Saturday, May 18, 2024
Homeसाप्ताहिककोलाजदिवस सुगीचे सुरू जाहले...

दिवस सुगीचे सुरू जाहले…

छोट्या दिवाळीनंतर कार्तिकी एकादशी ते पौर्णिमेपर्यंतचे पाच दिवस तुळशी विवाह अनेक घरांमध्ये साजरा केला जातो. याबरोबरच लग्नसराईचा हंगाम जसा सर्वत्र सुरू होतो तसाच दक्षिण कोकणात देवदिवाळीपासून गावोगावच्या ग्रामदेवतांच्या जत्रांचा, वार्षिक उत्सवांचाही आरंभ होतो. एकीकडे भात कापणी, मळणीला वेग आलेला असतो. खळ्यात मेढ पुरण्यासाठी न्याम मारणाऱ्या व्यक्तीलाही अशावेळी आगळंच महत्त्वं येतं. कारण मेढ (म्याढ) पक्की नसेल तर मळणी होणं अवघड होतं. धान्याने खळं भरून जातं. याचं श्रेय कष्टकऱ्यांच्या मेहनतीला जातं तसंच ते कुलदेवतेला, ग्रामदेवतेच्या कृपादृष्टीला देणारी श्रद्धा लोकमानसात असते. पिकवलेल्या धान्यातील काही भाग देवळात देण्याच्या अलिखित परंपरा याचंच एक सन्मान्य रूप आहेत. ठिकठिकाणच्या देवतांच्या वार्षिक उत्सवांमधून स्वेच्छेने लोटणारा लोकसहभागाचा पूर हा याच कृतज्ञतेचं प्रतीक म्हटलं जातं.

कार्तिक महिन्यातल्या पौर्णिमेला देवळांतून त्रिपुरारी पौर्णिमेचा दीपोत्सव होतो. मंदिरांचे प्रांगण, परिसर दीपमाळांनी उजळलेला असतो. देवशयनी एकादशी ते कार्तिकी एकादशी या चार महिन्यांत योगनिद्रा घेणाऱ्या विष्णूहाती सर्व विश्वाची सत्ता पुन:श्च सोपवून कैलासाला निघालेल्या शंकराने त्रिपुरासुरांचा वध केल्याचा उत्सव म्हणून त्रिपुरी पौर्णिमा साजरी होते. त्रिपुरासुराच्या वधाची कथाही सर्वश्रुत आहे. त्रिपुरासुरांचा वध म्हणजे अत्याचारी वृत्तीचा बिमोड करून न्यायाचे, सौख्याचे राज्य येणे होय. वाईट शक्ती कितीही उन्मत्त झाल्या तरीही त्यांचा अंत अखेरीस होतोच आणि चांगलं – सकस आहे ते टिकतं वा त्याचा विजय होतो. हेच सूत्र अनेक पौराणिक कथांच्या अंतरंगात गुंफलेलं दिसून येईल. कथेच्या माध्यमातून मानवी जीवनाचं प्रबोधन आणि त्यातून ज्ञान देण्याचा प्रयत्न याही दृष्टीने कार्तिक महिन्यातील ‘प्रबोधिनी एकादशी’ महत्त्वाची ठरते.

याच सुमारास येणाऱ्या जत्रा म्हणजे देवतांविषयीच्या कृतज्ञ भावनेचा श्रद्धाविष्कार आहे, असं म्हणणं योग्य होईल. गावोगावच्या मंदिरांतून हा जत्रोत्सव साजरा होतो. यालाच स्थानिक भाषेत ‘दहीकाला’ म्हटलं जातं. या दहीकाल्यादरम्यान विविध कलांचं प्रदर्शन हा विशेष भाग असतो. वैकुंठ चतुर्दशीपासून देवळात होणाऱ्या या काल्यांमध्ये पुराण, कीर्तनादी कार्यक्रमांसोबतच दशावताराचे खेळ मुख्य आकर्षण असतं. रात्री रंगणाऱ्या या खेळांनाच ‘रातकाला’ असंही म्हटलं जातं आणि त्याच्या सुपाऱ्या (निमंत्रण) वार्षिकोत्सवाच्या कित्येक दिवस आधीच दशावतारी मंडळांना दिल्या जातात.

काही मंदिरांमध्ये सप्ताहाचा कार्यक्रम अखंड चालणाऱ्या भजनांनी साजरा केला जातो. प्रहरी चालणाऱ्या या भजनांमधूनही पौराणिक कथाख्यानांवर आधारित देखावे देवळाभोवती प्रदक्षिणा घालतात. सिंधुदुर्गातल्या अनेक देवळांमध्ये वैकुंठ चतुर्दशी दिवशी तरंगांसह निघणारी पालखी, देवळांच्याच आवारात रात्री रंगणारा दशावतारी खेळ आणि पहाटेचा दहीकाला यांना प्राचीन परंपरा आहे. त्रिपुरी पौर्णिमेला इथे ‘टिपरी पौर्णिमा’ असंही म्हटलं जातं. अनेक देवस्थानांमध्ये ग्रामदेवतांची दृष्ट काढण्याची पद्धत आहे. मानवी भावना व्यवहाराचे देवत्वावर आरोपण कशा पद्धतीने होते, याचे हे सांस्कृतिक उदाहरण ठरेल. भारतीय संस्कृतीमधे ईश्वराला सृष्टिकर्ता म्हटलं जातं. त्यालाही कुणाची दृष्ट लागू शकते, ही भावना मानवी संवेदनशील मनाचा श्रद्धेचा हळवा कोपरा समोर आणते. या भावनांचे परिणतरूप विधींमध्ये पडलेले दिसून येते. याच दिवशी मध्यरात्री हरिहराची भेट झाली, असंही अनेक कथांतून समोर येतं. ‘शांताकारं भुजगशयनं’ विष्णू आणि ‘त्रिपुरान्तकारी’ शिव यांची भेट ही कथादेखील अत्यंत कठीण स्थितीतही मनाचे स्थैर्य कायम ठेवण्याचा, संयमशीलता सांगते.

त्रिपुरी पौर्णिमा हा दिवस कार्तिकेयाच्या पूजनाने साजरा होतो. तारकासुराचा वध करणारा शिवपुत्र कार्तिक आणि त्याला जन्म देणाऱ्या सहा माता म्हणजेच कृत्तिका यांच्या स्मरणाचा, त्यांच्याविषयीच्या कृतज्ञतेचा दिवस. या दिवशी सिंधुदुर्गातल्या काही गावांतून कार्तिकेयाचा उत्सव साजरा होतो. कार्तिकेयाचे दर्शन घेऊन दीपदान करावे वा उजळते दिवे वाहत्या पाण्यात सोडावेत, असा या उत्सवामागील संकेत सांगतो. तसंच कार्तिकेयाच्या माता म्हणून कृतिका महोत्सवही दक्षिण भारतात करण्याची परंपरा आहे.

तुळशी विवाहानंतर काहीच दिवसांच्या अंतराने सर्वोत्तम मास (महिना) अर्थात मार्गशीर्ष महिना सुरू होतो. हे देवदिवाळीचे पर्व अनेक मंगलकार्यांच्या आरंभासाठी शुभ म्हटले जाते. याच काळामध्ये विष्णूंनी प्रलयापासून पृथ्वीला वाचविण्यासाठी पहिला मत्स्य अवतार धारण केल्याचे पुराणांमध्ये सांगितले आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला आपले वैशिष्ट्य सांगताना असे म्हटले आहे की, “मासानां मार्गशीर्षोsहमृतानां कुसुमाकरः” म्हणजेच ‘वर्षातील सर्व महिन्यांतील उत्तम मास म्हणजे मार्गशीर्ष आणि ऋतूंमधील सर्वोत्तम ऋतू म्हणजे वसंत’ म्हणजे “मी”च आहे. मार्गशीर्ष महिन्याचे ऋतुमानानुसार वर्णन करायचे तर या महिन्यात थंडीची चाहूल लागल्याने उन्हाची काहिली कमी झालेली असते, हवा आल्हाददायक वाहते. सूर्याची किरणेसुद्धा दाहक न वाटता ऊबदारपणा देतात. एकूणच कोमल भावनांचा परिपोष करणारा असा हा महिना मानवी मनाला आवडला नसता तरच नवल होतं.

दक्षिण कोकणाचा वेगवेगळ्या अंगांनी विचार करत असताना दरखेपेस त्यातून नवे काही गवसत राहते. दिवाळीचा उत्सव हा अंधारावर मात करत उजेडाकडे नेण्याचा म्हणून महत्त्वाचा ठरतो. दीपोत्सव साजरा करताना मनातला अंधःकार, वाईट विचार, अविवेकी वृत्ती यांचा नाश अपेक्षित होता आणि आहे. संत ज्ञानेश्वरांनीदेखील ‘खळांची व्यंकटी सांडो’ किंवा ‘फेडी अविवेकाची काजळी’ असंच ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे. या विचाराकडे फक्त आध्यात्मिक दृष्टिकोनातून न पाहता जीवनविषयक तत्त्वज्ञानाच्या अंगाने पाहणे आणि त्यादृष्टीने वर्तन करणे महत्त्वाचे आहे. कारण आपल्याकडील पूर्वापार रूढ झालेल्या परंपरांच्या मागील प्रत्येक कथांमध्ये कार्यकारण भाव जसा असतो, तसाच त्यातून निर्माण होणाऱ्या विधींमागे अर्थवादही दडलेला असतो. किंबहुना, मानवी जगण्याला आश्वासकता देण्यासाठी निर्माण झालेल्या कथा, मिथकांच्या मुळाशी मानवी मनाचा विचार चालीरिती, रूढी, परंपरांमधून झालेला पाहायला मिळतो.

-अनुराधा परब

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -