आंदोलन संपले, खरे प्रश्न उरले…

Share

प्रा. अशोक ढगे

शेतकऱ्यांनी अखेर दिल्लीतील आंदोलन मागे घेतले. या आंदोलनातून हाती नेमकं काय आलं आणि आंदोलनातून मार्ग काढण्याचं श्रेय कुणाचं याची चर्चा सुरू आहे. असं असलं, तरी आंदोलनाने काय साधलं हे व्यवस्थित उलगडण्यासाठी काही काळ जावा लागेल; परंतु या आंदोलनामुळे शेतकऱ्यांचे देशव्यापी संघटन उभं राहिलं आहे. दुसऱ्या बाजूने पाहता सरकारलाही शेतकऱ्यांचे प्रश्न नव्या हुशारीने हाताळायची संधी मिळणार आहे.

केंद्र सरकारने केलेले तीनही कृषी कायदे वादग्रस्त झाले होते. ते शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचं भाजप अजूनही सांगत असला तरी शेतकऱ्यांना तसं पटवून देण्यात सरकारला यश आलं नाही. कायम ताठर भूमिका घेणाऱ्या सरकारला तीन राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकीतल्या संभाव्य फटक्याच्या भीतीनं जमिनीवर आणलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले तीनही कायदे रद्द करण्याचे आश्वासन संसदेत कायदे परत घेऊन पूर्ण केले तरीही शेतकरी मागे हटायला तयार नव्हते. लखीमपूर घटनेतल्या शेतकऱ्यांवरचे गुन्हे मागे घेणं, किमान हमी भावाचा कायदा करणं यांसारख्या मागण्यांवर शेतकरी ठाम होते; परंतु तीनही कायदे मागे घेतल्याने शेतकरी संघटनांमध्ये फूट पडायला सुरुवात झाली होती. फार आक्रमक राहून चालणारं नव्हतं. शेतकऱ्यांचा संयम संपत चालला होता.

दुसरीकडे, आंदोलनाचा परिणाम अनुभवू शकणाऱ्या उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडच्या निवडणुका अवघ्या तीन-चार महिन्यांवर आलेल्या. अशा परिस्थितीत दोन्ही बाजूंनी एक एक पाऊल पुढे येणं आवश्यक होतं. गेले दहा महिने ताठरपणा घेणाऱ्या दोन्ही बाजू पुढे आल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या चाणक्य नीतीला अखेर यश आलं. शेतकरी आंदोलन मागे घेण्यात आलं. आंदोलन चालवण्यासाठी केलेली संघटना विसर्जित होणार नाही. उलट, संयुक्त किसान आघाडीचा पाया मजबूत झाला आहे. आता संघटनेला राष्ट्रीय स्तरावर नेण्याची तयारी सुरू आहे. आजवर शेतकऱ्यांची राष्ट्रीय संघटना नव्हती. यापुढे आघाडी ही पोकळी भरून काढेल. आंदोलन संपल्यानंतर संघटनेची औपचारिक रचना तयार होईल आणि भविष्यातील कृती आराखडाही तयार होईल.

खरं तर, संघटनात्मकदृष्ट्या संयुक्त किसान मोर्चा अजूनही एक अतिशय लवचिक संघटना आहे. त्याची पायाभरणी दिल्लीत सप्टेंबर २०२० मध्ये झाली. नऊ सदस्यीय समन्वय समितीने मोर्चाच्या नावाने काम सुरू ठेवलं. आंदोलक शेतकऱ्यांनी मोर्चाच्या संघटनात्मक अडथळ्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांचं संपूर्ण लक्ष त्यांच्या ध्येयावर केंद्रित होतं. आता मागण्या पूर्ण झाल्यानंतर शेतकरी नेतृत्व आघाडीला कायम स्वरूप देण्याच्या तयारीत आहेत. औपचारिक आराखडा तयार झाल्यानंतर त्याचा कृती आराखडा तयार केला जाईल. ‘जय किसान आंदोलना’चे अध्यक्ष अवीक साहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त किसान मोर्चा ही शेतकऱ्यांची राष्ट्रीय संघटना बनेल. १५ जानेवारीच्या सभेत ‘जय किसान’च्या वतीनं मोर्चाची महासभा स्थापन करण्याची घोषणा होईल. त्यात मोर्चात सहभागी असलेल्या सुमारे ५५० शेतकरी संघटनांना प्रतिनिधित्व द्यावं, असा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. तसंच दैनंदिन कामकाजासाठी कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांचे स्थानिक प्रश्न बुलंद आवाजात राष्ट्रीय स्तरावर उपस्थित करण्यासाठी आघाडी प्रयत्नशील राहील. त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नांवर जोरदार आवाज उठवला जाईल. आधीच सदस्य असलेल्या राज्यांमध्ये संयुक्त किसान मोर्चा आपला पाया आणखी मजबूत करेल. संघटनेची पाळंमुळं न रुजलेल्या ठिकाणी संघटनेची स्थापना करून पाळंमुळं रुजवली जातील. तिथे शेतकरीविरोधी धोरणांविरोधात मोर्चा आवाज उठवेल. शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सार्वत्रिक आहेत, त्यावर योग्य तोडगा काढण्यासाठी आघाडी भविष्यात काम करणार आहे. समस्या स्थानिक असो वा राष्ट्रीय; त्यामुळे काही फरक पडत नाही. संयुक्त किसान मोर्चा चळवळीत अनेक विरोधाभास होते. विचार, समजात पोकळी होती. गेल्या वर्षभरात शेतकरी चळवळीत अनेक विरोधाभास निर्माण झाले.

प्रत्येक राज्यात शेतकऱ्यांच्या समस्या आहेत. पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्लीसह अन्य राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्या सारख्या नाहीत. कोअर कमिटीच्या एका सदस्याच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधानांच्या घोषणेनंतर पंजाबमधील सर्व ३२ जथाबंदी परत जाण्याच्या तयारीत होते. त्यांचा विश्वास होता की, हा लढा कृषी कायद्याविरोधात होता. किमान हमी भाव हा त्यांच्यासाठी मोठा मुद्दा नाही. अशा परिस्थितीत आता सीमेवर बसण्यात अर्थ नाही. यावर नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाली. खूप समजावून सांगितल्यानंतर पंजाबच्या शेतकरी संघटना थांबण्यास तयार झाल्या.

आपल्या देशातल्या शेतकरी चळवळींच्या इतिहासावर स्थानिक समस्यांचं वर्चस्व राहिलं आहे. पश्चिम उत्तर प्रदेशमधल्या शेतकऱ्यांची मोठी समस्या म्हणजे उसाची किंमत आणि थकबाकी. पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारच्या शेतकऱ्यांसाठी किमान हमी भावानं अन्नधान्याची खरेदी हा महत्त्वाचा विषय असतो. पंजाबमधल्या शेतकऱ्यांना सध्याच्या मंडी व्यवस्थेत बदल नको आहे, तर बुंदेलखंड आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न व्याज आणि पाण्याची समस्या हा आहे. अशा स्थितीत संयुक्त किसान मोर्चा हे सर्व प्रश्न एका छताखाली कसे आणणार हा मुद्दा आहे. या चळवळीने शेजारील राज्यांच्या संस्कृतीची ओळख करून दिली. दिल्लीच्या तीन सीमा आणि प्रदीर्घ काळ चाललेलं आंदोलन केवळ त्यांच्या मागण्यांसाठी लोकांच्या लक्षात राहिलं नाही, तर पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या शेजारील राज्यांचंही आकर्षणाचं केंद्र राहिलं. या आंदोलनादरम्यान दिल्लीतल्या लोकांनी सांस्कृतिक कार्यक्रमांपासून खेळांपर्यंत विविध कार्यक्रमांतर्गत शेजारील राज्यांचे विविध रंग पाहिले. पंजाब, उत्तराखंड तसंच पश्चिम उत्तर प्रदेशमधून गाझीपूर सीमेवर पोहोचणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही जास्त होती. दंगल, कबड्डी या देशी खेळांनी वेळोवेळी रंगत आणली. पंजाबी गायकांनी आपल्या गीतांनी आंदोलकांना प्रोत्साहन दिलं, तर दुसरीकडे सिंघू सीमेवर पंजाबची संस्कृती पाहायला मिळाली. इथे केटरिंगसाठी बसवलेल्या मशिन्सनेच लोकांचं अधिक लक्ष वेधून घेतलं.

कृषी कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चाचं ३७८ दिवस चाललेलं आंदोलन संपुष्टात आलं. केंद्र सरकारने यासाठी उचललेल्या सकारात्मक पावलांचं श्रेय गृहमंत्री अमित शहा यांच्या रणनीतीला जातं. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मोदी यांनी शहा यांच्यावर आंदोलन संपवण्याची जबाबदारी सोपवली होती आणि ते पडद्याआडून सतत आपल्या रणनीतीवर काम करत होते. जाट महासभेचे सरचिटणीस युद्धवीर सिंग यांच्या माध्यमातून शहा संयुक्त किसान मोर्चाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सतत संपर्कात होते. शेतीविषयक कायदे परत घेतल्यानंतर सरकारला वादावर तोडगा काढायचा होता. केवळ आंदोलन संपून चालणार नाही, तर संतप्त शेतकरी समाधानाने परतले पाहिजेत, अशी रणनीती होती. या भागात नुकसानभरपाई, खटले मागं घेणं, वीज कायद्यात तडजोड आणि किमान हमी भावाची कायदेशीर हमी या बाबी समितीसमोर पाठवण्यासाठी वेगवेगळे प्रस्ताव ठेवण्यात आले होते. या प्रस्तावातल्या तरतुदींवर शेतकरी संघटनांचे आक्षेपही शहा यांनी वैयक्तिक पातळीवर सोडवले. आघाडीतल्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांशी एकत्र बोलण्याऐवजी शहा यांनी युद्धवीरची निवड केली. महिनाभर चाललेल्या चर्चेनंतर प्रस्तावांवर एकमत झालं.

लखीमपूर खेरी घटनेत गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या राजीनाम्यावर शेतकरी ठाम होते. मात्र शनिवारी मोर्चेकऱ्यांनी राजीनाम्याला चिकटून न राहण्याचं मान्य केल्यावर आंदोलन संपल्याचा संदेश मिळाला. सध्या किमान हमीभाव मिळणाऱ्या पिकांची ही सुविधा सुरूच राहील. किमान हमीभावाने केलेल्या खरेदीची रक्कमही कमी केली जाणार नाही. हरियाणा आणि उत्तर प्रदेश सरकारनं शेतकऱ्यांवर दाखल केलेले दावे परत घेण्यास सहमती दर्शवली आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्येही भरपाई देण्यावर सहमती झाली आहे. पंजाब सरकारप्रमाणे इथेही पाच लाखांची भरपाई दिली जाणार आहे. सरकार वीज दुरुस्ती बिल थेट संसदेत आणणार नाहीत. आधी शेतकऱ्यांशिवाय सर्व संबंधित पक्षांशी चर्चा केली जाईल. प्रदूषण कायद्याच्या कलम १५ वर शेतकऱ्यांचा आक्षेप होता. त्यामध्ये दंडाची तरतूद आहे. ही तरतूद केंद्र सरकार वगळणार आहे. कृषी कायदे रद्द होणं शेतकऱ्यांच्या फायद्याचं होतं की, त्यात दुरुस्ती करून दोन्ही पक्षांना समस्त शेतकरीवर्गाचं खरं हित साधता आलं असतं, हा कळीचा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.
(अद्वैत फीचर्स)

Recent Posts

Water Shoratge : राज्यात पाण्याची टंचाई! केवळ २८ टक्केच पाणीसाठा शिल्लक

अनेक धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा मुंबई : सध्या राज्यात उकाडा प्रचंड वाढला असून पाणी आटत…

38 mins ago

Megha Dhade : राहुल गांधी माझा देश सोडा आणि नरकात जा!

मराठी अभिनेत्री मेघा धाडेने व्यक्त केला तीव्र संताप मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra…

2 hours ago

Illegal Money : निवडणुकीदरम्यान राज्यात पैशांचा पाऊस! बीड येथे कारमध्ये सापडले तब्बल एक कोटी

तर दुसरीकडे बीकेसीमध्ये सापडला बनावट नोटा तयार करणारा कारखाना मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election)…

2 hours ago

मे महिन्यात या राशीच्या लोकांना मिळणार प्रमोशन, करिअरमध्ये मिळणार मोठे यश

मुंबई: मे महिन्याची सुरूवात झाली आहे. हा महिना अनेक गोष्टींनी महत्त्वपूर्ण आहे. या महिन्यात अनेक…

3 hours ago

IPL 2024: विराट कोहलीने रचला इतिहास, आयपीएलमध्ये असे करणारा ठरला पहिला फलंदाज

मुंबई: आयपीएल २०२४च्या(ipl 2024) ५२व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सला चार विकेटनी हरवले. आरसीबीच्यया…

4 hours ago

उन्हाळ्याच्या दिवसांत अंडी फ्रीजमध्ये ठेवावीत का?

मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसांत प्रत्येक गोष्ट फ्रीजमध्ये ठेवली जाते. अंडीही. आज जाणून घेऊया उन्हाळ्याच्या दिवसांत अंडी…

5 hours ago