Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेमनातील आवाज सांगेल तो निर्णय घ्या: मुकेश उत्तमानी

मनातील आवाज सांगेल तो निर्णय घ्या: मुकेश उत्तमानी

मुरबाड : तुमच्या मनातील आतला आवाज सांगेल त्या प्रमाणे निर्णय घ्या. जे क्षेत्र तुम्हाला आवडेल तेच क्षेत्र निवडा. कोणताही निर्णय घेताना घाई करू नका, असे मार्गदर्शन मुरबाड मन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक मुकेश उत्तमानी यांनी शिवळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना केले.

शांताराम भाऊ घोलप आर्ट्स, सायन्स व गोटिराम भाऊ पवार वाणिज्य महाविद्यालय शिवळे महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उत्तमानी बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार गोटिराम पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून जनसेवा शिक्षण मंडळाचे सचिव पांडुरंग कोर, सह सचिव भास्कर हरड, संचालक मधुकर मोहपे, हरिश्चंद्र इसामें, मुरलीधर दळवी, शिवळे ग्राम पंचायतीचे माजी सरपंच महेश बांगर उपस्थित होते

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उत्तमानी यांनी अभ्यासक्रम पूर्ण करा त्याचबरोबर इंटरनेट सुविधा वापरून तुम्ही इतर ज्ञान आत्मसात करा असा संदेश दिला. कोणताही अभ्यासक्रम निवडा पण त्याचा मनापासून अभ्यास करा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

यावेळी ‘कॉलेज स्मार्ट विद्यार्थिनी’ म्हणून मानसी गडगे तर उत्कृष्ट कर्मचारी म्हणून मयुर आवार यांना गौरविण्यात आले. तसेच यावर्षी डॉक्टरेट मिळविणारे प्राध्यापक पी. बी. भास्कर, जी. एम. घुटे आणि एच. एम. पवार यांना सन्मानित करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रमुख पाहुण्यांचे हस्ते पारितोषिके देण्यात आली. ललिता देसले, भाग्यश्री कापडी, कुणाल उमवणे, देवा कराळे यांनी सुंदर गीत गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एस एम पाटील, अहवाल वाचन उप प्राचार्य डॉ गीता विशे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. संदीप चपटे यांनी केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -