Categories: मनोरंजन

Television serial : ‘आई कुठे काय करते’ला नवे वळण

Share

अनुष्काच्या एन्ट्रीने अरुंधती करणार पुनर्विचार

सध्या लोकप्रियतेत आघाडीवर असलेली ‘आई कुठे काय करते’ ही मालिका (Television serial) उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेच्या कथानकात येत असलेल्या नवनव्या वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आता या मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. या नव्या पात्राच्या एन्ट्रीमुळे अरुंधती आणि आशुतोषच्या नात्यात नवे वळण येणार आहे.

अरुंधती आशुतोषच्या वाढदिवशी सर्वात मोठा निर्णय घेणार होती. मात्र अनुष्काच्या एण्ट्रीने अरुंधतीला तिच्या निर्णयाचा फेरविचार करावा लागणार आहे. अनुष्का म्हणजेच आशुतोषची खूप जुनी मैत्रीण. बऱ्याच वर्षांनंतर या दोघांची पुन्हा भेट होणार आहे. या मालिकेत अभिनेत्री स्वरांगी मराठे ही अनुष्काच्या भूमिकेत दिसणार आहे.

या मालिकेविषयी स्वरांगी म्हणते, ‘आई कुठे काय करते’ या मालिकेची मी चाहती असून खऱ्या आयुष्यात मी या सर्व गोष्टींचा अनुभव घेत आहे. त्यामुळे जेव्हा या भूमिकेसाठी मला विचारणा झाल्यावर थोडाही विलंब न लावता मी होकार दिला. या मालिकेच्या सेटवर हलके-फुलके वातावरण असल्यामुळे काम करताना कोणताही तणाव जाणवत नाही. आता अनुष्काच्या एन्ट्रीमुळे अरुंधती आणि आशुतोष यांच्या नात्यात काय बदल होणार हे पाहाणे उत्सुकतेचे आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या मालिकेत खूपच भावनिक गुंतागुंत पाहायला मिळाली. अनेकदा टीआरपीतदेखील ही मालिका पहिल्या क्रमांकावर असते. गेल्या आठवड्यात टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका सहाव्या स्थानावर होती. या मालिकेला ५.९ रेटिंग मिळाले होते.

‘लोकमान्य’ लवकरच येणार भेटीला

गेले काही दिवस मुंबई – पुण्यातील काही भागांत ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ अशा आशयाचे होर्डिंग लावण्यात आले आहेत. या पोस्टरमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. पण ते होर्डिंग कोणी लावले याबाबत कोणतीही माहिती पुढे आलेली नव्हती. अखेर हे पोस्टर ‘लोकमान्य’ मालिकेच्या प्रमोशनसाठी असल्याचा उलगडा आता झाला आहे. ‘लोकमान्य’ या मालिकेचे लेखन आशुतोष परांडकरने केले आहे. तर मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा स्वप्नील वारके सांभाळणार आहे. या मालिकेत अभिनेता क्षितीज दाते आणि अभिनेत्री स्पृहा जोशी प्रमुख भूमिकेत असणार आहेत. ही मालिका २१ डिसेंबरपासून बुधवार ते शनिवार रात्री ९.३० वा. प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांचा जाज्वल्य देशाभिमान शाळकरी वयात असल्यापासून आपल्या अंगी भिनलेला आहे. लोकमान्य टिळकांचा असामान्य प्रवास सर्वांना तोंडपाठ आहे. टिळकांचे राष्ट्रप्रेम, त्यांचे करारी व्यक्तिमत्त्व प्रत्येकाच्या मनात वसलेले आहे. त्यामुळे आजही लोकमान्य असा शब्द जरी उच्चारला तरी टिळकांचा प्रभावी इतिहास आपल्या डोळ्यांसमोर येतो. त्यांच्या प्रभावी कृतीतून त्यांनी घालून दिलेला एकत्र येण्याचा वसा आपण आजही जपतो आहोत.

लोकमान्यांचे असामान्य व्यक्तिमत्त्व राजकीय, सामाजिक आणि कौंटुंबिक स्तरावर त्या काळात कसे घडले, हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. आपले म्हणणे प्रभावीपणे मांडता येण्याच्या कसोटी काळात सध्या आपण आहोत. टिळकांसारखी प्रभावी वक्तृत्वशैली आपल्याकडेही असावी, असे वाटण्याचा हा काळ आहे. म्हणून आजच्या काळाला साजेशा लोकमान्य टिळकांची चरित्रगाथा ‘लोकमान्य’ या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टिळकांच्या राजकीय प्रवासाबरोबरच त्यांच्या कौटुंबिक आयुष्यातील महत्त्वाचे घटना-प्रसंग या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. टिळकांचा विवाह, त्यांचे महाविद्यालयीन जीवन, त्यांचे विविधांगी लेखन, राजकीय स्तरावरील त्यांच्या कारकिर्दीचे महत्त्वपूर्ण टप्पे या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळतील. लोकमान्य टिळक जहाल विचारांचे थोर भारतीय नेते होते. घड्याळ्याच्या काट्याला बांधून दिवसरात्र धावणाऱ्या, भूतकाळाचे ओझे भिरकावून देत काळासोबत चालणाऱ्या लोकमान्य टिळकांचा असामान्य प्रवास अचंबित करणारा आहे. तो या मालिकेतून पाहणे प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा ठरेल हे निश्चित.

उद्योगपती रतन टाटांचाही बायोपिक

सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिक्सची लाट आलेली असून आणखी एका महान व्यक्तीच्या आयुष्यावर लवकरच बायोपिक येणार असल्याची चर्चा सुरू आहे. उद्योगपती रतन टाटा यांच्या आयुष्यावर हा बायोपिक असणार आहे. रतन टाटा यांचे अवघे आयुष्यच आता चित्रपटातून सर्वांसमोर येणार आहे. या चित्रपटात रतन टाटा यांच्याबद्दलच्या माहीत नसलेल्या गोष्टी दाखविण्यात येणार आहेत.

याबाबत हाती आलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय पुरस्कार विजेती दिग्दर्शक सुधा कोंगरा या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपटाचे शूटिंग पुढच्या वर्षी सुरू होण्याची शक्यता आहे. चित्रपटासाठी अनेक दिवस रिसर्चचे काम सरू होते. अखेर हे काम संपले आहे. सुधा कोंगरा या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक आहेत. टाटा यांच्यासारख्या व्यक्तीचा बायोपिक दिग्दर्शित करणे हे माझे स्वप्न होते, असे कोंगरा यांनी म्हटले आहे.

रतन टाटा यांच्या आयुष्यातील अनेक खास गोष्टी या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्याबद्दल माहीत नसलेल्या काही गोष्टी या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणार आहेत. रतन टाटा यांच्या बायोपिकसाठी सध्या दोन नावांची जोरात चर्चा सुरू आहे. अभिनेता अभिषेक बच्चन आणि दाक्षिणात्य अभिनेता सूर्या यांची नावे चर्चेत आहेत. याबद्दल अद्यापही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

-दीपक परब

Recent Posts

कोपर्डी आत्महत्या प्रकरणी दोन आरोपी अटकेत

नगर : नगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात (ता. कर्जत) विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याने येथील दलित…

2 hours ago

विवस्त्र करून मारहाण झाल्यानंतर कोपर्डीत तरुणाची आत्महत्या

नगर : नगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात (ता. कर्जत) अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या…

3 hours ago

IPL 2024 Playoffs: हंगामातील ५० सामने पूर्ण, ५ संघांचे नशीब इतरांच्या हाती

मुंबई: आयपीएल २०२४मध्ये(ipl 2024) गुरूवारी ५०वा सामना खेळवण्यात आला. हा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स…

4 hours ago

Loksabha Election 2024: रायबरेली येथून राहुल गांधी, अमेठीमधून केएल शर्मा उमेदवार, काँग्रेसची घोषणा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारांची घोषणा अखेर करण्याती आली…

5 hours ago

घाबरू नका! फोन चोरी झाल्यास Paytm आणि Google Pay असे करा डिलीट

मुंबई: आजकाल प्रत्येक कामे ही मोबाईलनेच केली जातात. विचार करा की जर तुमच्याकडे फोन नसेल…

5 hours ago

Dream: नशीब बदलतील स्वप्नात दिसलेल्या या ३ गोष्टी

मुंबई: स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात काही गोष्टी दिसणे शुभ मानले जाते. यामुळे व्यक्ती नेहमी आनंदी जीवन जगतो.…

6 hours ago