Monday, May 20, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनठाणे म्हणजे वरळी नव्हे

ठाणे म्हणजे वरळी नव्हे

  • स्टेटलाइन: डॉ. सुकृत खांडेकर

शिउबाठाच्या ठाण्यातील युवती सेनेच्या एका कार्यकर्तीला, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या महिला आघाडीने तिने फेसबुकवर टाकलेल्या पोस्टबद्दल जाब विचारला आणि मातोश्रीला ठाण्याकडे कूच करायला निमित्त मिळाले. शिवसेनेच्या महिलांनी म्हणे तिच्यावर हल्ला केला, अशी आवई शिउबाठाने उठवली. शिंदे यांच्या समर्थकांनी गर्भवती असलेल्या महिलेवर हल्ला केला, असा शिउबाठाने कांगावा केला. ती महिला गर्भवती, तर नव्हतीच. पण तिला फ्रॅक्चरही झालेले नाही, असा खुलासा इस्पितळाच्या डॉक्टरांनी केल्यानंतरही या घटनेची तीव्रता कमी होऊ नये याची शिउबाठाने आखणी केली. उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य हे ठाण्यात येऊन धडकले व त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांवरही भरपूर तोंडसुख घेतले. शिउबाठाच्या कार्यकर्तीला खरोखरंच मारहाण झाली होती का? शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी खरोखरच लाथा-बुक्क्यांनी बडवले होते का? गर्भवती असताना त्यांना बेदम मारहाण झाली, हे वास्तव आहे का? अंगावर मारहाणीच्या जखमा आहेत का? आयसीयूमध्ये ठेवण्याइतपत गंभीर होत्या का? ठाण्यातून मुंबईच्या लिलावती इस्पितळात हलविण्याची त्यांना खरोखरंच गरज होती का? ‘ठाण्यात शिउबाठाच्या महिला कार्यकर्तीला मारहाण’ हा सर्व प्रकारच संशयास्पद वाटतो.

शिवसेनेच्या महिलांनी जाब विचारला तो उगीचच का? देशाच्या पंतप्रधानांविषयी व मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकली, याचे गांभीर्य नाही का? पंतप्रधानांविषयी व मुख्यमंत्र्यांविषयी अवमानकारक पोस्ट टाकली म्हणून पोलिसांनी काय कारवाई केली? यांची उत्तरे जनतेपुढे येणे गरजेचे आहे. मात्र तिला मारहाण झाली व ठाण्यात गुंडगिरी वाढली, अशी प्रचारमोहीम शिउबाठाने चालवली आहे व त्यालाच एकतर्फी प्रसिद्धी मिळत आहे. शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून ज्या वेगाने काम करीत आहेत, त्याला अपशकून करण्याचा प्रयत्न शिउबाठाने सतत चालवला आहे. शिंदे-फडणवीस यांच्या सरकारच्या कामात खिळ घालण्याचा अटोकाट प्रयत्न शिउबाठा करीत आहे. आपली सत्ता शिंदे-फडणवीसांना खेचून घेतली म्हणून नैराश्येतून ठाकरे-पिता, पुत्र संताप प्रकट करताना दिसत आहेत. ठाणे व ठाणेकरांविषयी मातोश्रीला एकदम जवळीक वाटू लागली, हीच मोठी गोम आहे.

आपण ठाण्यातून निवडणूक लढवणार आणि जिंकणार, असे आव्हान ठाकरे पुत्राने एकनाथ शिंदे यांना दिले आहे. शिंदे यांचे काम त्यांना ठाऊक नसावे म्हणून ते बोलत असावेत. शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. पण त्यांची नाळ ठाण्याशी जोडलेली आहे. घाम गाळून आणि रक्त सांडून त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना गावागावात पोहोचवली व घराघरांत नेली. ठाणेकरांचे दैवत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे यांचे एकनाथ शिंदे हे पट्टशिष्य आहेत. शिवसेनाप्रमुखांची विचारधारा आणि धर्मवीरांचे संस्कार अशा मुशीतून एकनाथ यांचे व्यक्तिमत्त्व घडले आहे. एकनाथ यांच्यात अनेकांना आनंद दिघे यांचे प्रतिबिंब दिसते. एकनाथ शिंदे यांच्या दाढीवरून विरोधी पक्ष त्यांना कायम लक्ष्य करत असतो. पण एकनाथ शिंदे यांनी दिघे साहेबांची फक्त दाढी घेतली नाही, तर आनंद दिघे नावाच्या तप्त सूर्याकडून त्यांचा राजकीय सामाजिक आणि अध्यत्मिक वारसादेखील घेतला. त्यांनी दाखवलेल्या हिंदुत्वाच्या ज्वलंत मार्गावर हा त्यांचा पट्टशिष्य फक्त मार्गक्रमण करत नाही, तर या मार्गावर चौफेर आपली घौडदौड करत आहे म्हणून शिवसैनिकांना त्यांच्यामध्ये दिघे साहेबांचे प्रतिबिंब ठळकपणे दिसते. त्यांचा गमावलेला आनंद त्यांना तिथे सापडतो.

रात्री-अपरात्री मदतीसाठी सदैव उपलब्ध असलेला, कार्यकर्त्यांच्या हाकेला ओ देणारा, शिवसैनिकांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी झटणारा, घरोघरी गणपती दर्शनासाठी नियमित जाणारा, शोभा यात्रा व मिरवणुकांमध्ये स्वत: जातीने सहभागी होणारा, सर्व पक्षांत मैत्रीसंबंध असलेला नेता अशी शिंदे यांची ओळख आहे. त्यांना गद्दार म्हणून आपण आपलीच किंमत कमी करून घेत आहोत, हे शिउबाठा नेतृत्वाच्या लक्षात येत नाही. एकनाथ यांना ठाण्यात आव्हान देणे सोपे तर नाहीच. पण तशी भाषा वापरणे म्हणजे भिंतीवर डोके आपटून घेण्यासारखे आहे.

सभेला गर्दी जमली म्हणजे एकनाथ शिंदे यांना आव्हान हा अर्थ होऊ शकत नाही. त्या गर्दीत हौशे-गवशे-नवशे सर्व असतात. ठाण्यातील सभेला मुंबई व परिसरातून किती गाड्या व किती लोक गेले हे ठाणेकरांना चांगले ठाऊक आहे. गर्दी व बघे वेगळे आणि कार्यकर्ते व मतदार वेगळे. मात्र त्याचे किमान भान देवेंद्र फडणवीसांना फडतूस गृहमंत्री म्हणणाऱ्यांना नाही. पोलीस आयुक्त भेटले नाहीत म्हणून संताप व्यक्त करणाऱ्या माजी मुख्यमंत्र्यांनी आपल्यावर तशी पाळी का आली? याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. ज्यांच्याकडून कायदा सुव्यवस्थेची अपेक्षा करता, त्या पोलीस आयुक्तालयाला टाळे लावू, अशी धमकी देणारे जनतेला काय संदेश देऊ इच्छित आहेत?

महाआघाडीचे सरकार असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर कारवाई करण्यासाठी शेकडो पोलिसांची फौज महाड-चिपळूणला पाठवली होती. त्याचे थेट प्रक्षेपण देशभरात सर्व वृत्तवाहिन्यांनी केले होते. राजकीय सूडबुद्धीने कंगना रणावत, अर्णव गोस्वामी, यांच्यावर कशी कारवाई झाली हेही जनता विसरलेली नाही. कंगनाच्या घरावर बुलडोझर पाठवले गेले, अर्णवला घरातून खेचून पोलिसांनी बाहेर नेले, नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरून उठविण्याचा प्रयत्न झाला. ज्यांच्या आदेशाने पोलिसांच्या बळाचा वापर झाला तेच आपल्या पक्षाच्या महिलेला मारहाण झाली म्हणून गळे काढत आहेत. कोरोना काळात अनेक शिवसैनिकांचा मृत्यू झाला, तेव्हा पक्षाचे नेतृत्व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करायला गेले नव्हते. पक्षासाठी आयुष्य पणाला लावलेल्या नेत्यांच्या मृत्यूनंतर कधी कोणी त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला गेले नाहीत. स्वत: सत्तेवर असताना ठाण्याचे उद्योजक मनसुख हिरेन यांचा गूढ मृत्यू झाला, तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांची कोणाला आठवण आली नाही. केतकी चितळेची रवानगी जेलमध्ये केली, तेव्हा तिचा कळवळा कोणाला आला नाही. मग पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकलेल्या महिलेला जाब विचारला म्हणून थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना का टार्गेट केले जाते? रिक्षाचालक ते मुख्यमंत्री हा एकनाथ शिंदे यांचा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. ठाण्यातील किसननगर परिसरात शाखा प्रमुख म्हणून त्यांनी सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली. साखरेच्या टंचाईविरोधात त्यांनी पहिले आंदोलन केले. नंतर पाणीटंचाईवर रस्त्यावर उतरून त्यांनी आवाज उठवला. ठाणेकरांसाठी शिंदे यांनी रस्त्यावर किती आंदोलने केली, याची मोजदाद करणे शक्यही होणार नाही. ठाणे महापालिकेत नगरसेवक ते सभागृह नेता या पदावर काम करताना त्यांनी आपला ठसा उमटवला.

दोन मुलांचे अपघाती निधन झाल्यानंतर त्यांना नैराश्याने ग्रासले होते. पण धर्मवीर आनंद दिघे यांनी त्यांना धीर दिला व त्यांना घरातून बाहेर काढून सक्रीय केले. आनंद मठ हे शिंदे यांचे दुसरे घरच बनले. रात्री उशिरापर्यंत ते लोकांना भेटत असत. दिघेसाहेब गेल्यावर शिवसेनाप्रमुखांनी जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. अक्षरश: जिल्हा पिंजून काढून त्यांनी शिवसेनेचा विस्तार केला. धर्मवीरांनी सुरू केलेले मलंगगडाचे आंदोलन त्यांनी पुढे नेटाने चालवले. क्लस्टर आणून शेकडो इमारतींच्या विकासाचा प्रश्न मार्गी लावला. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे भूमिपूजनही झाले आहे. बारवी धरणाची उंची वाढवली. फ्री वे ठाण्याला जोडण्याचे काम मार्गी लावले, गडकरीनंतर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह उभारले. शहरातील रस्त्यांना मोठा निधी उपलब्ध करून दिला. त्यांनी केलेल्या कामांची यादी हनुमानाच्या शेपटीसारखी लांबलचक आहे. पण त्यांना आव्हान देणाऱ्यांना त्यांचे ठाण्याच्या विकासातील योगदान ठाऊक नसावे, हे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.

आमचे नेते पोलीस आयुक्त कार्यालयात रेशनला झालेल्या मारहाणीबाबत तक्रार करायला गेले, तेव्हा पोलीस आयुक्त कार्यालयाला टाळे लावून पळाले. पोलीस मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करीत नाहीत, आयुक्त कार्यालयात थांबत नाहीत. ते वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांचे आदेश घेत आहेत. असे वक्तव्य हा निव्वळ बालिशपणा आहे. सर्वात कहर म्हणजे – ‘हे गद्दारांचे सरकार काही वर्षांचे, काही महिन्यांचे नसून काही तासांचे आहे. ते कोसळल्याशिवाय राहणार नाही. या सरकारला मदत करणाऱ्या आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना परिणाम भोगावे लागतील’, असाही सज्जड दम दिला जातो, हे जास्त गंभीर आहे. आयपीएस व आयएएस अधिकाऱ्यांच्या सहकार्यानेच राज्यकर्ते राज्याचे शकट हाकत असतात, अडीच वर्षे मंत्रीपदावर राहून याचाही विसर पडला का? वरळीतून निवडून येण्यासाठी अगोदरच्या दोन आमदारांना विधान परिषेदवर सदस्य पाठवावे लागले ही अगतिकता होती. आता ठाण्यातून निवडणूक लढवायची, तर किती जणांना विधान परिषेदवर पाठवावे लागेल, याचा हिशेब आहे का? यापुढे आपल्याला त्रास नको म्हणून समोरच्याला विधान परिषेदवर पाठविण्याइतपत आता आपल्याकडे इतकी ताकद तरी आहे का? ठाणे म्हणजे वरळी नव्हे…. ठाणे मी जिंकेन म्हणणे म्हणजे मुंगेरीलाल के सपने…

i]k=8sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -