Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीतुर्की-सिरियातील भूकंपबळींचा आकडा २१ हजारांपुढे

तुर्की-सिरियातील भूकंपबळींचा आकडा २१ हजारांपुढे

दशकातील सर्वाधिक प्राणहानी करणारा विनाशकारी भूकंप; २ कोटी ३० लाख नागरिक बाधित

नवी दिल्ली : या दशकातील सर्वाधिक प्राणहानी झालेल्या तुर्कस्तान व सिरियातील विनाशकारी भूकंपबळींनी २१ हजाराचा आकडा पार केला आहे. तसेच २० हजारांहून अधिक नागरीक जखमी झाले आहेत. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तेथे १० भारतीय अडकले असून बंगळुरूचा एक नागरीक बेपत्ता असल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली.

तुर्की आणि सिरियात एकापाठोपाठ एक झालेल्या पाच भूकंपामुळे आणि त्यानंतर बसलेल्या तब्बल १५०९ धक्क्यांमुळे मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी झाली असून शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या. या दुर्घटनेत बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू असल्याने अद्याप अधिकृत आकडा कळू शकलेला नाही. परंतु आत्तापर्यंत १५ हजार नागरिकांचा मृत्यू झाला असून २० हजारांहून अधिक नागरीक जखमी झाल्याचे समोर येत आहे. तर आतापर्यंत २५ हजारांपेक्षा जास्त जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. भूकंपग्रस्त भागात ठिकठिकाणी अनेक बचाव पथके दिवस-रात्र काम करत आहेत.

भूकंपग्रस्त भागात सुमारे साठ हजार बचाव पथक कर्मचारी राबत आहेत. परंतु हा विनाश इतका व्यापक आहे की बरेच भूकंपग्रस्त अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे सरकारकडे अधिक मदत पाठविण्याची मागणी सातत्याने होत आहे.

यापूर्वी वायव्य तुर्कीमध्ये १९९९ मध्ये झालेल्या भूकंपात १७,००० जणांचा मृत्यू झाला होता. तर त्याआधी नेपाळमध्ये २०१५ मध्ये आलेल्या ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपात ८,८०० जणांचा मृत्यू झाला होता. दुर्दैवाने त्यापेक्षाही हा भूकंप अधिक प्राणघातक ठरला आहे.

२ कोटी ३० लाख नागरिकांना झळ पोहोचल्याची शक्यता – डब्ल्यूएचओ

तुर्कस्तानात अनेक वाचलेल्या भूकंपग्रस्तांना मोटारीत किंवा सरकारी आश्रयस्थानांत झोपावे लागत आहे. कडाक्याची थंडी व भूकंपोत्तर धक्क्यांमुळे बचाव प्रयत्नांत अडथळे येत होते. जोखीमही वाढत आहे. २५ हून अधिक देशांतील शोध पथके बचावकार्यात सामील झाली आहेत. जागतिक समूहाकडून मदतीचा ओघ सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे वरिष्ठ आपत्कालीन अधिकारी अॅडेलहेड मरशग यांनी या भूकंपग्रस्त प्रदेशात तब्बल दोन कोटी ३० लाख नागरिकांना झळ पोहोचल्याची शक्यता व्यक्त केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -