Monday, May 20, 2024
Homeदेशमणिपूर हिंसाचाराच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून गंभीर दखल

मणिपूर हिंसाचाराच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून गंभीर दखल

दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश

पोलीस अधिकाऱ्यांचीही भूमिका तपासणार

नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचाराच्या (Manipur Violence) चौकशीबाबत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) लेखी आदेश दिले आहेत.

मणिपूर हिंसाचार पीडितांच्या मानवतावादी पैलूंवर देखरेख करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या तीन माजी न्यायाधीशांची एक समिती स्थापन केली आहे. आता जारी केलेल्या लेखी आदेशात या समितीला दोन महिन्यांत आपला अहवाल न्यायालयात सादर करण्यासही सांगण्यात आले आहे.

जम्मू काश्मीरच्या माजी मुख्य न्यायाधीश गीता मित्तल यांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये शालिनी जोशी (माजी न्यायाधीश, मुंबई हायकोर्ट) आणि आशा मेनन (माजी न्यायाधीश, दिल्ली हायकोर्ट) यांचा समावेश आहे. ही समिती लवकरच मणिपूरचा दौरा करणार आहे. त्यांना आवश्यक सुरक्षा पुरवावी, असे न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयच्या तपासावर लक्ष ठेवण्यासाठी ७ ऑगस्ट रोजी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी जारी करण्यात आलेल्या लेखी आदेशात म्हटले आहे की, पडसलगीकर सीबीआय आणि एसआयटीच्या कामकाजावर देखरेख ठेवण्याबरोबरच मणिपूर हिंसाचाराप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांचीही भूमिका तपासणार असून दोन महिन्यांत सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर करणार आहेत.

दरम्यान, यापूर्वी सीबीआयकडे सोपवण्यात आलेल्या ११ प्रकरणांमध्ये २ महिलांची धिंड काढल्याच्या प्रकरणाचाही तपास सीबीआयकडूनच केला जाणार आहे. लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी राज्याबाहेरील अधिकाऱ्यांनाही तपासात सहभागी करून घेतले जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. एसआयटीमध्ये किमान एक पोलीस निरीक्षक असावा, हा पोलीस निरीक्षक इतर राज्यातील असावा. इतर राज्यातून पोलीस महासंचालक दर्जाचे ६ अधिकारी असावेत, जे एसआयटीच्या ४२ विशेष तपास पथकांच्या कामकाजावर देखरेख करतील. हे अधिकारी राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड आणि दिल्ली या राज्यातील असणार आहेत.

सुनावणीदरम्यान राज्य सरकारने विविध प्रकारच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी एकूण ४२ विशेष तपास पथके (एसआयटी) तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. याला मान्यता देताना न्यायालयाने म्हटले आहे की, केंद्र सरकारने एसआयटीमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड आणि दिल्ली येथून १-१ निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. तसेच, मणिपूरच्या बाहेरील किमान १४ एसपी दर्जाचे अधिकारी पाठवावे. हे अधिकारी एसआयटीचा कार्यभार सांभाळतील. दत्ता पडसलगीकर एसआयटीच्या तपासावर देखरेख करणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -