Saturday, May 4, 2024
Homeताज्या घडामोडीGoa Accident : गोव्यात भीषण अपघात; धडक देणारीच कार नाल्यात कोसळली!

Goa Accident : गोव्यात भीषण अपघात; धडक देणारीच कार नाल्यात कोसळली!

तीन भारतीय पर्यटकांचा मृत्यू तर धडक देणारा विदेशी पर्यटक जखमी

म्हापसा : गोव्यामध्ये कार नाल्यात कोसळल्याने एक भीषण अपघात (Goa Accident) घडला आहे. शनिवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हडफडे येथील रशियन क्लबजवळ (Russian Club) ही घटना घडली. यात तीन भारतीय पर्यटक (Indian Tourists) रस्त्याच्या दुसर्‍या कडेला असणार्‍या कारमध्ये बसण्यासाठी जात होते. त्या दरम्यान मागून आलेल्या एका कारने त्यांच्या कारला धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की तीनही मित्र जागीच ठार झाले तर धडक दिलेल्या विदेशी पर्यटकाची (Foreign Tourist) कार नाल्यात कोसळली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे.

हैद्राबाद तसेच नाशिक येथील पाच मित्र मिळून गोव्यात पर्यटनासाठी आले होते. काल हे सर्व मित्र हडफडे येथील एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते. तेथून पहाटे ३.३० च्या दरम्यान बाहेर पडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पार्क करुन ठेवण्यात आलेल्या गाडीत बसण्याच्या तयारीत असताना हा अपघात घडला. हे सर्व पर्यटक ज्या गाडीतून आले होते त्या गाडीतील पुढच्या सीटवर चालक तसेच एकजण बसला होता तर इतर तिघेजण मागच्या सीटवर बसण्यासाठी दरवाजा उघडत होते.

त्याचवेळी अचानक मागून भरधाव वेगाने आलेल्या दुसऱ्या गाडीने त्या पर्यटकांच्या गाडीला जोरदार धडक दिली. दिलेली धडक एवढी जबरदस्त होती की मागच्या सीटवर बसण्याच्या प्रयत्नात असलेले तिघेही जण जागीच ठार झाले. धडक दिलेले वाहन विदेशी पर्यटक चालवत होता तो या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. या धडकेनंतर तो विदेशी चालक आपल्या वाहनासहित रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात कोसळला.

मृत पावलेल्या पर्यटकांत महेश शर्मा (नाशिक , महाराष्ट्र) दिलीप कुमार (हैद्राबाद) तसेच मनोज कुमार (हैद्राबाद ) यांचा समावेश आहे. तर गंभीर जखमी झालेल्या एंटोन बिचकोव्ह (रशिया) याला उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

मृतदेह हणजूण पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिले आहेत. या पर्यटकांसोबत असलेल्या इतर दोघांचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला आहे. रशियन चालकावर कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी दिली. पुढील तपास उपनिरीक्षक साहील वारंग करीत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -