Friday, May 17, 2024
Homeमहत्वाची बातमीNew Year : नववर्षात काय घडणार? काय म्हणाले, पंचांगकर्ते दा. कृ .सोमण?

New Year : नववर्षात काय घडणार? काय म्हणाले, पंचांगकर्ते दा. कृ .सोमण?

नववर्षात सुट्ट्यांची चंगळ

दोन सूर्यग्रहण तर दोन चंद्रग्रहण…

ठाणे (प्रतिनिधी) : येत्या १ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या २०२३ या वर्षात (New Year) काय काय घडणार, हे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी शनिवारी सांगितले. यावर्षी २०२२ मध्ये ३१ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजता लीप सेकंद पाळला जाणार नाही. त्यामुळे शनिवार ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री ठीक १२ वाजता नूतन वर्ष २०२३ चा प्रारंभ होणार आहे. २०२३ हे लीपवर्ष नसल्याने फेब्रुवारी महिन्यात २८ दिवस आहेत. त्यामुळे संपूर्ण वर्षाचे दिवस ३६५ असणार आहेत.

२०२३ मध्ये चाकरमान्यांसाठी सुट्ट्यांची चंगळ असणार आहे. यावर्षी २४ पैकी तीन सुट्ट्या शनिवारी आणि दोन सुट्ट्या रविवारी येणार आहेत. महाशिवरात्र १८ फेब्रुवारी, रमझान ईद २२ एप्रिल आणि मोहरम २९ जुलै हे दिवस शनिवारी आणि छ. शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी आणि दिवाळी लक्ष्मीपूजन १२ नोव्हेंबर हे दिवस रविवारी येणार आहेत. १८ जुलै ते १६ ऑगस्ट हा अधिक श्रावण महिना येणार आहे. त्यामुळे नागपंचमी पासूनचे सर्व सण साधारण १९ दिवस उशीरा येणार आहेत. विवाहोच्छुकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे चार महिने वगळता इतर आठ महिन्यांत विवाह मुहूर्त देण्यात आले आहेत. गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी म्हणजे श्रीगणेश चतुर्थी मंगळवार १९ सप्टेंबरला आली असल्याने यावर्षी गणेश चतुर्थीला अंगारक योग आला आहे. या नूतन वर्षी मंगळवार १० जानेवारी रोजी एकच अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे. सोने खरेदी करणा-यांसाठी या नूतन वर्षामध्ये एकूण चार गुरुपुष्यामृत योग आले आहेत. ३० मार्च, २७ एप्रिल, २५ मे आणि २८ डिसेंबर रोजी गुरुपुष्यामृत योग असणार आहेत. नवीन वर्षात २ सूर्यग्रहणे आणि २ चंद्रग्रहणे अशी एकूण चार ग्रहणे होणार असली तरी २० एप्रिल आणि १४ ऑक्टोबरची दोन्ही सूर्यग्रहणे भारतातून दिसणार नाहीत. मात्र ५ मे चे छायाकल्प चंद्रग्रहण आणि २८ ऑक्टोबरचे खंडग्रास चंद्रग्रहण ही दोन्ही चंद्रग्रहणे भारतातून दिसणार आहेत.

एका इंग्रजी महिन्यात दोन पौर्णिमा आल्या तर दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्रास ‘ब्ल्यू मून’ म्हणतात. १ ऑगस्ट आणि ३१ ऑगस्ट रोजी पौर्णिमा आल्याने ३१ ऑगस्ट रोजी ‘ब्ल्यू मून’ योग आला आहे. पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्या जवळ आला असेल तर सुपरमून योग असतो. त्या दिवशी चंद्रबिंब १४ टक्के मोठे आणि ३० टक्के जास्त प्रकाशित दिसते. १ ऑगस्ट आणि ३१ ऑगस्ट असे दोन सुपरमून योग येणार आहेत. तिथीप्रमाणे शुक्रवार २ जून रोजी आणि तारखे प्रमाणे मंगळवार ६ जून रोजी शिवराज शक ३५० सुरू होणार आहे. रविवार १२ नोव्हेंबर रोजी दिवाळीत नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी, कुबेर पूजन एकाच दिवशी येणार आहे. बलिप्रतिपदा मंगळवार १४ नोव्हेंबर रोजी आणि भाऊबीज बुधवार १५ नोव्हेंबर रोजी असल्याचे दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -