Monday, May 13, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेठाणे रेल्वेस्टेशन बाहेरील मुजोर रिक्षाचालकांना चाप बसणार..

ठाणे रेल्वेस्टेशन बाहेरील मुजोर रिक्षाचालकांना चाप बसणार..

ठाणे महापालिका आणि पोलीस संयुक्त करवाई करणार

ठाणे: ठाणे रेल्वे स्टेशनबाहेर पश्चिमेकडे बेकायदेशीर आणि बेशिस्त रिक्षा व त्यातून प्रवाशांची होणारी गैरसोय या विरोधात आता ठाणे महापालिका आणि पोलीस यांनी संयुक्तपणे धडक कारवाई मोहीम हाती घेण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती महापालिका प्रशासन, ठाणे पोलीस व वाहतूक पोलीस यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

ठाणे पश्चिम रेल्वे स्टेशन बाहेरच्या परिसरात रिक्षा चालकांच्या बेशिस्त वर्तनामुळे प्रवाशांना होणारा त्रास, अनधिकृत फेरिवाले, वाहतूक कोंडी याबाबत अनेक तक्रारी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे आल्या होत्या. त्यानंतर तातडीने स्टेशन परिसरात दौरा करुन ठाणे रेल्वेस्थानकाबाहेर १५० मीटर परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. दररोज पाच लाखाहून अधिक प्रवासी ठाणे रेल्वेस्थानकातून प्रवास करतात. महिला व मुली यांच्यासाठी रेल्वेस्थानक परिसरात सुरक्षिततेचे वातावरण असावे या दृष्टीने उपाययोजना करण्याचे नियोजन आहे. रेल्वे परिसरात होणाऱ्या वाहतूकीची कोंडीतून प्रवाशांना दिलासा मिळावा यासाठी रिक्षांचे परिचालन यामध्ये शिस्त असावी याबाबत सदर बैठकीत नियोजन करण्याच्या दृष्टीकोनातून चर्चा करण्यात आली.

सदर बैठकीस वाहूतक पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त गणेश गावडे, महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे आदी उपस्थित होते. रेल्वे स्टेशन मधून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना हाताला धरून रिक्षामध्ये ओढत नेणे, अपेक्षित भाडे मिळेपर्यत आडमुठी भूमिका घेवून रिक्षा रस्त्यात लावून ठेवणे, भाडे नाकारणे, बेशिस्तपणे रिक्षा पार्किंग करणे, अनधिकृत रिक्षांचा वावर, महिला प्रवाशांना त्रास देणे, महिला रिक्षा चालकांना अन्य रिक्षा चालकांकडून होणारा त्रास, रेल्वेच्या हद्दीत उभे राहून प्रवाशांचा भाड्यासाठी पाठलाग करणे आदी स्वरूपातील तक्रारीं नागरिकांच्या असून त्यावर करावयाची उपायोजना याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

गेल्या वर्षभरात ५०० हून अधिक बेशिस्त रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतर ही परिस्थिती बदललेली नसल्याचे पोलीसांनी नमूद केले. त्यामुळे यापुढे ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांची नियुक्ती विशेष स्वरूपात करण्यात येईल त्यातून भाडे नाकारणारा रिक्षा चालक, बेशिस्तपणे पार्किंग करणारा रिक्षाचालक व अनधिकृत रिक्षा चालक यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच ज्या रिक्षा विना परवाना चालवल्या जात आहेत त्याही जप्त केल्या जातील, या कामात ठाणे महापालिकाही पोलिसांना सहकार्य करेल, असे पालिका आयुक्तांनी सांगितले.

रिक्षा संघटनांशी चर्चा करा

रिक्षावाल्यांच्या काही जुन्या संघटना असून त्या विधायक पध्दतीने व्यवसाय करतात, अशा संघटनांशी चर्चा करुन त्यांच्या समस्यांचे प्राधान्याने निराकरण होईल. त्यांना व्यवसाय करण्यासाठी निर्धोक वातावरण निर्माण होईल याची काळजी घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

सीसीटिव्ही यंत्रणा कार्यान्वित करणार

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात यापुढे वाहतूक कोंडीवर नियंत्रण, तसेच रिक्षावाल्यांच्या मुजोरीला चाप बसविण्यासाठी पोलीसांची नेमणूक करण्यात येणार आहे. या ठिकाणी सीसीटिव्ही यंत्रणा उपलब्ध करुन देवून त्याचे नियंत्रण हे नौपाडा पोलीस ठाण्यात असेल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना पालिका आयुक्त . बांगर यांनी दिल्या आहेत. तसेच ठाणे स्टेशन परिसरात पोलीस कर्मचारी ड्यूटीवर आहेत की नाही याची देखील माहिती पोलीस विभागाला मिळेल असेही त्यांनी नमूद केले.

भिकारी, गर्दुल्ले दिसणार नाहीत या दृष्टीने कार्यवाही करा

मासुंदा तलाव हा परिसर ठाणे शहराचा मध्यवर्ती परिसर असून दररोज येथे नागरिकांची गर्दी असते तसेच सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी विरंगुळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांची देखील मोठी गर्दी असते, या नागरिकांना भिकारी गर्दुल्ले यांचा त्रास नागरिकांना होत असून याबाबत देखील तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तरी याबाबत भिकारी, गर्दुल्ले यांचा वावर तलावपाळीवर राहणार नाही या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी या वेळी दिल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -