Monday, May 20, 2024
HomeUncategorizedटेकडी परिसरातील रहिवाशांचा जीव टांगणीला

टेकडी परिसरातील रहिवाशांचा जीव टांगणीला

आपत्कालीनसाठी पालिका सज्ज

कल्याण (वार्ताहर) : गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे कल्याण तसेच टिटवाळा येथील टेकडी परिसरातील रहिवासी भीतीच्या छायेत वावरत आहेत. पालिकेकडून या टेकडी परिसरात सुरक्षेच्या उपयायोजना करण्यात आल्या आहे. तर मागील काही वर्षात पावसामुळे दरडी कोसळल्याच्या घटना घडल्यामुळे नागरिकांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे.

कल्याणमधील नेतीवली, कचोरे तर आंबिवली – मोहने परिसरातील जेतवन नगर, आर. एस. टेकडी, बळ्याणी, आर. के. नगर, टिटवाळामधील इंदिरा नगर, डोंगरवाली माता व टेकडीच्या आजूबाजूच्या परिसरात हजारोंच्या संख्येने रहिवाशी पावसाळ्यात जीव मुठीत घेवून गेल्या कित्येक वर्षांपासून राहत आहे. या टेकडी परिसरात दरवर्षी पावसाळ्यात भुस्सखलनामुळे दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. तर डोंगरावरील माती भुसभुशीत होत असल्याने टेकडीवरील दगड पायथ्याशी असलेल्या घरांवर कोसळतात. यापूर्वी कल्याण पूर्वेतील नेतीवली टेकडी परिसरात अनेकदा अशा घटना घडल्या आहेत.

२००९ मध्ये दरड कोसळून एका मुलाला जीव गमवावा लागला होता. २०११ मध्ये तिघांचा मृत्यू तर ६ जण जखमी झाले होते. तसेच जय भवानीनगरमध्ये दरड कोसळून सात जण जखमी झाले होते. यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ३ जुलैला कचोरे येथील हनुमान नगर येथील टेकडीवरील दरड कोसळल्याची घटना घडली होती. तर दहा दिवसाच्या फरकाने पुन्हा दरड कोसळल्याची घटना घडली. त्यामळे सदरील परिसर पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धोकादायक तसेच संवेदनशील बनतो.

पालिका प्रशासनाकडून रहिवाशांच्या जीविताला धोका पोहचू नये म्हणून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवित असते. तसेच यंदाही पालिकेकडून सर्वच शाळांच्या इमारती, काही खाजगी हॉल, पाटीदार भवन येथे संक्रमण शिबिराची सोय करण्यात आलेली आहे. त्यामध्ये बाधित होणाऱ्या रहिवाशांच्या राहण्याची सोय केली आहे. आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रत्येक प्रशासकीय प्रभागात तिन्ही शिफ्टमध्ये प्रत्येकी सहा कर्मचारी, असे एकूण दोनशे ते सव्वा दोनशे कर्मचारी आपत्कालिन सेवेसाठी तैनात केले आहेत. प्रत्येक प्रभागातील अनधिकृत नियंत्रण विभागाची वाहनेही आपत्कालिन सेवेसाठी तैनात केली असून इमारती कोसळण्याच्या घटना घडल्यास परिस्थिती हाताळण्यासाठी दोन प्रभागाला मिळून एक जेसीबी यंत्रणा चोवीस तास सज्ज ठेवण्यात आलेली आहे. तर वेळप्रसंगी मोठी आपत्कालिन घटना घडल्यास शासनाची एनडीआरएफची तुकडीदेखील पालिकेसाठी तैनात असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -