Saturday, May 18, 2024
Homeसाप्ताहिककोलाजPrabhu Shri Ram : गीतांमधून भेटलेले रामतत्त्व ग्रामीण संस्कृतीचे संचित

Prabhu Shri Ram : गीतांमधून भेटलेले रामतत्त्व ग्रामीण संस्कृतीचे संचित

  • दरवळ : लता गुठे

हजारो वर्षांपासून ग्रामीण संस्कृतीमध्ये रुजलेले नाम रामनामाची महती… मी लहान असताना अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अनेक वेळा सहजच कानावर पडलेला रामनामाचा मंत्र आणि त्या मंत्रांचे जीवनात असलेले स्थान अनुभवताना तो राम हा शब्द मनापर्यंत जाऊन अर्थाचं वलय निर्माण करून आकार घेऊ लागला.

पहाटेनंतरची आणि सकाळच्या आधीची वेळ म्हणजे राम प्रहर. त्या वेळेला चराचरात चैतन्य निर्माण होते. आकाशात गुलाबी लाली पसरते. थंडगार वाऱ्याची झुळूक अंगाला स्पर्श करत निघून जाते, कोकिळेचा स्वर दुरून ऐकू येतो, पक्षांचा किलबिलाट, पानांची सळसळ. राम प्रहरी डोळे मिटून मी अनुभवायची. सर्व गोष्टींचा अनुभव घेणे म्हणजे एक सुखाचेची समाधीच होती. यासोबतच रामप्रहर अनेक गोष्टी बालमनात रुजल्या त्या म्हणजे वासुदेवाची गाणी. राम नामाची महती सांगत वासुदेव अंगणात यायचा. मोराची टोपी घेरदार अंगरखा कपाळभर लावलेला गंध हातात टाळ अशा रूपामध्ये तो समोर दिसायचा, तेव्हा त्याच्याकडे पाहून आदर वाटायचा. हा अनुभव फक्त ग्रामीण भागातच मिळू शकतो. रामप्रहरी माणसं जेव्हा एकमेकांना भेटायची, तेव्हा ‘राम राम’ या शब्दाने सुरुवात व्हायची. मग समोर ओळखीचा असो किंवा अनोळखी गावात येणारे कोणाचेही पाहुणे असोत ते राम राम केल्याशिवाय पुढे जात नसत. साखरझोपेमध्येच आई-आजीचे शब्द कानावर पडायचे…
‘सकाळी उठून हाती माझ्या सडापात्र
सडा टाकते पवित्र राम रथातून उतरं’
किंवा
‘सकाळी उठून हाती माझ्या झाडणी
जाडते ईश्वराची न्हाणी,
राम मनी राम ध्यानी
रामावाचून नाही कोणी…’

आणि हे शब्द एक दिवस नाही, तर ते नित्याने ऐकायला मिळायचे. हातात काम आणि मुखात राम घेऊनच त्यांच्या दिवसाची सुरुवात व्हायची. असे रामाचे संस्कार पुढील पिढीवर घडत असत.

झोपेतून उठल्याबरोबर वडील रेडिओ लावून ठेवायचे. त्या रेडिओवर सकाळी भक्तिगीतं असायची आणि त्याच्यात जास्त रामाची गीते असायची त्यामध्ये…
‘उठी श्रीरामा पहाट झाली, पूर्व दिशा उमलली
उभी घेऊनी कलश दुधाचा, कौशल्या माऊली…’
हे गीत ऐकताना त्या अलवार शब्दांतून चित्रं डोळ्यांसमोर उभं राहायचं आणि स्वरांबरोबर विचार यायचा खरंच कसा असेल राम? कशी असेल कौशल्य माऊली? मनात निर्माण झालेले रामाचे चित्र आणि चित्रातून डोळ्यांना सुखावणारा सगून तेजस्वी धनुर्धारी राम. आमच्या घरी भिंतीवर राम सिंहासनी बसलेला बाजूला लक्ष्मण एका बाजूला सीता अन् पायाच्या जवळ बसलेला हनुमान असं चित्र होतं. त्याकडे पाहताना डोळ्यांच्या पटलावर उतरून ते प्रतिबिंब मनात साकार व्हायचं.

आई दळायला जात्यावर बसली ही पहिली ओवी ती असायची रामाला…
‘पहिली माझी ओवी गं कौशल्याच्या रामाला
यश द्यावं कामाला… गोविंदा विठ्ठला…’
अशा प्रकारे एकापाठोपाठ एकेक ओव्या सुरू व्हायच्या आणि मग राम, लक्ष्मण, भरत त्यांचं बंधुप्रेम सीता आणि राम यांच्या सहवासातील काही क्षण, रामाचा वनवास या सर्वांवर रचलेल्या ओव्या ऐकून असं वाटायचं की रामाचं स्थान सर्वसामान्य माणसांच्याही आयुष्यात किती अधोरेखित झालेलं आहे. अशा वेळेला राम हा मंदिरात नसून माणसांच्या मनामनात तो वास्तव्य करतो याचा अनुभव घ्यायचा.

दळता दळता आई गाण्यात इतकी गुंग व्हायची की, कधी दळण संपायचं हे तिला समजतही नसायचं. जात्यातून पडणार राम नामाच्या चिंतनाचं पवित्र पीठ जमा व्हायचं. त्या पिठाची भाकरी करताना परत मुखी रामाच्या ओव्या असायच्या… किती पवित्र होती ती संस्कृती आणि संस्कार आज याची कमी कुठेतरी भासते आहे. मग ‘जसं आन तसं मन’ हेच सात्त्विक विचार माणसातलं माणूसपण जपण्यासाठी उपयोगी यायचे.

साधारण मी तिसरीमध्ये असेल. शाळा सुरू व्हायला वेळ होता. सगळ्यात आधी शाळेत गेले. आमचे गुरुजी पडवीत फेऱ्या मारत होते आणि फेऱ्या मारताना राम नामात इतके गुंग झाले होते की, त्यांना आजूबाजूच्या सर्व घटनांचा विसर पडला होता. अगदी ताला-सुरात ते म्हणत होते…
‘गोदाकाठी माझ्या इथल्या, प्रभुजी अवतरले
उमटली रामाची पाऊले…’
आज हा लेख लिहिताना मला त्या गाण्याच्या शब्दांबरोबर गुरुजींचा स्वरही नकळत कानी पडल्याचा भास झाला… संपूर्ण भजन नाही तरी या दोन ओळी मात्र माझ्या मनामध्ये कायम राहिल्या.

कित्येक पिढ्याने ऐकलेली अनेक रामाची भजने आणि त्यातून घडलेली पवित्र विचारांची वृत्ती. शब्दांचे माधुर्य आणि स्वरांची गोडी कायम सकारात्मक ऊर्जा देत राहते आणि राम भक्तीची ज्योत मनात तेवते. ही भजने कालातीत आहेत. म्हणूनच ती नूतन नवीन वाटतात…
‘कबिराचे विणतो सेले कौशल्यचा राम
भाबड्या या भक्तासाठी देव करी काम…’
हे आपण सर्वांनी ऐकलेलं भजन कितीही वेळा ऐकलं तरी ऐकावं, असं वाटतं. भक्त आणि ईश्वर यांच्यातील अद्वैत वाद आपल्याला जमू लागतो.

या रामनामाचा वेगळाच आदर मनात निर्माण होतो. विष्णूने साक्षात मानवरूपात घेतलेला रामाचा अवतार. राजाराम सर्वश्रेष्ठ योद्धा आणि तो राम एका भक्तासाठी त्याचे शेले विणायला येतो, संत तुळशीदासांच्या झोपडीसमोर उभं राहून रात्रभर ग्रंथाची राखण केली. तुळशीदासांच्या चरित्रामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत की, त्यांना रामाचे दर्शन झाले. हे ऐकून देव आणि भक्ताचं सर्वश्रेष्ठ नातं आपल्या अंत:करणात प्रकट होतं.

खालील गीत अनेक वेळा ऐकले आणि प्रत्येक वेळा ऐकताना मनाची अवस्था भावविभोर झाली…
‘काल मी रघुनंदन पाहिले
शाम मनोहर रूप पाहता पाहतची राहिले…
विसरून मंदिर, विसरून पूजा
मने पूजता तो युवराज
अबोध कसले अश्रू माझ्या डोळ्यांतून वाहिले…
काल मी रघुनंदन पाहिले…
प्रत्येक कडव्यांमध्ये केलेलं रामाचं वर्णन वाचून साक्षात आपल्यालाही रामाचं दर्शन झाल्याचा भास होतो आणि कितीही वेळा गाणे ऐकले तरीही मनाची तृष्णा भागत नाही. हा अनुभव आपल्यापैकी सर्वांनाच अनुभवलेला असेल. जात, धर्म, भाषा, प्रांत या सर्वांच्या मनात रामाचं अस्तित्व सारखंच आहे.

युगानुयुगे आदर्श पुरुष राम म्हणूनच माणसांच्या मनात विराजमान आहे. राम नामाच्या चिंतनाने एक वेळ अशी येते की…

‘मन रामी रंगले, अवघे मनाची राम झाले!’ ही अवस्था प्रत्येकाच्या जीवनात येवो, हीच श्रीरामचरणी प्रार्थना.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -