Wednesday, May 15, 2024
Homeदेशनिरोगी भारताचे स्वप्न होत आहे पूर्ण

निरोगी भारताचे स्वप्न होत आहे पूर्ण

वाराणसी दौऱ्यात केले नऊ वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन

वाराणसी (वृत्तसंस्था) : ‘निरोगी भारताचे स्वप्न पूर्ण होत आहे यासाठी तुम्हा सर्वांचे अभिनंदन!’, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभार मानले आहेत. पंतप्रधान मोदी हे सोमवारी सिद्धार्थनगर आणि वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. मोदींनी यावेळी २,३२९ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नऊ वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन केले. ते पुढे म्हणाले, ‘आता काही महिने अजून हा उत्साह टिकवून ठेवायचा आहे. पूर्वांचलसाठी, संपूर्ण उत्तर प्रदेशसाठी आजचा दिवस आरोग्याच्या डबल डोसची भेट घेऊन आला आहे. नऊ वैद्यकीय महाविद्यालयांचे सिद्धार्थ नगर येथे उद्घाटन झाले आहे. उत्तर प्रदेशातूनच देशासाठी मोठी आरोग्य योजना सुरू होत आहे. या मोठ्या कामासाठी मी तुमचा आशीर्वाद घेऊन काशीला जाणार आहे’.

‘केंद्रात आणि उत्तर प्रदेशात आज भाजप सरकार हे अनेक कर्मयोगींच्या अनेक दशकांच्या तपश्चर्येचे फळ आहे. स्वर्गीय माधव प्रसाद त्रिपाठी यांच्या रूपाने एक समर्पित लोकप्रतिनिधीही सिद्धार्थनगरने दिला, ज्यांच्या अथक परिश्रमाचा आज राष्ट्रासाठी उपयोग होत आहे. सिद्धार्थनगरच्या नवीन वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव माधव प्रसाद त्रिपाठी असे ठेवणे ही त्यांच्या सेवेला खरी श्रद्धांजली आहे. मी यासाठी योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या संपूर्ण सरकारचे अभिनंदन करतो. माधव प्रसाद त्रिपाठी यांचे नावही येथून पुढे येणाऱ्या तरुण डॉक्टरांना जनसेवेसाठी सतत प्रेरणा देईल’, असे पंतप्रधान म्हणाले.

‘सुमारे अडीच हजार नवीन खाटांची निर्मिती ही नऊ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या निर्मितीमुळे झाली आहे. पाच हजारांहून अधिक डॉक्टर आणि पॅरामेडिक्ससाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. यासोबतच दरवर्षी शेकडो तरुणांसाठी वैद्यकीय शिक्षणाचा नवा मार्ग खुला झाला आहे. उत्तर प्रदेश आणि पूर्वांचलला श्रद्धा, अध्यात्म आणि सामाजिक जीवनाशी संबंधित एक मोठा वारसा आहे. हा वारसा निरोगी, सक्षम आणि समृद्ध उत्तर प्रदेशच्या भविष्याशी देखील जोडला जात आहे’, असे मोदी म्हणाले. ‘मागील सरकारने ज्या पूर्वांचलची प्रतिमा खराब केली होती, पूर्वांचल जे एन्सेफलायटीसमुळे झालेल्या दुःखद मृत्यूमुळे बदनाम झाले होते, तेच पूर्वांचल, तोच उत्तर प्रदेश भारताला आरोग्य सुविधा देणार आहे’, असे मोदी म्हणाले.

‘उत्तर प्रदेशचे लोक विसरू शकत नाहीत की, योगींनी संसदेत राज्याच्या खराब वैद्यकीय व्यवस्थेची व्यथा कशी सांगितली. योगीजी तेव्हा मुख्यमंत्री नव्हते, ते खासदार होते आणि आज लोक पाहत आहेत योगींना जनतेची सेवा करण्याची संधी दिली, तेव्हा त्यांनी या क्षेत्रातील हजारो मुलांचे प्राण वाचवले. सरकार जेव्हा संवेदनशील असते, गोरगरिबांच्या वेदना समजून घेण्यासाठी मनात करुणेची भावना असते, तेव्हा हे असे काम होते. उत्तर प्रदेशच्या इतिहासात एकाच वेळी एवढ्या वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन झाल्याचे मोदी यांनी सांगितले.

‘ते’ गरिबांचे करोडो रुपये लुटणारे…

जे आधी सरकारमध्ये होते, ते कुठेतरी दवाखाना, कुठेतरी छोटेसे हॉस्पिटल जाहीर करून मतांसाठी बसायचे. वर्षानुवर्षे, एकही इमारत बांधली गेली नाही. जेथे इमारत होती, तेथे मशीन्स नव्हत्या, जर दोन्ही केले तर डॉक्टर आणि इतर कर्मचारी नव्हते. गरिबांचे हजारो कोटी रुपये लुटणारे होते व भ्रष्टाचाराची सायकल चोवीस तास चालायची’

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -