Tuesday, May 14, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखपहिली मॅच देवाला

पहिली मॅच देवाला

टी-ट्वेन्टी क्रिकेट वर्ल्डकपमधील सर्वात हायप्रोफाइल, फायनल पूर्वीची फायनल, रंगतदार, रंजक अशी अनेक विशेषणे दिली गेलेली भारत आणि पाकिस्तान मॅच रविवारी झाली. विराट कोहली संघ यावेळी ढेपाळला आणि पाकिस्तानने मागील वर्ल्डकप स्पर्धांमधील सर्वच्या सर्व १२ पराभवांचा सव्याज बदला घेतला. क्रिकेटमध्ये ११ खेळाडू खेळवावे लागतात. त्यामुळे भारताचा १० विकेट्सनी पराभव झाला. १३ क्रिकेटपटू खेळवण्याचा नियम असता, तर पाकिस्तानने १२ विकेट राखूनही विजय मिळवला असता. प्रत्येक सामन्यात त्या त्या दिवशी सर्वोत्तम खेळ करतो, तोच संघ जिंकतो. संयुक्त अरब अमिरातील (यूएई) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममधील २४ ऑक्टोबरचा रविवार भारताचा नव्हता, असे म्हणण्यापेक्षा माजी विजेत्यांना त्यांच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. दुसरीकडे, पाकिस्तानने प्रतिस्पर्धी संघाच्या प्रत्येक क्रिकेटपटूचे बलस्थान अभ्यासतानाच कमकुवत बाबीही हेरल्या. त्यामुळे बाबर आझम आणि कंपनीचा विजय तुलनेत अधिक सुकर झाला.

हार-जीत हा खेळाचा एक भाग आहे. कुठला तरी एक संघ जिंकणार आहे, तर कुणी तरी हरणार आहे. जिंकणाऱ्यांचे कौतुक होतेच. पण, कधी कधी पराभूत संघ भाव खाऊन जातो. त्यामुळे अनेक वेळा हरणाऱ्या संघातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवले जाते. भारताविरुद्धच्या मागील वर्ल्डकप लढतींचा निकाल पाहिल्यास पाकिस्तानने हार पत्करली तरी विजयासाठी निकराची झुंज दिली. पराभवातही शान असावी. त्यामुळे भारताच्या विजयासोबत प्रतिस्पर्धी संघाने दिलेली कडवी लढत म्हणून सर्व सामने चाहत्यांच्या लक्षात आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आजवरच्या सामन्यांमधील रंजकता २०२१ टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमधील पहिल्या सामन्यात पाहायला मिळाली नाही. टी-ट्वेन्टी प्रकारातील एक नामवंत संघ असलेला भारत जिंकण्यासाठी खेळलाच नाही. त्यामुळे प्रचंड उत्सुकता असलेली लढत एकतर्फी झाली आणि करोडो चाहत्यांचा भ्रमनिरास झाला.

‘जो जिता वही सिंकदर…’ याप्रमाणे पाकिस्तानच्या उंचावलेल्या सांघिक कामगिरीकडे प्राधान्याने पाहायला हवे. क्रिकेट हा सांघिक खेळ, त्यात एखाद-दुसरा फलंदाज किंवा गोलंदाज चमक दाखवतो. तरीही यशापयश हे सांघिक कामगिरीच्या आधारावर ठरते. पाकिस्तानच्या सर्वच प्रमुख गोलंदाजांनी नियंत्रित गोलंदाजी केली. विशेषकरून वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने स्टंपवर अचूक मारा करताना त्याची योग्यता दाखवून दिली. फलंदाजीतही कर्णधार बाबर आझमसह मोहम्मद रिझवानने स्टंपवरील चेंडू व्यवस्थित खेळून काढताना खराब चेंडूंचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी चुका टाळल्याने भारताचे गोलंदाज आणखी निराश झाले. त्यांचे सर्व प्रयोग पुरते फसले. सर्वच्या सर्व अकरा क्रिकेटपटूंसोबत कर्णधार आझम विजयाचा हीरो ठरला आहे. त्याने नेतृत्व आणि फलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर बाजी मारली. त्याने गोलंदाजीत केलेले बदल लक्षणीय ठरले. भारताची फलंदाजी वर्ल्डक्लास असली तरी आघाडी फळीवर अधिक अवलंबून आहे, हे पाकिस्तानविरुद्ध प्रामुख्याने जाणवले. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल लवकर बाद झाल्याने अन्य फलंदाजांना संधीचे सोने करण्याची संधी होती. मात्र, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या यांनी आयपीएलचा अनुभव पणाला लावला नाही. कर्णधार कोहलीनंतर रिषभ पंतला सूर गवसला. त्याला आणखी मोठी खेळी उभारता आली असती. मात्र, मोठे फटके मारायच्या नादात विकेट फेकली. पंत बाद झाला तेव्हा १३वी ओव्हर सुरू होती. तो सेट झाला होता. आणखी थोडा संयम दाखवला असता, तर संघाच्या खात्यात आणखी २०-२५ धावा जमा झाल्या असत्या. कदाचित त्या निर्णायक ठरल्या असत्या. फलंदाजीत फॉर्म मिळवला तरी कोहलीला नेतृत्वात छाप पाडता आली नाही. प्रमुख गोलंदाजांनी निराशा केल्याने त्याचे डावपेच फोल ठरले. नाणेफेक म्हणजे टॉसचा निकाल विरुद्ध बाजूने गेल्याने भारताचा पराभव झाला, असे काहींना वाटते. टॉस महत्त्वाचा असला तरी त्यावर संपूर्ण निकाल ठरत नाही. कोहली टॉस हरला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने भारताला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. आमच्या फलंदाजांना प्रतिस्पर्धी गोलंदाजांना व्यवस्थित खेळून काढता आले नाही. आयपीएल गाजवलेले आघाडीचे फलंदाज आत्मविश्वासाने भारलेले होते तरी त्यांचे तंत्र चुकले. काहींना अति आत्मविश्वासही नडला. मात्र, त्यांच्या चुकीपेक्षा पाकिस्तानच्या गोलंदाजांना अचूक आणि प्रभावी माऱ्याचे क्रेडिट द्यायला हवे.

अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, असे समजून पाकिस्तानविरुद्धची मॅच देवाला अर्पण करताना नव्याने सुरुवात करायला हवी. पराभव झाला ही वस्तुस्थिती असली तरी क्रिकेटपटूंनी त्याचा विचार सोडून द्यायला हवा. सलामीच्या सामन्यातील चुकांवर वेळीच उपचार शोधून काढायला हवा. तसेच उर्वरित स्पर्धेत चुकांची पुनरावृत्ती टाळायला हवी. बीसीसीआय तसेच संघ व्यवस्थापनाने माजी क्रिकेटपटू तसेच समीक्षक, जाणकारांची मते लक्षात घ्यायला हवी. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या सल्लागाराच्या नियुक्तीवर माजी महान क्रिकेटपटू, समालोचक सुनील गावस्कर यांनी केलेले भाष्य नमूद करावेसे वाटते. सल्लागार कितीही अनुभवी, टॅलेंटेड असला तरी क्रिकेटपटूंनी प्रत्यक्ष मैदानावर खेळ उंचावला नाही, तर त्यांचा सल्ला निरर्थक ठरतो. असो. यंदाच्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये भारताचे आणखी चार सामने शिल्लक आहेत. त्यात अधिकाधिक विजय मिळवून कोहली आणि सहकाऱ्यांना त्यांच्या गटात अव्वल दोन संघांमध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. मात्र, त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -