Saturday, May 4, 2024
Homeमहत्वाची बातमी'देशात ७५ राज्यांची गरज, सुरुवात विदर्भापासून करा'

‘देशात ७५ राज्यांची गरज, सुरुवात विदर्भापासून करा’

महाराष्ट्रातील माजी आमदाराचे पंतप्रधानांना पत्र

नागपूर : नागपूरचे माजी आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून देशाला ७५ वर्षे झाल्याच्या निमित्ताने आता विकासाच्या दृष्टीने देशात लहान लहान राज्य निर्मिती करण्याची मागणी केली आहे. या पत्रामध्ये त्यांनी परदेशामध्ये कशापद्धतीने छोट्या राज्यांची निर्मिती करण्यात आली आहे, याचाही संदर्भ दिला आहे. तसेच राज्य निर्मितीची सुरुवात विदर्भापासून करावी, अशी मागणी केली आहे.

देशमुख यांनी चार पानाचे पत्र पंतप्रधान कार्यालयाला पाठवले असून, ‘भारत 75 @ 75 लहान राज्यांच्या निर्मिती, सुरुवात विदर्भापासून करावी’, अशा विषयाचे पत्र मोदींना पाठवण्यात आले आहे.

भारतात आज २९ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेत. लोकसंख्येच्यादृष्टीने प्रत्येक राज्यात सरासरी ४.९० कोटी लोकं आहेत. अमेरिकेमधील ५० राज्यांमध्ये सम- समान ६५ लाख आणि स्वित्झर्लंडमध्ये २६ कॅन्टन्ससह ३.३० लाख लोक आहेत, असा पहिलाच मुद्दा परदेशातील आकडेवारी सांगत देशमुख यांनी आपल्या पत्रात मांडला आहे.

पुढे ते लिहितात, आपल्या प्रातिनिधिक लोकशाहीत नागरिकांच्या अपेक्षापूर्तीच्या तुलनेत आपली राज्ये खूप मोठी आहेत. या राज्यांचे मूळ हे आपल्या वसाहती इतिहासाचे आणि त्यानंतरच्या घडामोडींचे एक मिश्रण आहे, ज्यामध्ये काही लोकांना स्थानिक ओळख जपण्याची गरज भासली आणि त्या भागातील धोरणात्मक आणि प्रशासकीय धोरणं एकत्रित करण्यात आली, पत्राच्या दुस-या परिच्छेदात भारतातील राज्यनिर्मितीबद्दल सांगताना ही विधानं करण्यात आली आहेत.

महाराष्ट्र राज्याच्या शेजारी निर्माण झालेल्या लहान राज्यांची प्रगती वेगाने सुरु आहे. विदर्भासारखा सुजलाम सुफलाम प्रदेश मात्र आजही मुलभूत सुविधांसाठी झगडत आहे. नव्याने स्थापन झालेल्या शेजारच्या लहान राज्यांचे दुप्पट झालेले दरडोई उत्पन्न, वाढलेले सिंचन, आरोग्य सुविधा, शिक्षण, लोकांना सुरक्षितता वाटेल अशी कायदा व सुव्यवस्था, रस्ते, नळाद्वारे पाण्याची व्यवस्था, लोकांचे जीवनमान उंचावणा-या योजना, मुबलक वीज, पर्यायाने वाढलेले रोजगार अशी विविधांगी चित्र विदर्भात अजिबात दिसत नाहीत. ते निर्माण केल्याशिवाय विदर्भात आर्थिक समृद्धी येणे अशक्य आहे. त्यासाठी विदर्भ निर्माण करण्याची गरज आहे. जेणेकरुन विदर्भातील लोकांना चांगल्या सुखसुविधा मिळतील, उद्योगधंदे वाढतील व छोट्या- मोठ्या नोक-यांसाठी युवकांना दुसरीकडे स्थलांतर करावे लागणार नाही, तसेच शेतक-यांच्या आत्महत्यांवर अंकुश बसेल. असे म्हटले आहे. तर पत्राच्या शेवटी विदर्भ ३० व्या नव्या राज्याची घोषणा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -