्रकाशाचे वक्रीभवन होते किंवा तिच्या आरशांत त्याचे परावर्तन होते. त्यामुळे दुर्बिणीत निरीक्षित आकाशाच्या विभागाचे तेज कमी होते. उलट त्याचवेळी प्रकाशबिंदू म्हणून दिसणा­ऱ्या ता­ऱ्यांचे तेज वाढते. म्हणून दुर्बिणीतून दिवसाही तारे दिसतात.

“हे वक्रीभवन आणि परावर्तन काय असते परीताई?” यशश्रीने परीला विचारले.
“ प्रकाश हा एका पदार्थातून दुस­ऱ्या पदार्थात जात असताना प्रकाशकिरणांचे वक्रीभवन होते म्हणजे एका दिशेने जाणारा किरण दुस­ऱ्या पदार्थात शिरताना किंचितसी आपली दिशा बदलतो अर्थात थोडासा वाकतो. तसेच कोणत्याही दोन माध्यमांच्या मर्यादेवरील पृष्ठभागावर, एका माध्यमातून प्रकाशकिरण आले म्हणजे ते त्या पृष्ठभागावरून परतून पुन्हा त्याच आधीच्या माध्यमात येतात. या क्रियेस “परावर्तन” असे म्हणतात.” परीने सांगितले.
“तारे व ग्रहांविषयीची विविध माहिती आपणास कशी काय कळते?” यशश्रीने माहिती विचारली.

“आज शास्त्रज्ञांना त्यांचे घटक पदार्थ, त्यांचे रंग, तापमान, त्यांच्या हालचाली इ. सारे काही मोजता येईल अशी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे उपलब्ध आहेत. शक्तिशाली दुर्बिणींच्या, शक्तिशाली कॅमेऱ्यांच्या साहाय्याने केलेल्या ता­ऱ्यांच्या निरीक्षणांच्या नोंदी करता येतात. रेडिओ दुर्बिणींच्या साहाय्याने तारे वा ग्रहांपासून निघणाऱ्या रेडिओ लहरींची शक्तीही मोजू शकतात. वर्णपट आलेख या उपकरणाच्या साहाय्याने ताऱ्यांच्या रंगपटाचे म्हणजेच ता­ऱ्यांपासून येणा­ऱ्या प्रकाशकिरणांचे फोटो घेता येतात. या फोटोंवरून, किरणांच्या अभ्यासावरून ता­ऱ्यांचा रंग, तापमान, त्याचा वेग तसेच तो कशाचा बनलेला आहे हे कळते. ता­ऱ्यांचे घटक पदार्थ शोधण्यासाठी शास्त्रज्ञ त्या ता­ऱ्यांपासून निघणा­ऱ्या रंगपटाची तुलना आपल्या प्रयोगशाळेत तयार केलेल्या रंगपटाबरोबर करून त्याचा अभ्यास करतात. अशा रीतीने ता­ऱ्यांची माहिती शास्त्रज्ञांना मिळते.” परीने सविस्तर माहिती दिली.

“परीताई गप्पांच्या ओघात मी तुला चहापाणी देण्याचेही विसरून गेली. आता मी चहा करते. तो आपण घेऊ व मग पुन्हा गप्पांना सुरुवात करू.” असे म्हणत यशश्री पटकन स्वयंपाकघरात गेली व तिने आधी एका सुंदर स्टीलच्या पेल्यात परीला प्यायला पाणी आणले. नंतर पुन्हा यशश्री चहा करायला स्वयंपाकघरात गेली व चटकन दोन कपांत चहा घेऊन आलीसुद्धा. चहाचा एक कप तिने परीला दिला व एक कप तिने घेतला. परीही हसत हसत आनंदाने घोट घोट त्या मधुर व गरम चहाचा आस्वाद घेतला व यशश्रीची रजा घेतली.

Recent Posts

मुलगा सुटला तर वडिलांना अटक, पोर्शे अपघातात पुणे पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई: गेल्या शनिवारी पुणे शहरात भयानक अपघात घडला. या अपघातात एका लक्झरी पोर्शे कारने टूव्हीलरला…

3 mins ago

HSC Result 2024: आज जाहीर होणार बारावीचा निकाल, पाहा कुठे, कधी तपासू शकता निकाल

मुंबई: महाराष्ट्र बोर्डाच्या १२वीच्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपत आहे. आज म्हणजेच २१ मे २०२४ला…

55 mins ago

Tips: तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स या पद्धतीने करा स्वच्छ, नेहमी दिसतील नव्या सारखे

मुंबई: घरात इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जसे टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि मायक्रोव्हेव वेळेसोबतच खराब होतात. जर…

2 hours ago

IPL: हे आहेत आयपीएलमधील सर्वाधिक सामने हरणारे कर्णधार

मुंबई: यंदाच्या वर्षी आयपीएलचा १७वा हंगाम खेळवला जात आहे. या १७ वर्षात धोनी आणि रोहित…

3 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, दिनांक २१ मे २०२४.

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध त्रयोदशी शके १९४६. चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात. चंद्र राशी…

5 hours ago

केजरीवालांची स्टंटबाजी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची राजकीय सारीपाटावरील वाटचाल पाहता त्यांच्याबाबतीत ‘कोण होतास तू, काय झालास…

8 hours ago