Sunday, May 19, 2024
Homeमहत्वाची बातमीsports : खेळपट्ट्यांचा वस्तुपाठ आणि निर्भयता!

sports : खेळपट्ट्यांचा वस्तुपाठ आणि निर्भयता!

रोहित गुरव

टी-२० विश्वचषक स्पर्धेचे (sports) सूप नुकतेच वाजले. पुन्हा एकदा साहेबांनीच या स्पर्धेवर आपले वर्चस्व सिद्ध केले. विशेष म्हणजे एकदिवसीयसह टी-२० विश्वचषक पाठोपाठ उंचावत इंग्लंडने जगभरातील क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा आणि संघाच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला.

सुपर १२ मधील सर्वच, खासकरून उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने पाहिले, तर इंग्लंडच्या विजयाचे गमक स्पष्टपणे दिसून येते. खेळाडू आणि खेळपट्ट्यांबाबतच्या त्यांच्या अभ्यासाची प्रकर्षाने जाणीव होते. त्याचेच फलित भारताचा लाजिरवाणा पराभव आणि अंतिम फेरीतील पाकिस्तानच्या अपयशात दडलेले आहे.

इंग्लंड ही क्रिकेटची जन्मभूमी असली तरी टी-२० क्रिकेट खऱ्या अर्थाने फुलले ते भारतीय उपखंडातच. आयपीएलचे आयोजन आणि त्याला मिळत असलेला प्रतिसाद यामुळे या स्पर्धेला चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू या स्पर्धेचा भाग आहे.त्यांना जगभरातील दर्जेदार आणि तगड्या खेळाडूंसोबत खेळण्याचा अनुभव होता. असे असले तरी २००७ ची पहिली टी-२० विश्वचषक स्पर्धा वगळता भारताला पुन्हा जेतेपदाचा चषक उंचावण्याचे भाग्यच लाभले नाही. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत आपण कसे आणि का हरलो? याचा मागोवा घेण्यासह इंग्लंडचा संघ कसा दर्जेदार खेळू शकला? त्यांची धोरणं, त्यांचा खेळपट्ट्यांबाबतचा अभ्यास आणि त्यावर त्यांचे खेळाडू अपेक्षेप्रमाणे कसे उतरले? याकडे भारताने लक्ष द्यायला हवे.

उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने अचूक खेळपट्टी ओळखली. भारत त्यात मागे राहिला. पाटा पिचेसवर सलामीवीरांनीच तुडवायला सुरुवात करायला हवी होती. पण विकेट वाचविण्याच्या प्रयत्नात सुरुवातीपासूनच भारताने संथ फलंदाजीला पसंती दिली. महत्त्वाच्या अशा पॉवरप्लेच्या षटकांमध्ये भारताला जवळपास सहाच्या सरासरीनेच धावा जमवता आल्या. इंग्लंडने पॉवरप्लेमध्ये दहाच्या सरासरीने धावा चोपल्या. सुरुवात स्लो झाली पण नंतरही भारताच्या धावगतीचा वेग हवा तसा वाढलाच नाही. हार्दिक वगळता एकाही फलंदाजाने तसा प्रयत्नच केला नाही. संपूर्ण स्पर्धेमध्ये भारताच्या सलामीवीरांनी विकेट वाचविण्याला प्राधान्य दिले. त्याउलट इंग्लंडचे सलामीवीर प्रतिस्पर्ध्यांवर तुटून पडले. रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल या फिरकीपटूंच्या जोडीने स्पर्धेत भारताला निराश केले. दोन-दोन फिरकीपटू संघात असताना त्यांचा भारताला काहीच उपयोग झाला नाही. तरीही त्यांच्यापैकी एकाला बसवून युझवेंद्रला संधी दिली गेली नाही. चहल संपूर्ण स्पर्धा संघाबाहेर बसून राहिला.

या सर्वात विशेष म्हणजे इंग्लंडचे आक्रमक क्रिकेट. ज्याचा अन्य संघांमध्ये अभाव होता. बिनधास्त क्रिकेट काय असते, हे इंग्लंडने दाखवून दिले. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही ठिकाणी ते निर्भयपणे क्रिकेट खेळले. फलंदाज मैदानात येताच तो मोठेमोठे फटके मारायचा. अंतिम सामन्यात हेल्स लवकर बाद झाल्यावर जोस बटलरने निर्भयता सोडली नाही किंवा बचावात्मक खेळ खेळला नाही. तो तसाच आक्रमक होता. त्यामुळेच त्यांनी जेतेपदाचा चषक सहज उंचावला. टी-२० क्रिकेटचा जन्मच निर्भयतेसाठी झाला आहे. आक्रमकतेची धार बोथट झाली की, मग तुमची घसरगुंडी झालीच समजा. संयमी खेळ हा या फॉरमॅटचा पिंड नाहीय आणि बचावात्मक सुरुवात ही तर नाहीच नाही. इथेच भारत, पाकिस्तान हे जेतेपदाचे संभाव्य संघ चूक करून बसले आणि विश्वचषक गमावला. अलीकडच्या खेळपट्ट्या ओळखा आणि सामना जिंका या कामात इंग्लंड शत प्रतिशत यशस्वी ठरले, तेही चिडीचूप राहून. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांचा यजमान संघाने जेवढा अभ्यास केला नसेल त्याच्या कैक पटीने तो इंग्लंडने केला. त्यानुसार धोरणं आखली गेली. खेळाडू त्यावर खरे उतरले आणि अपेक्षेप्रमाणे त्यांनी यश संपादन केले. त्यामुळेच खेळाबरोबरच खेळपट्टी ओळखा हा वस्तुपाठ या स्पर्धेने घालून दिला आहे.

कमी झालेली आक्रमकता पराभवाच्या खाईत टाकते. मग पुनरागमन करायला वेळच मिळत नाही. त्यामुळे सुरुवातीपासूनच आक्रमक राहा, हा धडाही या स्पर्धेने घालून दिला आहे. लहान फॉरमॅटमधील क्रिकेट हेच आहे. जे टी-२० क्रिकेटचे माहेरघर आणि आयपीएलची जन्मभूमी अशी शेखी मिरवणाऱ्या भारतीय संघाला कळू शकले नाही हे नवलच. असो आता स्पर्धा संपली आहे. यापुढे तरी त्यात सुधारणा व्हावी हीच अपेक्षा. जगात कुठेही खेळा पण आधी खेळपट्ट्या अचूक ओळखायला शिका आणि आक्रमकतेची धार बिलकुल कमी होऊ देऊ नका, सलामीवीरांनी तर नाहीच नाही, हे भारताने आपल्या मनावर कोरायलाच हवे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -