Friday, May 17, 2024
Homeब्रेकिंग न्यूजAakashvani : श्रोतेहो नमस्कार, पुणे आकाशवाणीचं बातमीपत्र आजपासून कायमचं बंद!

Aakashvani : श्रोतेहो नमस्कार, पुणे आकाशवाणीचं बातमीपत्र आजपासून कायमचं बंद!

पुणे: श्रोतेहो नमस्कार, आकाशवाणीचे हे पुणे केंद्र आहे. आजपासून तुम्हाला यापुढे बातमीपत्र ऐकू येणार नाही!

पुणेकरांनो! आणि त्यातही आकाशवाणीचं बातमीपत्र आवर्जून ऐकणाऱ्यांनो, असे शब्द तुमच्या कानावर पडतील याची तयारी करुन घ्या. कारण आकाशवाणी पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय प्रसार भारतीने (Prasar Bharati)  घेतला आहे.  पुणे वृत्त विभागाची जबाबदारी आता छत्रपती संभाजीनगरमधील आकाशवाणी (Chhatrapati Sambhaji Nagar Akashwani) केंद्रांकडे सोपवण्यात येणार आहे. तसं प्रसार भारतीकडून सांगण्यात आलं आहे. मात्र पुण्यातील वृत्त विभागच बंद होत असेल तर छत्रपती संभाजीनगरला बातम्या कशा पाठवल्या जाणार हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

केंद्रीय प्रसार भारतीने धोरणात्मक निर्णय घेतल्याने, त्याची अंमलबजावणी होत आहे. त्यानुसार आकाशवाणी पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग १९ जूनपासून बंद होत आहे. आता हेच बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन प्रसारित होईल, असं आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे संचालक इंद्रजित बागल यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितलं.

आकाशवाणी पुणे केंद्रावरुन सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पहिलं बातमीपत्र सादर केलं जातं. त्यानंतर मग ८ वाजता, १० वाजून ५८ मिनिटं आणि ११ वाजून ५८ मिनिटं, त्याचबरोबर संध्याकाळी ६ वाजता अशी बातमीपत्रं सादर केली जातात. आता पुण्याची ही सगळी बातमीपत्रं छत्रपती संभाजीनगरवरुन प्रसारित करण्याचा निर्णय प्रसार भारतीने घेतला आहे.

दरम्यान, पुणे आकाशवाणी केंद्राच्या श्रोत्यांची संख्या जवळपास २४ लाख इतकी आहे. आकाशवाणी पुणे केंद्र आणि श्रोत्यांचं एक घट्ट नातं आहे. अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत आकाशवाणीचे चाहते आहेत. ८०-९० च्या दशकात जन्मलेल्यांसाठी तर आकाशवाणी हा हळवा कोपरा आहे. त्यामुळेच देशातील आकाशवाणीच्या विविध केंद्रांपैकी सर्वाधिक श्रोते हे पुणे केंद्रालाच लाभले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -