Thursday, May 2, 2024
Homeताज्या घडामोडी‘मुंबईची तुंबई’ प्रतिमा बदलण्यासाठी पालिका सज्ज

‘मुंबईची तुंबई’ प्रतिमा बदलण्यासाठी पालिका सज्ज

२४ वॉर्डांत १५०० मेट्रिक टन कोल्डमिक्सचा पुरवठा

मुंबई (प्रतिनिधी) : दर वर्षी पाऊस आणि रस्त्यावरचे खड्डे असे समीकरण मुंबई शहर व उपनगरांमध्ये पाहायला मिळते. अनेकदा या खड्ड्यांमुळे अपघात होतात आणि चालकांना तसेच प्रवाशांसह पादचाऱ्यांचा जीवदेखील जातो. त्यामुळे पालिका प्रशासन खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्नशील असते. मुंबईतही पावसाळ्यात एकीकडे पाणी तुंबते; तर दुसरीकडे रस्त्यांची चाळण झालेली पाहायला मिळते. दर वर्षी मुंबईकरांना या समस्यांना सामोरे जावे लागते.

या वर्षी मुंबई महापालिकेने मान्सूनचा सामना करण्यासाठी कंबर कसली आहे. या वर्षी मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागाकडून मॉन्सूनपूर्व तयारी म्हणून १५०० मेट्रिक टन कोल्डमिक्सचा पुरवठा सर्व २४ वॉर्डंत करण्यात आला आहे, तर एमएमआरडीएद्वारे ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेला खड्डे बुजविण्यासाठी तसेच पाणी साचू नये म्हणून टीम सज्ज ठेवण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेचे पॉटहोल ट्रॅकर अॅप सध्या कार्यन्वित असून याद्वारे मुंबईकरांच्या तक्रारीचे निवारण केले जाते. या अॅपवर येणाऱ्या तक्रारींचे २४ ते ४८ तासांत निवारण करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी दिली. रस्त्यांवरील खड्डयांबाबत नागरिकांना तक्रार करता यावी, यासाठी महानगरपालिकेच्या ८९९९-२२८-९९९ या ‘व्हॉट्सअॅप चॅट’ क्रमांकासह महानगरपालिकेच्या अॅपवर आणि संकेतस्थळावर देखील ही सुविधा उपलब्ध असणार आहे.

याशिवाय मान्सूनची प्रत्येक खबरबात मुंबईकरांना आधीच कळावी यासाठी मुंबई महापालिका एक नवे अॅपदेखील लवकरच कार्यन्वित करणार आहे. मान्सून आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेत मान्सूनच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे.

पावसाळ्यात येणाऱ्या विविध अडचणींचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिका विविध उपाययोजना करत आहे. तरीही दर वर्षी मुंबईकरांना पावसाळ्यात वेवगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागतेच. यंदा कोठेही पाणी तुंबू नये आणि मुंबईची तुंबई या प्रतिमेला छेद बसावा यासाठी पालिका प्रशासनाकडून अथक प्रयत्न केले जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -