Sunday, May 19, 2024
Homeक्रीडाT-20 : सूर्याच्या खेळीने किवींना हुडहुडी!

T-20 : सूर्याच्या खेळीने किवींना हुडहुडी!

टी-२० मालिकेत भारताची १-० अशी आघाडी

माऊंट माऊनगानुईया (वृत्तसंस्था) : सूर्यकुमार यादवच्या धडाकेबाज नाबाद शतकाने रविवारी यजमान न्यूझीलंडच्या गोलंदाजांना हुडहुडी भरली. ६५ धावांनी हा सामना जिंकत टीम इंडियाने ३ सामन्यांच्या टी-२० (T-20) मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. गोलंदाजीत दीपक हुडानेही किवींच्या फलंदाजांची थंडी उडवली.

मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे मालिका विजयाच्या दृष्टीने रविवारच्या सामन्यावर सर्वांचेच लक्ष होते. भारताने उभारलेल्या १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना किवींना सुरुवातीलाच घाम फुटला. पहिल्याच षटकात भुवनेश्वरने फिन अॅलेनला भोपळाही फोडू न देता माघारी धाडले. देवॉन कॉनवे आणि केन विल्यमसन यांनी न्यूझीलंडच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या.

परंतु धावांचा वेग वाढविण्यात त्यांना यश येत नव्हते. त्याच प्रयत्नात देवॉन कॉनवेने विकेट गमावली. तेथून न्यूझीलंडचा संघ अडचणीत सापडला आणि त्यातून बाहेर निघणे शेवटपर्यंत त्यांना जमलेच नाही. कर्णधार केन विल्यमसनने अर्धशतक जरूर ठोकले, परंतु ६१ धावा करताना त्याला ५२ चेंडूंचा सामना करावा लागला. त्यांचे उर्वरित फलंदाज पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले. दीपक हुडा, युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज यांनी रचलेल्या सापळ्यात किवींचे फलंदाज अलगद अडकले. हुडाने ४, तर चहल, सिराज यांनी प्रत्येकी २ बळी मिळवत भारताला मोठा विजय मिळवून दिला. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ १८.५ षटकांत १२६ धावांवर सर्वबाद झाला. भारताने हा सामना ६५ धावांनी जिंकला.

तत्पूर्वी सूर्यकुमार यादव वगळता भारताच्या अन्य फलंदाजांनाही निराश केले. त्यातल्या त्यात इशन किशनने ३३ धावांची खेळी खेळली. सूर्यकुमारची फटकेबाजी सर्वांनाच अचंबित करून गेली. रविवारी सूर्याने केवळ ५१ चेंडूंत ११ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने एकाकी झुंज देत नाबाद १११ धावा तडकावल्या. सूर्यापाठोपाठ इशन किशनने ३६ धावा केल्या. भारताचे अन्य फलंदाज धावा जमवण्यात अपयशी ठरले. विशेष म्हणजे किवींच्या टीम साऊदीने कर्णधार हार्दिक पंड्या, दीपक हुडा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना झटपट बाद करत विकेटची हॅटट्रीक घेतली. परंतु सूर्यकुमार यादवच्या फटक्यांना तोडच नव्हती. मिस्टर ३६० सूर्याचे तुफान रोखण्यात किवी अपयशी ठरले. त्याने अफलातून फटकेबाजी करत भारताला धावांचा डोंगर उभारून दिला. भारताने २० षटकांत ६ फलंदाजांच्या बदल्यात १९१ धावांचा डोंगर उभारला.

हुडानेही उडवली न्यूझीलंडच्या फलंदाजांची थंडी

फलंदाजीत अपयशी ठरलेला दीपक हुडाने गोलंदाजीत मात्र कमालाच केली. त्याने २.५ षटकांत केवळ १० धावा देत ४ बळी मिळवले. हुडाला धावा जमवताना न्यूझीलंडचे फलंदाज अपयशी ठरल्याचे दिसले. त्याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना धावा जमवण्यापासून रोखले. मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार यांनीही आपल्या प्रभावी माऱ्याने भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -