Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीटेन्शन वाढले! कोरोनाचा आकडा वाढता वाढे...

टेन्शन वाढले! कोरोनाचा आकडा वाढता वाढे…

मुंबई : मुंबईसह राज्यात कोरोनाचा कहर दिसून येत आहे. मुंबईत तर कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेने धडक दिल्याचे चित्र सध्या दिसते आहे. या लाटेत सर्वाधिक तरूणांना संसर्ग झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. कोरोनाच्या मागील दोन लाटांच्या तुलनेत या तिसऱ्या लाटेत संसर्गाचा ‘ट्रेंड’ बदलताना दिसत आहे. विशेषज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोविड १९ च्या पहिल्या लाटेत ५० वर्षे वयापेक्षा अधिक, वृद्ध बाधितांची संख्या अधिक होती. तर दुसऱ्या लाटेत ३५ ते ४० वर्षे वयोगटातील सर्वाधिक रुग्णांना संसर्ग झाला होता.

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, या आठ दिवसांत सर्वाधिक रुग्ण हे २० ते २९ वर्षे वयोगटातील आढळले आहेत. एकूण नवीन रुग्णांच्या संख्येत २२ टक्के म्हणजेच, ३५९९ रुग्ण हे २० ते २९ वयोगटातील आहेत. त्यानंतर २१ टक्के म्हणजेच ३४३५ रुग्ण हे ३० ते ३९ वयोगटातील आहेत. याशिवाय गेल्या आठ दिवसांत कोरोनाच्या नवीन रुग्णांपैकी १७ टक्के म्हणजेच, २७८१ रुग्ण हे ४० ते ४९ वयोगटातील आहेत. तर दीड टक्का म्हणजेच २४५ रुग्ण हे ८० हून अधिक वर्षे वयाचे आहेत.

आकडेवारीनुसार, २३ डिसेंबरपासून कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. २३ डिसेंबरपर्यंत मुंबईत कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या ही ७, ६८, ७५० इतकी होती. जी ३१ डिसेंबरला वाढून ७, ८५, ११० पर्यंत पोहोचली. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, केवळ आठ दिवसांत मुंबईत कोरोनाचे १६,३६० नवीन रुग्ण बाधित झाले आहेत.

भारतात आठवड्यात रुग्णसंख्या पाचपट; दिवसभरात ३३,७५० नवे रुग्ण

गेल्या दोन आठवड्यांची आकडेवारी पाहिली तर डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात नव्या कोरोना रुग्णांची संख्या सरासरी दिवसाला साडे सहा हजार इतकी होती. तर तीच संख्या रविवारी ३३ हजार ७५० इतकी होती. जवळपास १०७ दिवसानंतर ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. २ जानेवारीपर्यंतच्या आठवड्यात दिवसाला सरासरी १८ हजार कोरोनाचे रुग्ण आढळले. १२ ऑक्टोबरनंतर आठवड्याच्या सात दिवसांच्या सरासरीत ही संख्या पहिल्यांदाच जास्त आहे. २६ डिसेंबरला ६ हजार ५३१ जणांना देशात कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आज हीच संख्या पाचपट झाली असून ३३ हजारांच्या वर कोरोना रुग्ण आढळले आहेत.

मुंबईत रविवारी ८०६३ नवे रुग्ण; राज्यात ११,८७७ बाधित

रविवारी मुंबईत ८०६३ नव्या रुग्णांची नोंद झाली. शनिवारपेक्षा ही वाढ २७ टक्क्यांनी जास्त आहे. राज्यातही बाधितांची संख्या वाढत असून काल ११,८७७ बाधित आढळले. रविवारी ९ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये ८,०६३ बाधित रुग्ण सापडले. त्यामुळे सक्रिय रुग्णांची नोंद २९,८१९वर गेली आहे. रविवारी दिवसभरात ५७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ७५,०७३६ इतकी झाली आहे. कालपर्यंत बरे झालेल्या रुग्णांचा दर (रिकव्हरी रेट) ९४ टक्के इतका होता. कोविड रुग्णवाढीचा दुप्पटीचा दर १८३ दिवसांवर आला असून २६ डिसेंबर-१ जानेवारी दरम्यान वाढीचा दर ०.३८ इतका आहे. मुंबईत गेल्या पाच दिवसांत मोठी रुग्णवाढ झाली आहे. बुधवार ते रविवारच्या आकडेवारीतील फरक ५,५५३ इतका आहे.

राज्यात ५० नवे ओमायक्रॉन बाधित

राज्यात काल ११,८७७ नवे कोरोना तसेच ५० नवे ओमायक्रॉन बाधित आढळले. त्यामुळे अॅक्टिव्ह कोरोनाग्रस्तांची संख्या ४२,०२४वर पोहोचली आहे. नव्या रुग्णांमुळे एकूण ओमायक्रॉन बाधित ५१० वर गेले आहेत. ओमायक्रॉनच्या नव्या ५० रुग्णांमध्ये पुण्यातील ३६, पिंपरी-चिंचवडमधील ८, पुणे ग्रामीण आणि सांगलीमधील प्रत्येकी २ तसेच ठाणे आणि मुंबईतील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

नियमांचे पालन करा : चहल

कोरानाबाधितांची वाढती संख्या पाहता प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपण पालन करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी केले आहे. रविवारची बाधितांची संख्या ८,०६३ इतकी आहे. यात ८९ टक्के रुग्णांमध्ये कुठलेही लक्षण नाही. वाढती संख्या चिंताजनक आहे. मात्र, नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे, असे चहल यांनी एका निवेदनाद्वारे म्हटले आहे.

लहान मुलांमध्ये संसर्ग वाढ कमी

० ते ९ वर्षे वयोगटातील २७० रुग्ण या आठ दिवसांत कोरोनाबाधित झाले आहेत. या संभाव्य तिसऱ्या लाटेत सर्वाधिक लहान मुले बाधित होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली होती. मात्र, गेल्या आठ दिवसांत विविध वयोगटातील नवीन कोरोनाबाधितांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, हा ट्रेंड बदलताना दिसतो आहे.

लक्षणे दिसून येत नसलेले रुग्ण अधिक

कोविड डेथ ऑडिट समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत ५० वयापेक्षा अधिक तर, दुसऱ्या लाटेत ३५ हून अधिक वय असलेल्या रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण जास्त होते. या संभाव्य तिसऱ्या लाटेत यात बदल झालेला दिसून येत आहे. सध्या तरी, कोणतीही लक्षणे नसलेले रुग्ण अधिक आढळून येत आहेत. त्यामुळे रुग्णालयांवरील ताण वाढलेला दिसून येत नाही.

आतापर्यंत ९२ टक्के खाटा उपलब्ध

मुंबईतील डॉ. गौतम भन्साली यांनी सांगितले की, मुंबईमध्ये अजूनही ९२ टक्के खाटा उपलब्ध आहेत. त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. कोरोनाबाधित रुग्ण वेगाने वाढत असले तरी, रुग्णालयांत दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. कोरोनाच्या या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी तोंडावर मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंग आदी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

संपर्कवाढीमुळे ओमायक्रॉनचा संसर्ग

अतिजोखमीच्या देशांतून मुंबईत आलेले प्रवासी आतापर्यंत ओमायक्रॉनबाधित आढळत होते. मात्र आता परदेश प्रवास न केलेलेही बाधित होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबईत ओमायक्रॉनचा प्रसार हा संपर्कवाढीमुळेही होत असण्याची शक्यता आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून ओमायक्रॉन बाधित परदेश प्रवास नसलेलेही रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे मुंबईत ओमायक्रॉनने पाय पसरण्यास सुरुवात केली असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पालिकेने ३१ डिसेंबरला दिलेल्या माहितीनुसार करोनाबाधितांच्या जिनोम सिक्वेंन्सिंग चाचण्या करण्यात आल्या, त्यातील १६० जणांना ओमायक्रॉन प्रकाराचा संसर्ग झाला असून बहुतांश प्रवासी मुंबईबाहेरील आहेत.

मुंबईत डिसेंबरमध्ये पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली. यामुळे पालिकेने २१ ते २३ डिसेंबरदरम्यान ३७५ कोरोनाबाधितांच्या जिनोम सिक्वेंन्सिंग चाचण्या केल्या. त्यातील १४१ जणांना ओमायक्रॉन प्रकाराचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. हे १४१ मुंबईचे नागरिक असून त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही. या रुग्णांपैकी ८९ पुरुष तर, ५२ महिलांना संसर्ग झाला आहे. १४१ पैकी ७ रुग्णांना मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत, ३९ रुग्णांना सौम्य लक्षणे आणि ९५ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. ९३ रुग्णांनी लशीच्या दोन मात्रा घेतल्या आहेत. तर तीन रुग्णांनी लसीची एक मात्रा घेतली आहे.

सर्वाधिक रुग्ण अंधेरीत

मुंबईतील अंधेरी के-पश्चिम विभागात एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना ओमायक्रॉनचे रुग्णही वाढले आहेत. या वॉर्डात एकूण २१ ओमायक्रॉन रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर ग्रँट रोड डी विभागात ११, माटुंगा एफ उत्तर विभागात १०, चेंबूर एम पश्चिम विभागात १० रुग्ण आढळून आले आहेत. तर सर्वात कमी मुलुंड टी विभागात १, कुर्ला एल विभागात २, कांदिवली आर दक्षिण विभागात २ रुग्ण आढळून आले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -