Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीSushma : सुषमाताई, बाळासाहेबांची नाक घासून माफी कधी मागणार?

Sushma : सुषमाताई, बाळासाहेबांची नाक घासून माफी कधी मागणार?

मनसेचे थेट अंधारेंना जाहीर खरमरीत पत्र

मुंबई : वारकरी संप्रदायाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वादात सापडलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात असताना अंधारे यांनी वारकरी संप्रदायाची माफी मागावी या मागणीने जोर धरला होता. त्यासंदर्भात अंधारे यांनी काल पत्रकार परिषद घेतली होती.

त्यानंतर आज ‘आपण वारकरी संप्रदायाची तोडकी मोडकी माफी मागितलीत! आता समस्त हिंदू समुदायाची, महिला भगिनींची आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची माफी कधी मागणार??’ असे पत्र मनसेने ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना लिहिले आहे. सुषमा अंधारे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबत ‘म्हाताऱ्याच्या हातात तलवार देवून काय उपयोग?’, असे वक्तव्य केल्याचा दावा करत मनसे सचिव प्रवक्ते योगेश खैरे यांनी हे खरमरीत पत्र लिहिले आहे.

योगेश खैरे यांचे पत्र “जसेच्या तसे”

सुषमाताई अंधारे….!

आपण वारकरी संप्रदायाची तोडकी मोडकी माफी मागितलीत! आता समस्त हिंदू समुदायाची, महिला भगिनींची आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची माफी कधी मागणार??

संत परंपरा हे महाराष्ट्राचं वैभव आहे…. आक्षेपार्ह हावभाव आणि हीन वक्तव्य करत या परंपरेचा तुम्ही अपमान केला होता. पण ‘नाठाळाच्या माथी हाणू काठी’ या संतांच्या शिकवणूकीनुसार वारकरी संप्रदायाने केलेल्या प्रहारामुळे तुम्ही माफी मागितलीत…. पण तीही तोडकी मोडकीच होती! ती मान्य करायची की नाही हे संप्रदायच ठरवेल !! असो….

त्याचप्रमाणे हिंदू देवता, हिंदू परंपरा, वंदनीय बाळासाहेब यांच्याबाबत सुद्धा तुम्ही अशीच भाषा वापरली आहे. प्रभू राम, श्रीकृष्ण, हनुमान या देवता असतील किंवा नवरात्री सारखे हिंदू धार्मिक सण ज्यात महिला भगिनींच्या भावना आणि आस्था गुंतल्या आहेत त्याचाही तुम्ही टिंगल टवाळी करत अपमान केला! वंदनीय बाळासाहेबांबाबत ‘म्हाताऱ्याच्या हातात तलवार देऊन काय उपयोग आहे ?’ असे अपमानस्पद वक्तव्य सुद्धा केले होते!

त्यामुळे आता समस्त हिंदू समुदायाची, महिला भगिनींची तुम्ही माफी मागणार आहात का नाही? वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची तर तुम्ही त्यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन नाक घासून माफी मागायला पाहिजे… ती कधी मागणार? खरंतर अशी माफी मागण्यासाठी शिवसैनिक आपल्या नेतृत्वाकडे आग्रह का धरत नाहीत याचंच आश्चर्य वाटतं !!

‘मी एकदा केलेलं वक्तव्य परत माघारी घेत नाहीत’ असं आपण म्हणाल्याचं ऐकण्यात आलं होतं… पण तरीही अशा अपमानस्पद, भावना दुखावणाऱ्या, हीन वक्तव्यांची आपण माफी मागितलीच पाहिजे!

तोडकी मोडकी नव्हे तर खुल्या मनाने माफी कधी मागताय ते सांगा!

तुमच्याच दादाहो मधील एक…….

योगेश खैरे

प्रवक्ता आणि सचिव

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

 

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -