Sunday, May 19, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखअवकाळीमुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर अवकळा

अवकाळीमुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर अवकळा

राज्यात यंदा मान्सूनने सरासरी न गाठता निरोप घेतल्याने आधीच काही ठिकाणी दुष्काळसदृश स्थिती निर्माण झालेली आहे. कमी मान्सून झाल्याचा फटका यंदा बसणार आहेच; परंतु आता अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. राज्यात भातपीक कापणीचा ऐन हंगाम सुरू असतानाच अवकाळी पावसाने शिमगा सुरू केला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले होते. चक्राकार वारे वाहत असल्याचा परिणाम गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोकणासह राज्यात काही भागांत जाणवत आहे. त्यामुळे गेले दोन दिवस काही ठिकाणी पाऊस कोसळला तर काही ठिकाणी सतत पावसाळी वातावरण आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांच्या बहुतांश भागात विजांच्या कडकडाटांसह गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे.

कुडाळ, सावंतवाडी तालुक्यांना पावसाने अक्षरक्षः झोडपून काढले आहे. त्यामुळे कापणी केलेले शेकडो एकर भातपीक पाण्यात तरंगत आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे भातपिकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने तर यापुढे आणखी दोन ते तीन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविल्यामुळे बळीराजाची चिंता आणखीनच वाढली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडाटांसह सर्वच भागात सरीवर सरी कोसळल्या आहेत. सावंतवाडी, कुडाळ, मालवण आणि कणकवली तालुक्यात जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात सर्वत्रच सरी पडत आहेत. सध्या भातपीक कापणी युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी काही काळ उघडीप मिळाल्यामुळे शेकडो एकर भातपिकाची कापणी करून ते वाळत ठेवले होते; परंतु रात्री अचानक आलेल्या पावसामुळे कापणी करून ठेवलेल्या भातपिकांवर पावसाचे पाणी पडले आणि पाणी साचल्यामुळे हे भात आता कुजण्याची शक्यता आहे.

कुडाळ, सावंतवाडीतील अनेक भागांत हे पीक पाण्यावर तरंगत असल्याचे चित्र आहे. तर पावसामुळे भातपीक कापणीच्या कामांत आता खंड पडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत भातपिकाची ५० टक्के कापणी पूर्ण झाली आहे. अजूनही ५० टक्के शिल्लक आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविल्यामुळे परिपक्व भातपिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. जिल्ह्यातील ६२ हजार हेक्टरपैकी ६० हजार हेक्टरवरील भातपीक परिपक्व स्थितीत आहे. यातील फक्त ५० टक्के कापणी झाली आहे. उर्वरित शिल्लक आहे. प्रचंड मेहनतीने पिकवलेले पीक कापणीला आलेले आहे; परंतु सध्याच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील भात उत्पादकांच्या चेहऱ्यावर तीच चिंता दिसून येत आहे.

हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीऐवजी मुसळधार पाऊस कोसळत आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर, महाड, माणगाव, पाली परिसराला पावसाने झोडपले आहे. शेतात कापून ठेवलेले भातापीक पावसाच्या पाण्यात बुडून गेले. या वर्षी उशिरा सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्याची चिंता वाढवली होती. मात्र पाऊस जरी उशिरा सुरू झाला असला तरी तो प्रमाणात पडल्याने भातशेतीची पिके चांगली आली होती. मात्र अचानक सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांपुढे दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती निर्माण झाली आहे. अचानक आलेल्या या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर सर्वात मोठा फटका येथील शेतकऱ्याला बसलाय. भाताचे पीक तयार झाले असून अनेक ठिकाणी कापलेले भाताचे पीक शेतात वाळवण्यासाठी ठेवलेले आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे भात पिकाचे मोठे नुकसान झाले असून येथील शेतकरी हवालदिल झाला आहे.

हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवीत सिंधुदुर्गात मंगळवारी तर रायगड जिल्ह्यात बुधवारी अवकाळी पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे बळीराजाची एकच तारांबळ उडाली. यंदा चांगला उतारा मिळणार या आशेवर असतानाच पावसाने तडाखा दिला. आता शेतात भात पीक भिजून नुकसान झाले आहे. मात्र वातवरण असेच राहिले तर मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. अवकाळी पावसामुळे भातशेताकडे पाहून शेतकरी गहिवरून गेला आहे. हातातोंडाशी आलेला घास असा हिरावून घेतल्याने त्याची चिंता वाढली आहे. शेतात ओल झाल्याने उरलेली भात कापणी करावी कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. हातकणंगले तालुक्यातील घुणकी या गावात मुसळधार पाऊस पडल्याने संपूर्ण गाव तसेच शेतांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा, जत, पलूस, तासगाव, खानापूर तालुक्यात पावसाने हजेरी लावलीये. दिवाळीत थंडी सुरू होण्याची अपेक्षा असताना पावसाचे आगमन छाटणी झालेल्या आणि फुलोऱ्यात आलेल्या द्राक्ष बागांना धोका ठरणारे आहे. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ हवामान असून काही भागांत हलका ते मध्यम पाऊस झाला. तासगाव, पलूस, खानापूर, जत भागात पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धातास हलका पाऊस पडला.

द्राक्षाच्या फळछाटण्या झाल्या असून सध्या द्राक्ष घड कळी, फुलोऱ्याच्या स्थितीत असून यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने बुरशीजन्य दावण्या रोगाचा प्रादुर्भाव बळावण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे राज्यातील अनेक भागांत शेतकरी आणि शेती, फळबागा अडचणीत आल्या आहेत. गेली काही वर्षे अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. पाऊस आणखी पडला तर यावर्षीही मोठ्या नुकसानीला आम्हाला सामोरे जावे लागणार आहे. पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांची भात कापणी एकाच वेळी आल्याने मजूरदार मिळेनासा झाला असल्याने मजूरदारांचा भाव चांगलाच वधारला आहे. मजूर मिळत नसल्याने तारांबळ उडाली. प्रसंगी ४०० ते ६०० रुपये मोजूनही मजूर मिळेनासे झाले आहेत. पावसामुळे पीक भिजल्याने या दाण्यांना मोड येण्याची शक्यता आहे. पावसामुळे पीक वाया जात असल्याने यापुढे शेती करावी की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला असून दिवाळीच्या तोंडावरच शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर अवकाळीमुळे एकप्रकारे अवकळा पसरली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -